शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. पूर्णिमान्त मास मानणाऱ्या लोकांच्या दृष्टीने महाशिवरात्र फाल्गुन महिन्यात येते. शिवरात्रीच्या कालनिश्चयाच्या बाबतीत इतरही बरेच मतभेद आहेत.
नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून त्यांपैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग्याने आपल्या सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योगशिवरात्र मानली जाते.
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा आणि नंतर स्नान, शिवपूजा इ. द्वारे व्रत पूर्ण करावे, असे सांगितले जाते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा करावयाची असून तिला यामपूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. सर्व वर्णांच्या व जातींच्या लोकांना हे व्रत करण्याचा अधिकार आहे. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो, अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत. उदा., शिवरात्रीला नकळत उपवास घडल्यामुळे एका मृगाचा व व्याधाचा उद्धार झाला आणि त्यांना आकाशातील मृग व व्याध या नक्षत्रांचे रूप प्राप्त झाले. महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इ.असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात.
मध्यरात्र, वद्यपक्ष, शिशिर ऋतू, चतुर्दशी या महाशिवरात्रीच्या कालिक वैशिष्ट्यांमधून सृष्टीतील संहार व पुनर्निर्मिती यांचे चक्र सूचित होते, असे काही अभ्यासकांना वाटते.
संदर्भ :
- Ayyar, P.V. Jagadisha., South Indian Festivities, Madras, 1921.
- ऋग्वेदी, आर्यांच्या सणांचा प्रचीन व अर्वाचीन इतिहास, वाई, १९७९.
- कालेलकर, काका, जिवंत व्रतोत्सव, पुणे, १९७२.
- चतुर्वेदी, पुरुषोत्तमशर्मा, भारतीय व्रतोत्सव, वाराणसी, १९६१.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.