गोव्यातील ख्रिस्ती लोकांचा कोंकणी नाट्याविष्कार. तियात्र हे नाव मूळ पोर्तुगीज तियात्र (teatro) या शब्दावरून आले. त्याचा अर्थ थिएटर म्हणजे नाट्य असा आहे. गोव्यात पूर्वापार जागर नावाचा लोकनाट्य प्रकार पारंपरिक विधीच्या स्वरूपात सादर केला जात असे. त्यात गीत, नृत्य, अभिनय यांच्या सादरीकरणातून रात्र जागवून लोकजागृती केली जात असे. पोर्तुगीजांच्या राजवटीत अनेक गोमंतकीयांचे धर्मांतर करण्यात आले. ख्रिस्ती झालेल्यांवर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बंधने लादण्यात आली. मूळ जागर सादरीकरणाची परंपरा असलेले अनेक ख्रिस्ती लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थायिक झाले. धोबीतलाव भागात या ख्रिस्ती गोमंतकीयांचा भरणा होता. ते एकत्र येऊन गेयटी थिएटर म्हणजे अलिकडील एँपायर थिएटरमध्ये जागर सादर करू लागले. १८२० ते १८३० यादरम्यान मुंबईतला पहिला जागर सादर करण्यात आला. जागरातील गीते आणि संवादातून एखाद्यावर थेट टिका केली जात असे. त्यामुळे मने दुखावली गेल्याने भांडणे झाली आणि कालांतराने जागरांचे सादरीकरण थांबले. आता कोणता तरी मनोरंजनाचा वेगळा उपक्रम सुरू करण्याचे जुवांव आगोस्तीन्यु फेर्नांदिश, लुकासिनयु रिबैर आणि कायतानीन्यु फेर्नांदिश या कलाकारांनी ठरविले. त्या दरम्यान काही इटालियन लोकांनी सुरू केलेली इटालियन ऑपेराचे प्रयोग सादर होत असत. या ऑपेरातून प्रेरणा घेऊन या कलाकार त्रिकूटाने ‘इटालियन भुरगो’ नावाचा पहिला तियात्र ‘गोवा पोर्तुगीज ड्रॅमॅटिक’ संस्थेच्या नावाने १७ एप्रिल १८९२ रोजी रंगमंचावर आणला. या तियात्राला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढे याच संस्थेने अनेक नाट्यप्रयोग मंचित केले.

तियात्राचे दोन मुख्य प्रकार आहेत. तियात्र आणि खेळ तियात्र. त्यातील प्रमुख फरक म्हणजे तियात्रात मुख्य कथानक स्वतंत्रपणे सादर केले जाते. त्यात अधूनमधून अनेक गीते संगीताच्या साथीने सादर केली जातात. परंतु ती गीते मध्यवर्ती कथानकाशी संबंधित असतातच असे नाही. मात्र खेळ तियात्रातील सर्व गीते ही प्रमुख कथानकाशी संबंधित असतात. परंपरागत तियात्राचा लेखकच दिग्दर्शक असतो आणि तो नट संचात सहभागी होणारा असतो. खेळ तियात्राचा लेखकच गीतकार, दिग्दर्शक आणि नटदेखील असतो. तियात्राचे लेखक, संगीतकार, वादक, नट आणि प्रेक्षक हे प्रामुख्याने ख्रिस्ती असतात. परंतु या ख्रिस्ती नाट्य आविष्करणाला कधीच चर्चची उघड मान्यता किंवा पाठिंबा नव्हता आणि आजही नाही. पूर्वी हे नाट्यप्रयोग रात्री होत असत; परंतु अलिकडच्या काळात ते दिवसा नाट्यागृहातून तिकिटे लावून दाखविले जातात. तियात्र रंगभूमी ही त्याअर्थाने गोव्यातील एकमेव व्यावसायिक रंगभूमी म्हणता येईल. कारण एकेका तियात्राचे शंभरहून अधिक प्रयोग व्यावसायिक स्वरूपात होत असतात. तियात्र तीन ते चार तास चालतो. प्रयोगातील दोन प्रसंगांदरम्यान गीते गायले जातात. त्यांना कांतार असे म्हणतात. मुळात कांतार या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ गीत गाणे; परंतु गीत गाणे या क्रियापादाऐवजी कांतार हा शब्द नाम म्हणून (गीत) तियात्र रंगभूमीवर वापरला जातो. या गीत गायनाला व्हायोलीन, ट्रंपेट, क्लॅरिओनेट, ड्रम्स आणि अलिकडे बेस गिटार यांची साथ-संगत असते. कांतारमुळे तियात्राची रंगत वाढते. प्रयोगाचा सुमारे निम्मा कालावधी कांतार गायन चालते. पूर्वीच्या काळात तियात्रातील स्त्रीची भूमिका पुरूषच करीत. आताच्या काळात स्त्री भूमिका करण्यासाठी महिला कलाकार मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने बव्हंशी स्त्री भूमिका स्त्रियाच करतात. तियात्र लेखन करणाऱ्या लेखकांना ‘तियात्रिस्ट’ या नावाने ओळखतात. तियात्राचे बहुतेक विषय कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचे असतात. राजकीय विषय आणि संत – विभूतींच्या जीवनावरील तियात्रही सादर केले जातात.या सादरीकरणात अतिशयोक्ती आणि मेलोड्रामा ठळकपणे जाणवतो. माणसा-माणसामधले संबंध, नाती-गोती, त्यातून उद्भवलेले कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न, भाटकार-मुंडकार (जमीनमालक व वसतीकार) संबंध, सासू-सुना, आई-वडील आणि मुलांमधले संबंध, असे अनेकविध प्रश्न तियात्रातून मांडलेले असतात. त्यातून गोव्याचे जीवन नाट्यमयरित्या दाखविलेले असते. ते साहित्यिक अंगाने न दाखविता मनोरंजनाच्या प्रमुख हेतूने केलेले लेखन असे त्याचे स्वरूप असते. तियात्रातून दैनंदिन जीवनातील शेतकरी, मजूर, पदेर (पाववाला), मेस्त (स्वयंपाकी), मिस्त्री (संगीत शिक्षक), भाटकार(जमीनदार), श्रीमंत व्यापारी, ढोंगी वकील, पैशांना सोकावलेला डॉक्टर, रोडरोमिओ, प्रेमिका, मुलांसाठी झुरणारी आई, कलंदर भटक्या अशी पात्रे कधी गंभीर तर कधी टिंगल-टवाळी करून प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन करतात.

जुवांव आगोश्तिन्यु फेर्नांदिश, आलेशिन्यु द कांदोलीम, जुजे पाश्काल फेर्नांदिश उर्फ सौजालीन, सॅबास्तियांव गाब्रियल डिसोजा उर्फ कराचीवाला सायब रोशा, सौजा फर्राव, दियोगीन द मॅलो या सुरवातीच्या काळातील तियात्रिस्टांमागोमाग सी. आल्वारीस, प्रेमकुमार, एम.बॉयर, आल्फ्रेड रोझ, नेल्सन आफोंस, अॅरिस्टीडीस डायस, मायक मेहता, अनिलकुमार, अँथनी सॅन, तोमाझिन्यु कार्दोज, अशा इतर अनेकांनी तियात्र रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. रेजिना फर्नांदिश ही तियात्र रंगभूमीवरील पहिली स्त्री कलाकार. ज्या जुवांव आगोश्तिन्यु फेर्नांदिश यांना ‘फादर ऑफ तियात्र’म्हणजेच कोकणी भाषेत ‘पाय तियात्रिश्त’ म्हणून ओळखतात. त्यांच्या रेजिना फेर्नांदिश या पत्नी होत.त्यांच्या पाठोपाठ कार्लोत, शालीनी, मोहना, ऑफेलिया, बॅटी फर्न्स, साबिना, बॅटी नाझ, आंतोनेत मेंडीस, शॅरोन माझारेलो, आयरीन कार्दोज इत्यादी कलाकारांनी विविध तियात्रातून स्त्री भूमिका वठविल्या.

व्यावसायिक स्वरूपातील खेळ-तियात्र आंतोनियो मोरायश आणि सोकोर द वेर्णा यांनी प्रथम सुरू केला. त्यानंतर रोझारियु रॉड्रिक्स, पॅट्रिक दोउराद, व्हितोरीन पेरैर, लिगोरियु फेर्नांदिश आणि मिनीन द बांदार ही परंपरा पुढे नेण्यासाठी योगदान दिले. तियात्राच्या रंगभूमीवर सध्याच्या काळात रोझारियु रॉड्रिक्स, प्रिन्स जेकब, रोझफर्न, जॉन डिसिल्वा, सी.डी.सिल्वा, पाश्काल रॉड्रिक्स सारखे अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आहेत.तियात्राच्या संहिता पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची पद्धत रूढ नाही. मात्र जुवांव आगोश्तिन्यु फेर्नांदिश यानी आपला ‘भाटकार’ नावाचा दोन भागात लिहिलेला तियात्र १९०९ साली मुंबईत पुस्तकरूपाने प्रकाशित केला. स्पर्धात्मक तियात्र सुरू झाल्यावर तियात्र संहिता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होऊ लागल्या. तियात्र रंगभूमीच्या परंपरेची दखल घेऊन गोवा कला अकादमीने १९७४ च्या मे महिन्यापासून तियात्राची वार्षिक स्पर्धा घेण्यास प्रारंभ केला. ही स्पर्धा आज मोठया प्रमाणावर चालू असते. गोवा शासनाने तियात्राच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने २००९ साली तियात्र अकादेमी नावाची स्वायत्त स्वरूपाची संस्था स्थापन केली आहे.

संदर्भ :

  • खेडेकर ,विनायक विष्णू ,लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी,गोवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा