परशराम : (सु.१७५४–१८४४). मराठी शाहीर. जन्म नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यात गोदेकाठी वसलेल्या राजाची बावी येथे एका सामान्य कुटुंबात झाला.परशरामाचे वडील शिंपी काम करायचे. त्यामुळे त्याचा मूळ व्यवसाय हा शिंप्याचा होता. लहानपणीच वडीलांचे छत्र हरवल्याने घरातील कर्त्या पुरूषाची जबाबदारी परशरामावर पडली होती. वडीलांचे निधन झाल्यानंतर त्याने विठठ्ल नामाचा जप सुरू केला. हरीनाम, हरीपाठ ग्रहण करता करता तो विठठ्ल भक्तीत रममाण झाला. सात दिवसाचा कडकडीत उपवास पकडून त्याने ज्ञानेश्वरीचे पारायण केले. उत्तम गायकी आणि प्रगल्भ बुध्दीमत्तेच्या जोरावर भजन कीर्तनात रममाण न होता तो आध्यात्मिक भेदिक रचना करू लागला. पुढे परशरामाने भवानी तेली बापू, रामा कुंभार, बाबा सात भाई, मलूराजा, नारायण, सकाशिंपी, गोविंद इत्यादी तमाशातील  कलावंतांच्या  समवेत एकत्र येवून तमाशाचा फड सुरू केला.

परशराम अतिशय डोळस वृत्तीचा प्रतिभा संपन्न आणि स्वाभिमानी शाहीर होता. पेशव्यांनी परशरामाच्या समकालीन शाहीर प्रभाकर, शाहीर राम जोशी, शाहीर अनंत फंदी यांना राजाश्रय दिला होता. कोपरगावला गंगेवर कवन करण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट काव्य करण्याबद्दल पेशवा रावबाजी याने त्याला जहागिरी देवू केली होती , परशरामाने ती निस्पृहपणे नाकारली होती. पुढे पेशव्यांनी परशरामाचा मुलगा बाळकृष्ण हयाच्या नावे ती जहागिरी बहाल केली. परशरामाने कधी विलास केला नाही की कधी व्यसन केले नाही. त्याने कधी धनाचा लोभही बाळगला नाही. तो इतका स्वावलंबी होता की, आपल्या अंगाला लागणारे कपडे तो स्वतः शिवायचा.

परशरामाने गणाच्या अनेक रचना केलेल्या आहेत. त्याने गणेशस्तूती बरोबर पौराणिक, धार्मिक आख्यानक लावण्या, भेदिक, छक्कड, स्थळांचा महिमा सांगणाऱ्या रचना व श्रृंगारिक कवणे केलेली आढळतात. त्याच्या रचनेमध्ये अध्यात्माबरोबर लोकशिक्षण मिळते. त्याने अध्यात्माबरोबर उपहासवर्धक रचना करून समाजातील व्यंगावर आणि वर्मावर मार्मिक भाष्य केलेले दिसते. लौकिक पातळीवरच्या रचना करण्यात परशरामाचा हातखंड होता. स्थळकाळांचा महिमा सांगताना परशरामाने मुंबई नगरीवर सुद्धा रचना केलेली छक्कड पहावयास मिळते. अष्टपैलू असलेला शाहीर परशराम आपल्या रचनांमध्ये मराठमोळया नायक नायकीणीच्या मिलनातील अधिरता, विरहातील व्याकुळता, श्रृंगारातील संयमशीलता सरळ साध्या भाषेतून लोकजीवनाशी एकरूप होऊन दाखवतो. मल्हारराव होळकर स्तुतीपर पोवाडा, खंडेराव महाराजाकडे याचना करणारा पोवाडा, फत्तेसिंग गायकवाड यांचा पोवाडा असे त्याचे काही पोवाडे प्रसिद्ध आहेत. परशराम विठठ्लाचा साक्षात्कार झाला म्हणून त्याच्या कवणांच्या शेवटी नामी विठठ्ल, वरदी विठठ्ल अशी छाप लावत असे. तो गुरू विठठ्ल खतरी यांच्या नावे नामी विठठ्ल अशी छाप लावत असावा असे अभ्यासकांचे मत आहे. भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे आणि शहरे तो हिंडला होता.तत्कालीन समाजस्थितीचे उत्कृष्ट चित्रण त्याच्या कवनांत आढळून येते. इंग्रजी अमलात ‘लक्ष्मीला मूळ आले वाटते, समुद्रात जाईल दिसता’  हा होरा त्याने व्यक्त करून ठेवला होता. होळकर, गायकवाड, पवार ह्यांसारखे मराठी सरदार इंग्रजी राज्य,अशा विषयांवर त्याने काही पोवाडेही रचिले आहेत.

संदर्भ :

  • जोग, रा. श्री. (संपा) ,मराठी वाङमयाचा इतिहास (खंड ३), पुणे, १९७३.