(व्हेल). एक महाकाय सागरी सस्तन प्राणी. ‘व्हेल’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘एक मोठा जलचर’ असा आहे. व्हेल याला त्याच्या मोठ्या आकारामुळे मराठी भाषेत ‘देवमासा’ म्हणतात. परंतु तो मासा नसून एक सस्तन प्राणी आहे. म्हणूनच या नोंदीत देवमासाऐवजी व्हेल अशी संज्ञा वापरली आहे.

व्हेलचा समावेश सस्तन प्राण्यांच्या सीटॅसिया गणात केला जातो. सीटॅसिया गणाचे दोन उपगण आहेत; मिस्टिसीटाय उपगण आणि ओडाँटोसीटाय उपगण. मिस्टिसीटाय उपगणात चार कुले (बॅलेनिडी, बॅलेनोटेरिडी, एश्चरायक्टिडी, कॅटोथेरिडी) आहेत आणि त्या कुलातील सर्व प्राण्यांना व्हेल म्हणतात. ओडाँटोसीटाय उपगणात अनेक कुले अहेत. त्यांतील चार कुलातील प्राण्यांना (मोनोडोंटिडी, फायसेटेरिडी, कोगिडी, झिपीडी) व्हेल म्हणतात; या उपगणातील इतर कुलांमध्ये डॉल्फिन, पॉरपॉइज (शिंशुक) हे प्राणी येतात.

व्हेल

अन्य सस्तन प्राण्यांप्रमाणे व्हेल समागम करतात, पिलांना जन्म देतात, दूध पाजतात, खायला घालतात आणि त्यांना वाढवितात. त्यांच्या आकारमानात खूप विविधता आढळते. ड्वार्फ स्पर्म व्हेल (कोगिया सिमा) सु. २.६ मी. लांब असून त्याचे वजन सु. १३५ किग्रॅ. असते. याउलट ब्लू व्हेल (बॅलिनॉप्टेरा म्स्क्युलस) सु. ३० मी.लांब असून त्याचे वजन सु. १ लाख ९० हजार किग्रॅ. असते. नर आणि मादी दिसायला वेगळे असून मादी सामान्यपणे नरापेक्षा मोठी असते. केवळ स्पर्म व्हेल जातीचे नर मादीपेक्षा मोठे असतात. ब्लू व्हेल आकारमानाने सर्व व्हेलमध्येच नव्हे, तर पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांमध्ये मोठे आहेत. व्हेल आणि पाणघोडा या प्राण्यांचा उगम एकाच पूर्वज गटापासून झाला आहे. हे दोन्ही प्राणी एकमेकांपासून सु. ४० कोटी वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले असावेत, असा अंदाज आहे.

शरीराचा पाणबुडीसारखा आकार, वळविता न येणारी मान, बाहूंचे वल्ह्यासारख्या अवयवांत झालेले रूपांतर, मोठा पुच्छपर, सपाट डोके ही व्हेलच्या शरीराची सामान्य लक्षणे आहेत. डोक्याच्या भागात लांब मुस्कट असून डोक्याच्या दोन्ही कडांवर डोळे असतात. शरीर प्रवाहरेखीत असून दोन्ही उपांगांचे रूपांतर पोहण्यासाठी उपयुक्त अशा वल्ह्यांसारख्या अवयवांमध्ये झालेले असते. त्यांना अरित्रे (फ्लिपर) म्हणतात. या अरित्रांना चार अंगुल्या असतात. व्हेल ताशी ९–२८ किमी. अंतर पार करू शकतात.

व्हेलची उत्पत्ती जमिनीवरील सस्तन प्राण्यांपासूनच झालेली आहे. पाण्यात राहण्यासाठी अवयव एवढे अनुकूलित झाले आहेत की, ते जमिनीवर जगू शकत नाहीत. हवा शरीरात घेण्यासाठी त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. मात्र ते पाण्याखाली बराच काळ राहू शकतात. त्यावेळी ते त्यांच्या हृदयाचे ठोके (ऑक्सिजन बराच वेळ शरीरात टिकून राहण्यासाठी) कमी करतात. तसेच समुद्रात खोल जाण्याआधी ते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ येतात, शरीरात पुरेशी हवा घेऊन पाण्यात जातात. उदा., स्पर्म व्हेलच्या काही जाती पाण्याखाली साधारणपणे ९० मिनिटे राहू शकतात. व्हेलच्या डोक्यावर नाकपुड्यांसारखी रचना म्हणजे वातछिद्रे असतात. त्यांद्वारे ते हवा शरीरात घेतात आणि शरीराबाहेर टाकतात. श्वसनक्रियेत जेव्हा हवा बाहेर टाकली जाते, तेव्हा वरच्या दिशेने कारंजासारखा पाण्याचा फवारा जोराने बाहेर फेकला जातो आणि लगेच ताजी हवा आत घेतली जाते. हंपबॅक व्हेल एका वेळी सु. ५,००० लि. हवा शरीरात साठवू शकतात. विशिष्ट जातीचे व्हेल विशिष्ट प्रकारे हवेचे फवारे उडवित असल्याने त्यानुसार ते ओळखता येतात.

व्हेल उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. त्यांच्या शरीरात सु. २५ सेंमी. जाड चरबीचा स्तर तिमिवसा (ब्लबर) असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णतेचा ऱ्हास होत नाही आणि थंड हवामानापासून त्यांचा बचाव होतो. तिमिवशामुळे व्हेल तरंगू शकतात, त्यांचे अन्य परभक्षींपासून संरक्षण होते; विषुववृत्ताकडे सरकत असताना उपवासकाळात हा स्तर ऊर्जास्रोत म्हणून उपयोगी पडतो. सर्व प्राण्यांमध्ये व्हेलचे हृदय मोठे असून त्याचे वजन १८०–२०० किग्रॅ. असते. मनुष्याच्या हृदयापेक्षा ते सु. ६४० पट मोठे असते.

व्हेलचे डोळे शरीराच्या मानाने लहान असले तरी दृष्टी चांगली असते. त्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना असल्यामुळे त्यांना दोन्ही बाजूंचे दोन वेगवेगळी क्षेत्रे दिसतात. गंध आणि चव या क्षमता त्यांच्या खूप विकसित नसतात. व्हेल मानवाप्रमाणे बुद्धिमान समजले जातात. त्यांचा मेंदू विकसित असतो आणि सर्व प्राण्यांमध्ये आकारमानाने मोठा असतो. त्यामुळे ते शिकू शकतात, एकमेकांशी सहकार्याने वागतात तसेच शोक व्यक्त करतात. लहान व्हेल वेगवेगळे खेळ करून दाखवितात.

व्हेल जरी जगात सर्वत्र असले, तरी त्यांच्या बहुतेक जाती उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील थंड पाण्यात वावरतात. परंतु पिलांना जन्म देताना ते विषुववृत्ताकडे, उष्ण वातावरणाच्या दिशेने सरकतात. हंपबॅक (मेगाप्टेरा नोव्हेअँग्ली) आणि ब्लू व्हेल हजारो मैलाचे अंतर अन्नाशिवाय पार करू शकतात. व्हेलचा नर एका हंगामात काही माद्यांशी संबंध ठेवतो. परंतु मादी दोन-तीन वर्षांतून एकदाच नराशी संबंध ठेवते. पिले साधारणपणे मार्च–मे महिन्यात जन्माला येतात. मादी पिलांची काळजी घेते. काही जातींमध्ये मादी १-२ वर्षे पिलांचा सांभाळ करते. व्हेल साधारणत: २० ते १०० वर्षे जगतात.

हंपबॅक व्हेल

मिस्टिीसीटाय उपगणातील व्हेलची लक्षणे : मिस्टिसीटाय उपगणातील व्हेल ‘बलीन व्हेल किंवा तिम्यस्थी व्हेल’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या डोक्यावर एकमेकांलगत वातछिद्रांची जोडी असते. त्यांच्या जबड्यात दात नसतात; त्याऐवजी केराटिनमय ३००–४०० तिम्यस्थी पट्ट अथवा शृंगस्थिपट्ट असतात, ज्यामुळे वरच्या जबड्यात चाळणीसारखी रचना झालेली असते. त्यांद्वारे ते पाण्यातील प्वलक घेऊन गाळतात आणि खातात. या उपगणातील काही व्हेल (हंपबॅक व्हेल) ध्रुवीय प्रदेशात आढळतात आणि पाण्यात समूहाने राहणारे मासे तसेच क्रील खातात. पाण्यातून पुढे सरकण्यासाठी ते अरित्रे आणि पुच्छपर यांवर अवलंबून असतात. त्यांच्या फासळ्या वक्ष कशेरूशी सैलपणे जुळलेल्या असल्या तरी छातीचा सांगाडा घट्ट नसतो. या अनुकूलनामुळे ते पाण्यात खोलवर जातात, तेव्हा पाण्याच्या दाबामुळे छाती दबली जाते.

बलीन व्हेलची कुले त्यांच्या भक्ष्य खाण्याच्या सवयी आणि वर्तन यांनुसार ठरवली गेली आहेत. जसे, बॅलिनोटेरिडी आणि सेटोटेरिडी कुलातील व्हेल भक्ष्य गिळताना खूप पाणी पितात. बॅलेनिडी कुलातील व्हेलांचे डोके सर्वांत मोठे असून शरीराच्या आकारमानाच्या सु. ४०% असते आणि डोक्याचा अधिकतम भाग तोंडाने व्यापलेला असतो. त्यामुळे तेही भक्ष्य गिळताना खूप पाणी तोंडात घेतात. एश्चरायक्टिडी कुलातील व्हेल कवचधारी आणि समुद्राच्या तळाशी असलेले अपृष्ठवंशी प्राणी खातात. भक्ष्य गिळताना ते कुशीवर वळतात आणि पाण्यासोबत गाळही तोंडात घेतात व नंतर शृंगस्थिपट्टाद्वारे ते गाळ बाहेर टाकतात आणि भक्ष्य तोंडात अडकून राहते.

दंतुर व्हेल

ओडाँटोसीटाय उपगणातील व्हेलची लक्षणे : उपगणातील व्हेल ‘दंतुर व्हेल’ म्हणून ओळखले जातात. त्यांना दात असतात आणि वातछिद्र एकच असते. दंतुर व्हेलमध्ये स्पर्म व्हेल आकारमानाने सर्वांत मोठा असतो. पाण्याखाली मार्ग शोधण्यासाठी ते त्यांच्या शरीरात असलेल्या सोनारसारख्या यंत्रणेवर अवलंबून असतात. ते केवळ त्यांच्याच शरीरात आढळणाऱ्या मेदऊतींपासून बनलेल्या ‘मेलॉन’ या इंद्रियाद्वारे सोनार ध्वनितरंग सोडतात. हे ध्वनितरंग पाण्यातून प्रवास करतात आणि एखाद्या वस्तूवर आदळून त्यांच्याकडे परत येतात. हे ध्वनितरंग जबड्यातील मेद ऊतींद्वारे ग्रहीत केले जातात, हे ध्वनितरंग कानाकडून मेंदूकडे पोहोचतात आणि मेंदूद्वारे या ध्वनितरंगांचा अर्थ लावला जातो. त्यामुळे या उपगणातील व्हेल त्यांच्या मार्गात एखादी वस्तू, प्राणी किंवा अडथळा, याचा अंदाज बांधू शकतात. ते अन्न चघळू शकत नसल्याने त्यांच्या घशाला सोईचे होईल असे भक्ष्य गिळतात. पाण्यात पुढे सरकण्यासाठी ते वल्ह्यांसारख्या अरित्रांचा आणि पुच्छपरांचा वापर करतात; पोहताना ते अरित्रे आणि पुच्छपर वरखाली करतात.

या उपगणातील व्हेलचे वर्गीकरण त्यांचे आकारमान, भक्ष्य मिळविण्याच्या सवयी आणि विभागणी यांनुसार केलेले आहे. मोनोडोंटिडी कुलातील व्हेल (बेलुगा, नार्व्हाल) उत्तर ध्रुवाकडील थंड प्रदेशात राहतात. त्यांच्या शरीरात मेदाचा अर्थात चरबीचा मोठा साठा असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. बर्फातून पुढे सरकताना बर्फाचा अडथळा होऊ नये म्हणून त्यांना पृष्ठपर नसतात. फायसेटेरिडी आणि कोगिडी कुलात स्पर्म व्हेल यांचा समावेश ‍होतो. ते स्क्वीडची (माखली) शिकार करण्यात बराच वेळ घालवितात. झिपीडी (बीक्ड व्हेल) कुलातील व्हेल प्राण्यांना चोचीसारखे इंद्रिय असते. आकारमान, रंग, वितरण इ. बाबतीत ते अन्य व्हेलपेक्षा वेगळे असले, तरी भक्ष्य पकडण्याची पद्धत इतर व्हेलप्रमाणेच असते. त्यांच्या डोक्याच्या भागात खालच्या दिशेला खाचांची जोडी असते. त्याद्वारे ते भक्ष्याला आपल्याकडे शोषून घेतात आणि गिळतात.

व्हेल माशाची उत्पादकता : जगात व्हेलची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. स्पर्म व्हेलच्या डोक्याच्या पोकळीत असलेले स्पर्मासेटी तेलामुळे १८ व्या शतकात त्याची बेसुमार शिकार होत असे. अतिथंड प्रदेशात स्पर्म तेलाचे दिवे व मेणबत्ती तयार करण्यासाठी वंगण म्हणून हे तेल वापरत असत. स्पर्म व्हेलच्या अन्ननलिकेत असलेला उदी अंबर (अँबरग्रीस) हा मेणासारखा पदार्थ अत्तर दरवळण्यासाठी करतात. त्यासाठीही स्पर्म व्हेलची शिकार होते. व्हेलचे मांस, तेल, स्नायू यांपासून बनविलेले पीठ, पांढऱ्या व्हेलची त्वचा व त्वचेखालील तिमिवसा यांसाठी व्हेलची अनिर्बंध शिकार २० व्या शतकापर्यंत केली जात असे. १९८६ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेलच्या शिकारीवर बंदी घातली आहे. मात्र अजूनही आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात नॉर्वे, स्वीडन व जपान या देशांत व्हेलची शिकार चालू आहे.