हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे. रॅफस क्युक्युलेटस, रॅफस सॉलिटेरस आणि पेझोफॅप्स सॉलिटेरिया अशा त्यांच्या तीन जाती असून हिंदी महासागरातील अनुक्रमे मॉरिशस, रियून्यन आणि रॉड्रिगेस बेटांवर त्यांचा अधिवास होता. कबुतराचा हा नातेवाईक होता, असे मानले जाते. पोर्तुगीजांनी १५०७ मध्ये डोडो पाहण्यापूर्वी त्यांचा या बेटांवर हजारो वर्षांपासून अधिवास होता. या काळात त्यांना कोणी नैसर्गिक शत्रू नसल्यामुळे हा पक्षी आकाराने वाढत गेला आणि त्याची उडण्याची क्षमता नाहीशी झाली.

डोडो (प्रतिकृती)

डोडो पक्ष्याच्या शरीरवैशिष्ट्यामुळे तो बेढब दिसत असे. त्याची उंची सु. १ मी., वजन २०—२३ किग्रॅ., डोके मोठे आणि चोच सु. २३ सेंमी. लांब, काळी, भक्कम आणि टोकाला वाकलेली होती. शरीराचा रंग फिकट राखाडी किंवा निळसर राखाडी, गळा आणि पोटाचा भाग पांढरा असून पंख खुरटे, पांढरे किंवा पिवळे होते. शेपूट लहानशी, वर वळलेली व कुरळ्या पांढऱ्या पिसांची झुपक्यासारखी होती. पाय आखूड पण दणकट होते. चोचीच्या पुढील भागावर नाकपुड्या होत्या. माती व पालापाचोळा उकरत ते भक्ष्य शोधत असत. मुख्यत: फळे, बिया हे त्यांचे खाद्य होते. ते मासेही खात असावेत.

रॅफस सॉलिटेरस हा पक्षी मॉरिशस बेटावरील डोडोसारखा होता. परंतु तो रंगाने पूर्णपणे पांढरा होता. १७५० सालच्या सुमारास तो विलुप्त झाला. पेझोफॅप्स सॉलिटेरिया ही जाती आकाराने दोन्ही डोडोंएवढीच होती. परंतु त्यांचा रंग करडा होता आणि चोच लहान व वळलेली नव्हती. ही जाती सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात होती.

डोडो इ.स. १५०७ मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज खलाशांनी त्यांना हजारोंच्या संख्येने पाहिले. नंतरच्या काळात या बेटांवर आलेल्या प्रवाशांनी केवळ मौजेखातर त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली. तसेच त्या प्रवाशांसोबत डोडोंच्या अधिवासात कुत्रा, मांजर, उंदीर, डुकरे आणि माकडे अशा पाळीव प्राण्यांचा प्रवेश झाला आणि परिणामी डोडोंची संख्या घटत गेली. पळत पाठलाग करून काठीने या पक्ष्याला सहज मारता येत असे. मात्र त्यांचे मांस अजिबात रुचकर किंवा लुसलुशीत नव्हते, असा उल्लेख आहे. सतराव्या शतकाच्या मध्यापासून अखेरपर्यंत डोडोच्या तीनही जाती पूर्णपणे विलुप्त होऊन नामशेष झाल्या.

भारतातदेखील १६०० मध्ये दोन जिवंत डोडो आणले गेले होते. मोगल राजवटीतील चित्रकारांनी अन्य पक्ष्यांसोबत त्यांचीही सुरेख चित्रे काढून ठेवली आहेत. यूरोपातही हौशी प्रवाशांनी काही डोडो नेले होते. मात्र तेथे ते टिकू शकले नाहीत. मॉरिशसमध्ये दलदलीच्या ठिकाणी डोडोंची अनेक हाडे मिळाली आहेत. ती जुळवून त्यांचे काही सांगाडे बनवून ते संग्रहालयात ठेवले आहेत. मनुष्याद्वारे एखाद्या जातीचे कसे विलुप्तन होऊ शकते, याचे उदाहरण द्यायचे झाल्यास डोडोंच्या विलुप्तनाचे उदाहरण अधिक समर्पक ठरेल.