एक पर्यावरणीय आपत्ती. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर होणाऱ्या तप्त पदार्थांच्या हालचाली. या हालचालींमुळे भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे किंवा भूपृष्ठावर ढकलले जातात. याला ज्वालामुखी क्रिया म्हणतात.
पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूपृष्ठाचा खडकावरील दाब कमी झाल्यास अतिउष्णतेमुळे खडक वितळून शिलारस तयार होतो. या शिलारसात अनेक वायू असतात. शिलारस खडकांना भेगा पाडून तो जमिनीवर साठतो. त्यामुळे शिलारसातील वायू वातावरणात मिसळतात. वायू बाहेर पडलेला शिलारस लाव्हारस म्हणून ओळखला जातो.
शिलारसातून बाहेर पडलेल्या वायूंत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. याशिवाय कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड इ. वायूदेखील या वायूंच्या मिश्रणात असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक, इतर रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ही भूरूपे शंकू च्या आकाराची असतात. त्यांना ज्वालामुखीय शंकू म्हणतात. ज्वालामुखीचा खोलगट भाग हा ज्वालाकुंड म्हणून ओळखला जातो. यातून निघालेला लाव्हारस दूरपर्यंत पसरून लाव्हा पठाराची निर्मिती होते. नदीच्या खोऱ्यांना भेगा पडतात. त्यात शिलारस साठून नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल होतो. पाण्याच्या प्रवाहात शिलारस साठल्यामुळे बांध तयार होतात. त्यामुळे जलाशयाची निर्मिती होते. अशा प्रकारे ज्वालामुखी होण्यापूर्वी असलेल्या प्राकृतिक पर्यावरणात लक्षणीय बदल होतात. या बदलांमुळे स्थानिक परिसंस्था विसकळीत होते.
ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या उष्ण चिखलात प्राणी आणि वनस्पती गाडले जातात. ज्वालामुखीच्या भेगेतून उडालेले खडकाचे तुकडे ज्वालामुखीच्या मुखाजवळ पडतात; परंतु बाहेर पडणारी राख आणि वायू शेकडो किमी. दूर वाहून जातात. त्यामुळे वातावरण प्रदूषित होते. तसेच वातावरणात राख मिसळल्याने सूर्याची किरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे वातावरण थंड होते.
वातावरणाच्या निम्नस्तरातून भूपृष्ठाजवळून उष्ण राखेचे ढग सरकत जातात. अशा वेळी त्या परिसरातील तापमान सु.५००० से. पर्यंत वाढल्याचे आढळून आले आहे. राखेचे असंख्य कण पर्जन्यजलात किंवा हिमजलात मिसळतात. हा प्रचंड गाळ भूउतारानुसार सखल भागाकडे वाहतो. परिणामी त्या प्रवाहात सापडलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा ऱ्हास होतो. गाळ सपाट भागात साठून मातीचा कठीण थर तयार होतो. त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर जीवांची हानी होते.
ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी वायूंचे लोट बाहेर पडतात व वातावरणात मिसळतात. त्यामुळे विशाल ढगांची निर्मिती होते. हे ढग आकाशात दीर्घकाळ राहतात. त्यामुळे अनेकदा पाऊस पडतो. कार्बन डाय-ऑॅक्साइड वातावरणांत मिसळून दीर्घकाळ राहिल्यास मनुष्यासह इतर प्राण्यांना अपायकारक स्थिती निर्माण होते. उष्ण वायूंमुळे त्या परिसरातील तापमान वाढते.
ज्वालामुखी क्षेत्र भूपट्ट सीमा भागात आहे. जगात जागृत ज्वालामुखी सु. ५०० आहेत. त्यांपैकी सर्वाधिक ज्वालामुखी पॅसिफिक महासागरात इंडोनेशिया देशालगतच्या बेटांवर आहेत. हा भाग ‘रिंग ऑफ फायर’ या नावाने परिचित असून तेथे दरवर्षी सु. ५० ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान बेटसमूहातील बॅरन बेटावर आहे. इटली देशात साधारणपणे २८ ज्वालामुखी केंद्रे असून माउंट व्हीस्यूव्हिअस हा त्यांपैकी एक क्रियाशील ज्वालामुखी आहे. पहिल्या शतकात इ.स. ७९ साली झालेल्या याच्या उद्रेकात रोमन लोकांनी उभारलेली पाँपेई आणि हर्क्यूलॅनियम ही शहरे गाडली गेली होती. अठराव्या शतकात केवळ अपघाताने या शहरांचा शोध लागला.
ज्वालामुखी उद्रेकामुळे हवामानात बदल होतो. जागतिक तापमान वाढीस ज्वालामुखी क्रियाही कारणीभूत आहेत, असे काही वैज्ञानिक मानतात. ज्वालामुखी हे नैसर्गिक संकट आहे. ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाल्यावर उद्रेक टाळणे, थांबविणे किंवा त्याचे नियंत्रण करणे शक्य नसते. मात्र, अशा नैसर्गिक आपत्तीनंतर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे, हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य आहे.