(सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन). शरीरसंबंधातून पारेषित होणारे संक्रामण. याचा लैंगिक पारेषित रोग किंवा गुप्तरोग असाही उल्लेख केला जातो. लैंगिक पारेषित संक्रामण ही संज्ञा जास्त वापरली जाण्याचे कारण म्हणजे विशिष्ट रोगाची लक्षणे दिसत नसली, तरी शरीरात असणारे संक्रामणही या संज्ञेद्वारे दाखविले जाते. लैंगिक पारेषित रोग हे शरीरसंबंधाशिवाय दूषित रक्त किंवा अंत:क्षेपकाच्या (इंजेक्शन) दूषित सुया यांद्वारे होण्याची शक्यता असते. हे रोग सामान्यपणे जननेंद्रियातून मूत्रमार्ग, जननमार्ग, गुदाशय व मुखगुहा येथे प्रवेश करतात. शरीरातील वेगवेगळ्या भागांत या रोगांच्या कारकांची वाढ होते. त्यामुळे त्वचा, अस्थी, चेतासंस्था, हृदय व रक्ताभिसरण संस्था इत्यादींच्या कार्यांवर वाईट परिणाम होतात. मनुष्यामध्ये पुढील काही लैंगिक पारेषित रोग दिसून येतात.

उपदंश (सिफिलिस) : ट्रिपोनेमा पॅलिडम या जीवाणूंमुळे हा रोग होतो. उपदंश हा रोग गर्भावस्थेत मातेपासून अर्भकाला होऊ शकतो किंवा प्रसूतीच्या क्षणी अर्भकामध्ये संक्रामित होऊ शकतो. उपदंशाची लक्षणे त्याच्या अवस्थेवरून ओळखता येतात. या रोगाच्या तीन अवस्था असतात; पहिल्या अवस्थेत शिश्नावर वेदनारहित घट्ट व न खाजणारा चट्टा उठतो; दुसऱ्या अवस्थेत हातापायांच्या तळव्यावर पुरळ उठतात, तर तिसऱ्या अवस्थेत हृदयावर आणि चेतासंस्थेवर परिणाम होतो. सुप्तावस्थेत या रोगाची लक्षणे समजून येत नाहीत. उपदंशाचे निदान होण्यासाठी रक्ताची चाचणी करावी लागते. पेनिसिलीन-जी (किंवा बेंझिल पेनिसिलीन) या प्रतिजैविकाच्या उपचाराने पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील उपदंश पूर्णपणे बरा होतो. तिसऱ्या अवस्थेतील उपदंशावर अधिक काळ आणि अधिक प्रमाणात प्रतिजैविकांचे उपचार करावे लागतात. याला ‘गरमी’ अथवा ‘फिरंगी रोग’ असेही म्हणतात.

परमा (गोनोऱ्हिया) : नाइसेरिया गोनोऱ्हिया या जीवाणूंच्या संसर्गामुळे परमा रोग होतो. याला ‘पूयप्रमेह’ असेही म्हणतात. या रोगामुळे पुरुषांमध्ये शिश्नातील मूत्रमार्गाची जळजळ होते. हा रोग झालेल्या सामान्यपणे ५०% स्त्रियांमध्ये या रोगाची कोणतीही लक्षणे सहजासहजी प्रकट होत नाहीत. परंतु ५०% स्त्रियांमध्ये योनिमार्गात श्वेतप्रदर स्राव निर्माण होतो आणि ओटीपोटात वेदना होतात. संसर्ग दीर्घकाळ असल्यास थकवा जाणवतो. परिपाककाल २–१४ दिवस असून रोगाची लक्षणे ४–६ दिवसांत प्रकट होतात. क्वचितप्रसंगी सांधेदुखी, त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसतात. जर जीवाणू हृदयापर्यंत किंवा मेंदूपर्यंत पोहोचले, तर हृदयावरणदाह किंवा मेंदूआवरणदाह होतो. शरीरसंबंधाच्या वेळी निरोध वापरल्यास या रोगापासून संरक्षण करता येते. या रोगावर अझिथ्रोमायसीन आणि डॉक्सिसायक्लीन ही प्रतिजैविके वापरतात. गरोदर महिलेला संसर्ग झाल्यास प्रसूतिप्रसंगी अर्भकाच्या डोळ्यांना जीवाणूसंसर्ग होण्याची शक्यता असते. नवजात अर्भकाच्या डोळ्यांना एरिथ्रोमायसीन मलम लावले, तर या संसर्गामुळे होऊ शकणारे अंधत्व टाळता येते. परमा व उपदंश झालेल्या ४०% रुग्णांना क्लॅमिडिया ट्रॅकोमायटिस या जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या संसर्गामुळे मूत्रमार्ग दाह होतो. मूत्रमार्ग दाह लवकर लक्षात आला नाही, तर याचे परिणाम गंभीर होतात.

