भारतात सर्वत्र आढळणारे सपुष्प झुडूप. तगर ही वनस्पती अॅपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव टॅबर्निमोंटॅना डायव्हरीकॅटा आहे. पूर्वी ती टॅबर्निमोंटॅना कॉरोनॅरिया या शास्त्रीय नावाने ओळखली जात असे. या वनस्पतीचे मूलस्थान भारत व मलेशिया असून भारतात ती हिमालयाच्या पायथ्यापासून आसाम, पश्चिम बंगालपर्यंत तसेच दक्षिणेस विशाखापट्टणम्च्या टेकड्यांपर्यंत आढळते.
तगर हे झुडूप सदाहरित व बहुवर्षायू आहे. त्याची उंची १.५–३ मी. असते. पाने साधी, समोरासमोर, चकचकीत, भाल्यासारखी व निमुळत्या टोकाची असतात. खोड तोडल्यावर पांढरा व दुधासारखा चीक येतो. तगरीला फुले बारमाही येतात. फुले एकेरी पाकळ्यांची किंवा गुच्छाने येणाऱ्या पाकळ्यांची अशी दोन प्रकारांची असतात. ती पांढरी शुभ्र, खाली नळीसारखी व वर पसरट असतात. फक्त रात्री त्यांना मधुर वास सुटतो. पेटिका फळे लांब, वाकडी व विषारी असतात. बिया ३–६, लालसर आवरणाने वेढलेल्या असतात.
तगरीची फुले भारतात सर्वत्र पूजेसाठी वापरतात. लाकूड पांढरे, कठीण व थंडावा देणारे असून धूप व सुगंधी द्रव्योद्योगात वापरतात. मूळ कडू व वेदनाशामक असल्याने दातदुखीवर चघळतात. मुळांचा काढा अतिसारावर उपयुक्त आहे. जखमांवर पानांचा चीक लावतात. चीक कृमिनाशक आहे. बियांवरील अध्यावरणाचा उपयोग सूत रंगविण्यासाठी करतात.