नैसर्गिक रीत्या हवेत ओझोन आणि पेरॉक्सी-ॲसिटील नायट्रेट (पान;PAN) हे भस्मीकरण करणारे प्रदूषक असतात. ओलेफिन-ओझोन यांच्यामध्ये सूर्यप्रकाशात होणाऱ्या प्रक्रियांमुळे निर्माण होणारी अशीच अनेक प्रदूषके (PPN – पेरॉक्सी प्रोपिओनिल नायट्रेट, PBN – पेरॉक्सी ब्युटिरिल नायट्रेट) १-२ भाग प्रती दशकोटी प्रमाणात हवेत असतात. खनिज तेलावर धावणारी वाहने मोठ्या प्रमाणावर असल्यास त्यांचे हवेतील प्रमाण २.५ – ३ भाग (प्रती दशकोटी), किंवा जास्तही आढळते, संवेदनशील वनस्पतींना ते विषारी ठरते. या प्रदूषकांची तीव्रता ५० – १०० भाग (प्रती दशकोटी भागात) झाल्यास, ते इतके विषारी असते की, केवळ अर्ध्या तासात झाडांच्या पेशी कोसळतात, तर १० – ३० भाग तीव्रता असलेल्या हवेत वनस्पती जेमतेम ४ – ८ तास तग धरू शकतात. औद्योगिक / शहरी क्षेत्रात आढळणाऱ्या २ – १० भाग (प्रती दशकोटी भागात) तीव्रतेत संवेदनशील झाडांची पाने डागाळतात – शिरांच्या दरम्यान पिवळे – पांढरे डाग पडणे, पानांची टोके पांढरी होणे, पानांच्या कडांचा रंग जाऊन पेशी कोसळून कडा सुरळीसारख्या वळणे असे परिणाम नोंदण्यात आले आहेत. पानांचा पृष्ठभाग पाणीदार ओला दिसणे, खालील पृष्ठभाग भुरकट वा चंदेरी होणे, हरितद्रव्याचा नाश होऊन पाने फिकट पिवळी-पांढरी होणे अशा अनेक प्रकारांच्या खुणा / चट्टे निरनिराळ्या वनस्पतींवर आढळून आल्या आहेत.
पेतूनिया, लसूणघास, तंबाखू – विशेषतः बेल डब्ल्यू ३ प्रकार, बीट, पालक, एस्टर, तेरडा इ. वनस्पती प्रकार पान व तत्सम प्रदूषकांस संवेदनशील दिसून आले आहेत. कांदा, कोबी, काकडी, गाजर, कोलिअस, ऑर्किडस, लिली, कार्नेशन वगैरे वनस्पती प्रकार काहीसे सहनशील आढळून आले आहेत.
संदर्भ :
- Noble,W. Smog damage to plants. Lasca Leaves. 15:24., 1965. (From – Treshow, M. 1970.)
- Thompson, W.W.; Dugger, Jr.,W.M.; Palmer, R.L. Effects of Peroxyacetyl nitrate on ultrastructure of chloroplasts, Bot. Gaz. 126: 66-72., 1965.
- Treshow, M.Environment and Plant Response, Mc Graw Hill Publ. in Agricultural Sciences, 1970.
समीक्षक – बाळ फोंडके