गोड्डे रामायण : केरळमधील कोची भागात गायले जाणारे कोकणी भाषेतील रामायण. ताडपत्रांवर मल्याळम लिपीत लिहिलेले हे लोकगीतांच्या स्वरूपातील रामायण एर्णाकुलम शहरात सापडले. केरळमधील कोकणी भाषा संस्थेचे प्राध्यापक आर. के. राव यांनी त्या ताडपत्रलेखनाचे संपादन करून मूळ रचना देवनागरी कोकणीत लिहून गोड्डे रामायण या नावाने प्रकाशित केले. गोड्डे म्हणजे गडे. गडे याचा अर्थ गाणारे अथवा नृत्य करणारे कलाकार. गडे जे रामायण गातात ते गोड्डे रामायण.

मुंडइशेरी नावाच्या कुटुंबाकडे वाचता न येणारी काही ताडपत्रे राव यांना १९८२ मध्ये सापडली. ती ताडपत्रे दोनषे वर्षापेक्षा पेक्षा जुनी असावीत. त्यावरून संपादन करून ते लोककाव्य उधृत करून घेतले. या काव्याचा कर्ता कोण हे आजवर उमगलेले नाही; मात्र या कोकणी रचनेवर मल्याळम आणि मराठी भाषेचा प्रभाव दिसतो. या रामकथेची फक्त ६४ ताडपत्रे सापडली आहेत. शेवटची बरीच ताडपत्रे गहाळ झालेली आहेत. हनुमंत संजीवनी आणण्यासाठी निघतो तिथपर्यंतची कथा सांगणारी ताडपत्रे शाबूत आहेत. राव यांनी ही  रामकथा बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किश्किंधाकांड, सुंदरकांड आणि युध्दकांड अशा सहा कांडांमधून गोड्डे रामायण रूपात संपादित केली आहे.

अभ्यासकांच्या मतानुसार गोव्याहून कोकणी लोक सोळाव्या शतकात जलमार्गाने केरळात जाऊन स्थायिक झाले. त्यानंतर त्यांच्या वसाहतींना स्थैर्य प्राप्त झाल्यावर त्यांनी हे काव्य रचले असावे. होळीच्या दिवसात वैश्य आणि सारस्वत समाजातील लोक कोची येथील भगवंती देवळाच्या तसेच बारांपेळ येथील दुर्गाक्षेत्राच्या प्रांगणात गायन, नृत्य आणि अभिनय करून रामायण सादर करीत होते. मध्य केरळ भागात या गोड्डे रामायणाचा मोठया प्रमाणात प्रसार झालेला होता. केरळमधील कोकणी भाषिक कुणबी समाजामध्ये देखील ‘गडे पडणे’ हा विधी होळीच्या सणावेळी साजरा होत असे. त्यावेळी देखील रामकथा तत्कालीन कोकणीमध्ये गायली जात असे. परंतु काळाच्या ओघात या आणि अशा अनेक परंपरा लोप पावत गेल्या. सध्याच्या काळात कोची येथील अमरावती भागात असलेल्या वैश्य समाजाच्या जनार्दनस्वामी मंदिराच्या प्राकारात होळीच्या दिवसात गोड्डे रामायणाचे गायन करतात.

संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू, लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.