जैवतंत्रज्ञानाचे चार मुख्य पैलू :
नील जैवतंत्रज्ञान : यात खाऱ्या व गोडया पाण्यांतील सजीवांचा वापर करून उत्पादिते तयार करतात.
हरित जैवतंत्रज्ञान : या तंत्रात कृषिविषयक प्रक्रियांचा समावेश होतो. (१) वन्य वनस्पतींची निवड करून ऊतिसंवर्धन तंत्राने त्यांचा मनुष्यासाठी वापर करणे, आणि (२) जनुक परिवर्तित वनस्पतींची/पिकांची निर्मिती करून विशिष्ट पर्यावरणात, जैवरसायनांच्या सान्निध्यात किंवा अनुपस्थितीत त्यांची वाढ करणे आणि त्याद्वारे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे. उदा. कीटनाशकरोधी वनस्पती/पिके तयार करणे, जेणेकरून घातक कीटकनाशकांचा वापर करावा लागणार नाही. जसे, बीटी कापूस, बीटी मका वगैरे.
तांबडे जैवतंत्रज्ञान : यात वैदयकीय प्रक्रियांचा समावेश होतो. सूक्ष्मजीवांची रचना व विकास करून प्रतिजैविके, लशी तयार करणे, परिवर्तित सजीवांचा वापर करून त्यांचा जनुकीय आराखडा बदलून रोगांना आळा घालणे आणि रोगप्रतिकारक्षमता सक्षम करणे इत्यादी बाबी यात मोडतात.
श्वेत जैवतंत्रज्ञान : यात औदयोगिक प्रक्रियांचा समावेश होत असून त्याला औदयोगिक तंत्रज्ञान असेही म्हणतात. उपयुक्त व मौल्यवान रसायने तयार करू शकणाऱ्या सजीवांची रचना व विकास करणे, विकरांसारख्या उत्प्रेरकांचा वापर करून उपयुक्त व महागडी रसायने तयार करणे किंवा विनाशी/प्रदूषणकारी रसायनांचा नाश करणे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. श्वेत जैवतंत्रज्ञानादवारे कमी साधनसंपत्ती खर्ची पडेल आणि मोठया प्रमाणावर औदयोगिक उत्पादन निर्मिती होईल या अपेक्षेतून सजीवांची निर्मिती केली जाते.
वैद्यकीय क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा वापर : औषधनिर्मिती, जनुकीय उपचार (रोगांवर उपचार करण्यासाठी डीएनएचा वापर करणे), जनुकीय चाचणी (जनुकीय विकार शोधणे), डीएनए मायक्रोॲरे चीपची निर्मिती करून एका वेळी लाखो रक्त चाचण्या करणे इत्यादींसाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. पुनर्संयोजी डीएनए/आरएनए तंत्राने तात्काळ औषधे मिळविणे (तयार करणे) शक्य झाले आहे. एश्चेरिकिया कोलाय आणि किण्वसारख्या (यीस्टसारख्या) सूक्ष्मजीवांचा जनुकीय आराखडा बदलून इन्शुलिन व प्रतिजैविके निर्माण करणे आता सुलभ झाले आहे.
जैवतंत्रज्ञानामुळे वैदयकीय चिकित्सा सुलभ व सोपी झाली असून हिपॅटायटीस-बी, हिपॅटायटीस-सी, कर्करोग, संधिवात, हीमोफिलिया, हाडे जोडणे, बहुविध कर्कशीभवन आणि हृदयाशी निगडित अनेक रोगांबरोबर उपचार होत आहेत. आज अस्तित्वात असलेल्या अनेक औषधांचे उत्पादन जैवतंत्रज्ञानामुळे सहज आणि अल्प किंमतीत करता येते. जनुकांची चाचणी करून कोणत्या जनुकात दोष आहे किंवा व्यंग आहे, ते शोधून त्याजागी नवीन जनुक बदलणे आता शक्य होत आहे. त्यामुळे कर्करोग व एड्स यांसारखे घातक रोग आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज रुंदावत असून सखोल अभ्यास करण्यासाठी आता जैव अभियांत्रिकी ही जीवविज्ञानाची शाखा सुरू झाली आहे. या शाखेत जैवरसायन अभियांत्रिकी, जैववैदयक अभियांत्रिकी अशा उपशाखांचा अभ्यास केला जातो. प्रयोगशाळेत व व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यासाठी या जैव अभियांत्रिकी शाखांचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.