नागीण : हर्पिस सिंप्लेक्स या विषाणूंमुळे जननेंद्रियांवर नागीण होते. हा रोग मातेला झाल्यास तिच्या बाह्य जननेंद्रियावर दुखवणारा व्रण उठतो. त्यामुळे अर्भकालाही नागीण होण्याची शक्यता असते (पहा : नागीण).

एड्स : एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) विषाणूंमुळे हा रोग होतो, हे पहिल्यांदा १९८० च्या दशकात माहीत झाले. समलिंगी तसेच विरुद्धलिंगी शरीरसंबंधातून याचे संक्रामण मोठ्या प्रमाणात झाले. समुपदेशानाद्वारे तसेच संयुक्त उपचार पद्धतीद्वारे हा रोग बऱ्याच प्रमाणात नियंत्रणाखाली आणला गेला आहे. शरीरसंबंधाच्या वेळी निरोध वापरल्यास एड्‌सचा प्रसार टाळता येतो (पहा : एड्स).

त्रिशिख विकार (ट्रायकोमोनिॲसिस) : ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस या आदिजीवाच्या संसर्गामुळे हा रोग होतो. ज्या पुरुषांना या रोगाची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये प्राथमिक लक्षणे उद्भवत नसल्याने संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. मात्र अशा पुरुषाने एखाद्या स्त्रीशी केलेल्या शरीरसंबंधातून स्त्रीला हा रोग होऊ शकतो. हा विकार झालेल्या स्त्रीमध्ये पांढऱ्या रंगाचा योनिस्राव निर्माण येतो. योनीतून पांढरा स्राव येण्याची इतरही कारणे असतात. मात्र या रोगाची लागण झाली आहे याचे निदान करण्यासाठी योनिस्रावाचे परीक्षण सूक्ष्मदर्शीखाली करावे लागते. मेट्रोनिडॅझोल गोळ्या सात दिवस किंवा टिनिडॅझोल गोळ्या दोन दिवस अशी औषधे घेण्याचा डॉक्टर सल्ला देतात. त्यामुळे संसर्ग बरा होतो. स्त्री आणि पुरुष दोघांनी एकाच वेळी उपचार केल्यास हा रोग पुन्हा उद्भवत नाही.

मणिकवक रोग (कँडिडायसिस) : कँडिडा अल्बिकान्स या यीस्ट कवकाचा योनिमार्गात संसर्ग झाल्यास हा रोग होतो. कँडिडा हे एक यीस्ट असून त्वचेवर, अस्वच्छ कपड्यांवर, शरीराच्या सदाच्छादित भागांवर, बोटांच्या बेचक्यात, तसेच कानामागे त्याची वाढ होऊ शकते. योनिमार्गात याचा संसर्ग झाल्यास योनिमार्गाची खाज होते, तसेच त्यातून पांढरा स्राव येतो. संसर्गामुळे मूत्रविसर्जन तसेच शरीरसंबंध करताना वेदना होतात. बाह्य जननेंद्रियाचा रंग बदलून तांबडा होतो. शिश्नमुंड किंवा शिश्नमुंडचर्म यांस खाज सुटणे हे पुरुषांमधील लक्षण आहे. स्त्रीमध्ये तीव्र संसर्ग झाल्यास ताप येणे, उलट्या होणे, अन्नावरील वासना जाणे, गर्भारपणात योनिमार्गातून रक्तस्राव होणे आणि छातीत दडपण अशी लक्षणे दिसू शकतात. योनिमार्गात कवकरोधी मलमे लावल्यास रोग बरा होतो. फ्लुकोनॅझोल या कवकरोधी गोळ्या घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

काही वेळा जननेंद्रियावर विविध आकाराच्या व आकारमानाच्या चामखिळी वाढू शकतात. त्यांपैकी काही चामखिळी ह्युमन पॅपिलोमा विषाणूंमुळे (एचपीव्ही; ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) होतात. हे विषाणूही शरीरसंबंधातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रामित होतात. काही वेळा त्यांची संख्या वाढते. चामखिळींची संख्या अधिक वाढल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. असे चामखीळ गर्भाशयाच्या मुखाला होणाऱ्या कर्करोगाचा एक कारक असू शकते.

लैंगिक पारेषित संक्रामणांचा प्रसार लैंगिक रोगबाधित व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवल्यामुळे होतो. अशा रोगांचे निदान झाल्यानंतर सहचरास लागण होऊ नये यासाठी निरोधचा वापर केल्यास संक्रामण टाळता येते. तसेच तत्काळ वैद्यकीय सल्ला आणि उपचार केल्यास हे रोग बरे होतात. वैद्यकीय प्रथेनुसार असे रोग झालेल्या रुग्णांची माहिती गुप्त ठेवतात. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लैंगिक संक्रामित रोगबाधित व्यक्तींवर मोफत उपचार केले जातात.