समखुरी गणाच्या जिराफिडी कुलातील सस्तन प्राणी. जलद गतीने चालणारा या अर्थाच्या ‘झरापा’ या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द आलेला आहे. जिराफाचे वास्तव्य फक्त आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिण भागातील खुल्या वनक्षेत्रात आहे. आता त्याची केवळ एकच जात अस्तित्वात असून तिचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमेलोपरडॅलिस आहे. आफ्रिकेत त्याच्या नऊ उपजाती असून स्थानानुसार त्यांना नूबियन जिराफ, केप जिराफ, सोमाली जिराफ इ. नावे आहेत.
जिराफ (जिराफा कॅमेलोपरडॅलिस)

जिराफ हा जगातील सध्या अस्तित्वात असलेल्या भूचर सस्तन प्राण्यांमधील सर्वांत उंच चतुष्पाद व सर्वांत मोठा रवंथी प्राणी आहे. डोक्यासहित धडाची लांबी सु. ५ मी., शेपूट सु. ९० सेंमी., खांद्याजवळ उंची सु. ३-४ मी. आणि वजन सु. १,२०० किग्रॅ. असते. नर जिराफाची उंची सर्वसाधारणपणे सु. ५.५ मी. असते. मादी जिराफाची उंची आणि वजन नराहून कमी असते. रंग पिवळसर, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकाराची व आकारमानांची चकदळे असतात. कोणत्याही दोन जिराफांच्या शरीरावरील चकदळे एकसारखी नसतात. पोटाकडील बाजू फिकट असून त्यावर मात्र ठिपके नसतात. मान खूप लांब असून नराच्या मानेवर ताठ उभ्या केसांची आयाळ असते. इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे मानेतील मणक्यांची संख्या ७ असते. हे मणके जास्त लांब असतात. जिराफाची मान स्नायूंनी पुष्ट असून मानेचा हिसका जबरदस्त असतो. नर व मादीच्या डोक्यावर आखूड व बोथट शिंगांच्या एक किंवा दोन जोडया असतात आणि त्यांवर जाड त्वचेचे आवरण असते. काही जिराफांमध्ये कपाळावर एक किंवा दोन शिंगासारखी टेंगळे असतात. पाय लांब व मजबूत असून पुढचे पाय मागील पायांपेक्षा अधिक लांब असतात. प्रत्येक पायाला दोन मोठे खूर असतात. जीभ सु. २१ सेंमी. लांब व रंगाने काळी-निळी असून ती तोंडाच्या बाहेर काढता येते. बाभळीसारख्या काटेरी झाडांची पाने तोडण्यासाठी तिचा उपयोग होतो. घ्राणेंद्रिय, श्रवणेंद्रिय व दृष्टी तीक्ष्ण असते. डोळे मोठे व तपकिरी रंगाचे आणि कान लांब असतात. जिराफ कण्हल्यासारखा किंवा ‘बेs……sबें’ असा बारीक आवाज काढतो.

जिराफ हा रवंथ करणारा प्राणी असून तो शाकाहारी आहे. पाने, डहाळ्या, झाडांची फळे आणि झुडपांची पाने हे त्यांचे मुख्य अन्न. पाणी मिळाले तर पितात, अन्यथा पाण्याशिवाय ते काही आठवडे राहू शकतात. पाणी पिताना त्यांना पुढचे पाय फाकावे लागतात किंवा गुडघ्यात वाकावे लागते.

जिराफ चालताना एका बाजूचे दोन्ही पाय एकाच वेळी पुढे टाकतो आणि नंतर दुसऱ्या बाजूचे पाय पुढे टाकतो. धावताना मागचे पाय पुढे वळतात आणि ते पुढच्या पायांच्या पुढे परंतु बाहेरच्या बाजूला पडतात. ताशी ५६ किमी. वेगाने तो धावू शकतो. चोवीस तासांत जिराफ केवळ दोन तासच झोपतो आणि तेही उभ्याउभ्याच. तो नैसर्गिक अधिवासात सरासरी २८ वर्षे जगतो. जिराफावर सिंहाने हल्ला केल्यास तो लाथा झाडून स्वत:चे संरक्षण करतो. त्याची लाथ एवढी जोरदार असते की काही वेळेला सिंह मरतो. सिंह, बिबट्या, तरस व मगर हे लहान जिराफांना मारू शकतात.

जिराफ भित्रा, शांत व निरुपद्रवी प्राणी आहे. तो १२-१५ जणांच्या कळपात राहतो. क्वचित प्रसंगी ही संख्या ५० पर्यंत पोहोचते. कळपात एक प्रौढ नर, काही मादया व पिल्ले असतात. वेळोवेळी कळप एकत्र ठेवण्याचे काम नर करतो. मादी पाच वर्षांत प्रजननक्षम होते. प्रजनन काळात नर एकमेकांशी लढतात. तेव्हा एक नर मानेने दुसऱ्या नराच्या मानेवर किंवा छातीवर प्रहार करतो. मादया मात्र लढत नाहीत. प्रजननाचा काळ जुलै ते सप्टेंबर असा असतो. गर्भावधिकाल सु. १५ महिन्यांचा असतो. मादीला दर वेळेस एकच पिलू होते. जन्मल्यानंतर ती पिलाचे संगोपन करते. साधारणपणे ८-१० महिने मादी पिलाला दूध पाजते.

जिराफांच्या शिकारीमुळे किंवा अधिवासात बदल झाल्यामुळे त्यांची संख्या कमी होत गेली आहे. आज ते राखून ठेवलेल्या वनात आणि राष्ट्रीय उदयानात पाहण्यास मिळतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा