अतिप्राचीन असा गोमंतकीय लोकसंगीतप्रकार.यात पाच-सहा पुरूषवादक आणि गायक असतात. त्यांची संख्या जास्तही असू शकते. त्यात दोन किंवा तीन घुमटवादक शामेळ वादक, एक कांसाळेवादक,एखादा झांजवादक आणि अन्य गायक कलाकार असतात. हा लोकसंगीतप्रकार गावातील मंदिरसंस्था आणि कोमुनिदाद(सामाजिक मालकीची जागा सांभाळणारी संस्था) यांच्याशी संलग्न असतो. सुंवारीचा उगम मंदिराच्या वार्षिकोत्सवातून आणि अन्य विधिउत्सवांतून झाला. मुळात सुंवारी हा शब्द स्वारी असाही उच्चारला जातो. मंदिरातील उत्सवमूर्तीची पालखी,लालखी किंवा रथातून निघालेल्या मिरवणुकीला दैवताची स्वारी म्हणतात. या वेळी वाजविले जाणारे संगीत ते स्वारी अथवा सुंवारी होय. या वाद्यवादनात गायन आणि वाद्यांचा गणिती ताळमेळ साधला जातो. देवाची स्वारी परिक्रमेसाठी निघते, तेव्हा तिचे थांबे ठरलेले असतात. त्यांना ‘पेणे’ असे म्हणतात. प्रत्येक पेण्यावर स्वारी थांबते आणि सुंवारीवादन होते. तशी परंपरा प्राचीन देवस्थानांमधून चालू होती. आताच्या काळात काही मोजक्याच देवस्थानांतील उत्सवांमधून सुंवारी सादर केली जाते.
सुंवारी मध्ये गायन दुय्यम असून वादनाला महत्त्व असते.सुंवारीची सुरुवात कोणत्याही गाण्याविना होते. त्यात फक्त वाद्ये वाजतात,तीदेखील अत्यंत संथ लयीत. या वादनप्रकाराला मोनी चाल (मूक चलन) असे म्हणतात.त्यानंतर गीतगायनाच्या साथीने सुंवारीवादन होते.ही गीते कोकणी व मराठी भाषेतील असतात आणि गीतांचे विषय हे रामायण, महाभारत यांतील प्रसंग आणि सामाजिक स्वरूपाचे असतात.वेगवेगळ्या गीतांसाठी वेगवेगळ्या मात्रांचे ताल ठरलेले असतात. त्यांना खाणपद,चंद्रावळ,फाग अशी नावे आहेत.मंदिरातील प्रमुख आरतीच्यावेळी सुंवारीवादकांचा चमू प्रमुख दैवताची स्तुतिपर आरती म्हणतो आणि काहीशा दुत गतीने वादन करतो.त्याला घुमटांवरील आरत्या असे म्हणतात.गोवा सरकारने या पारंपरिक वादनकलेला उत्तेजन देऊन संवर्धन करण्यासाठी राज्यस्तरावर ‘घुमट-आरती’ स्पर्धेसारखे उपक्रम सुरू केले असून युवा कलाकारांकडून या उपक्रमाला भरीव प्रतिसाद मिळतो. गोवामुक्तिपूर्व काळात गावागावांतून सुंवारीवादकांची पथके कार्यरत होती.एखाद्या उत्सवामध्ये दोन पथके समोरासमोर येऊन त्यांच्यात चढाओढ चाले.ते अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील श्रोते मोठ्या संख्येने जमत,असा एक काळ गोव्याच्या ग्रामीण लोकांनी अनुभवला.आज ही वादनाची परंपरा तरु णवर्ग समर्थपणे पुढे चालवीत आहे.
संदर्भ :
- खेडेकर, विनायक विष्णू , लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.