स्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक प्राणी. गाढव व घोडा हे देखील याच कुलातील असून हे सगळे ईक्वस प्रजातीचे आहेत. झीब्रा मूळचा आफ्रिकेतील असून नैसर्गिक स्थितीत केवळ आफ्रिका खंडात आढळतो. पूर्व व दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटी प्रदेशांत तसेच गवताळ भागांत तो कळपाने राहतो. त्यांच्या तीन जाती आहेत : (१) सामान्य झीब्रा (ईक्वस क्वागा), (२) पहाडी झीब्रा (ईक्वस झीब्रा) आणि (३) ग्रेव्हीचा झीब्रा (ईक्वस ग्रेव्हिई). सामान्य झीब्य्राचे शरीर २-२.६ मी. लांब असून खांद्याजवळ उंची सु.१.३ मी. असते. शेपूट सु.०.५ मी. लांब असून टोकाला केसांचा झुपका असतो. मानेवर आखूड आयाळ असते. सर्व शरीरावर काळे-पांढरे पट्टे हे याचे वैशिष्ट्य आहे. शरीराचा मुख्य भाग, डोके, मान आणि गळ्याच्या भागातील पट्टे उभे असतात, तर पार्श्र्वभाग व पायांवरील पांढरे पट्टे आडवे असतात. नराचे वजन सु. ३५० किग्रॅ. असते. मादी नराहून आकाराने लहान असते. झीब्य्राच्या तिन्ही जातींपैकी प्रत्येक जातीच्या शरीरावरील पट्ट्यांमध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो. दोन झीब्य्रांचे पट्टे हे एकमेकांशी जुळत नाहीत. त्यांचे कळप एकत्र राहण्यासाठी या पट्ट्यांचा उपयोग होत असावा. जन्मापासूनच झीब्रे पट्ट्या-पट्ट्यांच्या वस्तूंकडे आकर्षित होतात. ज्या झीब्य्रांचे पट्टे कळपातील प्राण्यांच्या पट्ट्यांशी मिळतेजुळते नसतात, अशांना कळपात सामील केले जात नाही. असे झीब्रे कळपापासून वेगळे व एकेकटे राहतात.
झीब्रा प्रामुख्याने गवत खातो. कधीकधी तो कोवळ्या फांद्या, पानेकळ्या, फळे आणि मुळेदेखील खातो. दिवसभरातील अधिक काळ तो खाण्यात घालवितो. त्याला गंध व चव यांचे अचूक ज्ञान असते. तसेच त्याची दृष्टी उत्तम असते. सिंह, बिबट्या, चित्ता व तरस हे झीब्य्राचे मुख्य भक्षक आहेत. भक्षकांपासून सुरक्षित राहण्यासाठी ते नेहमी कळपाने राहतात. कोणत्याही धोक्यापासून सदैव सावध राहण्यासाठी कळपातील एक झीब्रा सतत सतर्क असतो. झीब्रा त्याचे मोठे कान सर्व दिशांना फिरवू शकतो. त्यामुळे त्याला आवाजाची दिशा ओळखता येते. रात्रीच्या काळोखात त्याला स्पष्ट दिसते. हल्ल्याची जाणीव होताच तो पळण्याचा प्रयत्न करतो. तो ताशी सु. ६५ किमी. वेगाने पळू शकतो. नैसर्गिक अवस्थेत तो सु. २२ वर्षे जगतो.
झीब्य्राचे कळप लहान मोठे असतात. कळपात लहान गट असून त्यात एक नर, काही माद्या आणि पिले असतात. प्रौढ नर स्वत:चे वेगळे कळप करून राहतात. त्यांच्या कळपात माद्या नसतात. प्रजनन काळात विशिष्ट मादीवर हक्क सांगण्यासाठी नर आक्रमक होतात, लढतात, एकमेकांना चावतात आणि लाथा झाडतात. मादी तीन वर्षांची झाली की प्रजननक्षम होते आणि आयुष्यभर प्रजननक्षम राहते. नर बहुधा वयाच्या पाचव्या वर्षी प्रजननक्षम होतात. गर्भावधी सु. एक वर्षाचा असतो. मादीस दर खेपेला एक पिलू होते. नवीन जन्मलेले पिलू एका तासात उभे राहते. थोड्या दिवसांतच पिलू गवत खायला लागते. पिलाचा रंग करडा असतो.
झीब्य्राला माणसाळविण्याचे अनेक प्रयत्न झाले; परंतु ते निष्फळ ठरले. नैसर्गिक अवस्थेत झीब्रे असुरक्षित जीवन जगतात. आफ्रिकेतील कुरण-मालक आणि शेतकरी यांनी चराऊ जमिनी ताब्यात घेतल्यामुळे आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे झीब्य्रांच्या अधिवासाचे क्षेत्र कमीकमी होत चालले आहे. मांस आणि कातडीसाठी त्यांची शिकार केली जाते. सध्या केवळ सामान्य झीब्रा अधिक संख्येने आहेत. ग्रेव्हीचा झीब्रा आणि पहाडी झीब्रा या दोन जाती अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहेत.