मधुमेह हा कर्बोदक अन्नघटकांच्या चयापचयातील बिघाडामुळे होणारा एक विकार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात इन्शुलीन हे संप्रेरक पुरेसे तयार होत नाही किंवा तयार झालेले इन्शुलीन योग्यपणे वापरले जात नाही, तेव्हा मधुमेह होतो. त्यामुळे शरीरात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढलेले राहते. वेळीच उपचार न केल्यास मधुमेही व्यक्तीला गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात. मधुमेहावर कोणताही प्रतिबंधक उपाय नाही. मधुमेह या शब्दाची फोड मधू अर्थात गोड आणि मेह अर्थात मूत्र अशी आहे. गोड मूत्राचा रोग या अर्थाने मधुमेह हे नाव या विकाराला पडले आहे.

निरोगी व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी ८० मिग्रॅ. प्रति १०० मिलि. (१०० मिलि = १ डेसीलिटर) असते. ते ८० मिग्रॅ. प्रति डेसीलि. असे लिहितात. जेवल्यावर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि जेवणानंतर दोन तासांनी ते प्रमाण पुन्हा पूर्ववत होते. परंतु मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढलेले, म्हणजे सु. १२० मिग्रॅ. प्रति १०० मिलि.पेक्षा अधिक असते. दिवसाकाठी वारंवार लघवीला होणे, तहान लागणे आणि भूक वाढणे ही रक्तातील ग्लुकोज वाढल्याची काही लक्षणे आहेत. दीर्घ काळ मधुमेह असल्यास धूसर दिसणे, हातापायांना मुंग्या येणे आणि जखमा लवकर भरून न येणे अशी लक्षणेही दिसतात. अशा व्यक्तीला मधुमेह आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी रक्तचाचणी करावी लागते.

इन्शुलीन हे संप्रेरक स्वादुपिंडातील बीटा-पेशींमध्ये तयार होते आणि ते रक्तात मिसळते. शरीराला लागणाऱ्या ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कर्बोदके. खाल्लेल्या अन्नातील कर्बोदकांचे पचन लहान आतड्यात होऊन त्यांचे रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये होते. लहान आतड्यातील धमन्यांमधून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यकृतात येतात. तेथून ते रक्तप्रवाहात मिसळतात आणि शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचतात. परंतु ग्लुकोज हे पेशींमध्ये थेट जाऊ शकत नाही. त्यासाठी इन्शुलीनची गरज असते. इन्शुलीनमुळे पेशींना ग्लुकोज मिळते आणि त्याचा अपचय (विघटन) होऊन शरीराला ऊर्जा मिळते. इन्शुलीन कमी पडल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. फ्रुक्टोजच्या अपचयासाठी इन्शुलीन आवश्यक नसते. इन्शुलीनच्या कमतरतेमुळे मेद पदार्थांचे विघटन होऊन रक्तातील कीटोनचे प्रमाण वाढते. याला कीटोॲसिडोसिस म्हणतात. या प्रक्रियेमुळे आणि रक्तातील ग्लुकोज वाढल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात.

शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन ते यकृतात साठण्याची क्रिया इन्शुलीनमुळे होत असते. जेव्हा शरीराला ग्लुकोज कमी पडते, तेव्हा याच ग्लायकोजेनचे रूपांतर स्वादुपिंडाद्वारे स्रवलेल्या ग्लुकॅगॉन या संप्रेरकामुळे पुन्हा ग्लुकोजमध्ये होते. तसेच यकृतात इन्शुलीनच्या उपस्थितीत काही प्रथिनांची निर्मिती घडून येत असते. इन्शुलीन कमी पडल्यास या सर्व क्रिया मंदावतात.

मधुमेहाचे प्रकार : मधुमेहाचे तीन प्रकार (टाइप) आहेत : (१) टाइप-१ : याला पूर्वी  बाल-मधुमेह किंवा इन्शुलीन अवलंबी मधुमेह म्हटले जात असे. इन्शुलीनच्या अभावामुळे हा विकार उद्‌भवतो. (२) टाइप-२ : याला पूर्वी प्रौढ मधुमेह, स्थूलत्व मधुमेह किंवा इन्शुलीन अनावलंबी मधुमेह म्हटले जात असे. शरीराद्वारे इन्शुलीनचा वापर पूर्णपणे न झाल्यामुळे हा विकार उद्‌भवतो. (३) गर्भावस्थेतील मधुमेह. मधुमेहाची मूळ कारणे वेगवेगळी असली, तरी तिन्ही प्रकारांमध्ये लक्षणे व परिणाम सारखेच असतात.

मधुमेह टाइप-१ : मधुमेही रुग्णांपैकी ५–१०% रुग्ण या प्रकारचे असतात. स्वप्रतिकार प्रक्रियेमुळे स्वादुपिंडातील लांगरहान्सच्या द्वीपकातील बीटा-पेशींचा नाश होणे, इन्शुलीनविरुद्ध प्रतिपिंडे निर्माण होणे, इन्शुलीन कमी प्रमाणात किंवा अजिबात तयार न होणे ही टाइप-१ मधुमेहाची कारणे आहेत. स्वप्रतिकार प्रक्रियेची सुरुवात बाह्य कारणांमुळे (उदा., विषाणुजन्य संक्रामण, रसायने व औषधांचे दुष्परिणाम, ताण इ.) होऊ शकते. त्याची सुरुवात लहान किंवा तरुण वयात होते, म्हणून त्याला बालमधुमेह असेही म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. अशा व्यक्तीला पुरेसे इन्शुलीन मिळावे म्हणून इन्शुलीनची अंत:क्षेपणे (इंजेक्शने) आयुष्यभर घ्यावी लागतात. योग्य आहार व व्यायाम अशी जीवनशैली स्वीकारावी लागते. रक्तातील ग्लुकोजवर नियमित नियंत्रण ठेवल्यास अशी व्यक्ती नेहमीचे जीवन जगू शकते.

मधुमेह टाइप-२ : या प्रकारात मधुमेही व्यक्तीच्या शरीरात इन्शुलीन तयार होते, मात्र शरीराच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण कमी असते. या प्रकारात शरीरातील पेशी इन्शुलीनला असंवेदनशील बनवितात किंवा त्याला प्रतिरोध करतात. बऱ्याचदा रुग्णाच्या वाढत्या वयानुसार, इन्शुलीन तयार करणाऱ्या बीटा-पेशींची संख्या कमी होत जाते. इन्शुलीन कमी तयार होत असल्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढलेले राहते. काही वेळा शरीरातील काही पेशी (मुख्यत: स्नायू, मेद पेशी इ.) इन्शुलीनला असंवेदनाक्षम झाल्यामुळे टाइप- मधुमेह होतो. यात सुरुवातीला इन्शुलीनची रक्तातील पातळी वाढलेली असू शकते. अशा वेळी जीवनशैलीत बदल करून योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वजन कमी करणे इ. उपायांनी इन्शुलीन प्रतिरोध कमी करता येतो आणि मधुमेह आटोक्यात आणता येतो. परंतु वेळीच उपचार न केल्यास इन्शुलीनची निर्मिती कमीकमी होत जाते. त्यामुळे औषधोपचार करावे लागतात आणि प्रसंगी इन्शुलीनची अंत:क्षेपणे घ्यावी  लागतात.

मधुमेहाच्या सु. ९०% व्यक्तींमध्ये टाईप-२ मधुमेह आढळून येतो. वृद्धत्व, आनुवंशिकता, आधुनिक जीवनशैली, शरीराच्या हालचाली कमी होणे, ताण आणि शहरीकरण इ. कारणे या प्रकाराला कारणीभूत आहेत. आई व वडील यांना मधुमेह असल्यास अपत्यांना (मुलांना) मधुमेह होऊ शकतो. स्थूलता हे टाइप-२ मधुमेहाचे आणखी एक कारण आहे. कंबरेभोवती वाढलेल्या चरबीमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ॲडिपोकाईन अंत:स्रावामुळे इन्शुलीन प्रतिरोध वाढतो. म्हणून स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे सहसा एकत्र आढळतात. टाइप-२ मधुमेह आरंभी लक्षात येत नाही. काही कारणांनी किंवा नेहमीची रक्तचाचणी केल्यास त्याचे निदान होते.

गर्भारपणातील मधुमेह : आनुवंशिक कल असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भारपणाच्या अंत:स्रावामुळे इन्शुलीन प्रतिरोध निर्माण होतो. इन्शुलीन प्रतिरोध आणि अपुरी इन्शुलीननिर्मिती यांमुळे हा टाइप-२ मधुमेहासारखा असतो आणि बहुधा प्रसूतीनंतर बरा होतो. मात्र, वेळीच उपचार न केल्यास मातेवर आणि बाळावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदा., जन्मत: बाळ अधिक वजनाचे असणे (अतिरिक्त वजनवाढ झाल्यामुळे प्रसूती अपसामान्य होण्याची शक्यता वाढते), मातेचा रक्तदाब वाढणे, वारेतील रक्तपुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे गर्भावस्थेत गर्भाचा मृत्यू होणे इ. समस्या उद्‌भवतात. गर्भारपणाचा मधुमेह झालेल्या स्त्रियांपैकी २०–५०% स्त्रियांना भविष्यात टाइप-२ मधुमेह होऊ शकतो, असे दिसून आले आहे.

मधुमेह चाचणी : टाइप-१ मधुमेहामध्‍ये लक्षणे झपाट्याने वाढत असल्याने निदान चाचण्या तत्काळ करतात. टाइप-२ मधुमेह अन्य आजार कारणांसाठी केलेल्या रक्तचाचणीत आढळून येतो. म्हणून वाढत्या वयात दरवर्षी किंवा कोणताही आजार झाल्यास किंवा कुटुंबातील व्यक्तीला मधुमेह असल्यास किंवा हृदयविकार, धमनीकाठिण्य, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे विकार, डोळ्यांचे रोग, संक्रामण इत्यादी झाल्यास इतर चाचण्यांबरोबर मधुमेहाची चाचणी करतात.

प्राथमिक चाचणीत बारा तासांनंतर उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज १२० मिग्रॅ./१०० मिलि. किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास किंवा कोणत्याही वेळी केलेल्या रक्तचाचणीत ग्लुकोज २०० मिग्रॅ./१०० मिलि. असल्यास मधुमेह असल्याचे निदान करतात. नेमके निदान होण्यासाठी जीटीटी (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट) चाचणी करतात. या चाचणीत ७५ ग्रॅ. ग्लुकोज उपाशीपोटी प्यायला देऊन दर अर्ध्या तासाने रक्ताचे नमुने घेऊन रक्तातील ग्लुकोज तपासणी करतात. दोन तासांनंतर रक्तातील ग्लुकोज १६० मिग्रॅ./ १०० मिलि. पेक्षा अधिक आढळल्यास मधुमेह झाल्याचे निश्‍चित होते. मधुमेहाची एक विशिष्ट चाचणी (हीमोग्लोबिन- ए१सी किंवा एचबी-ए१सी चाचणी) केल्यास मागील १२० दिवसांपर्यंतच्या रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण समजते. तांबड्या पेशींमधील हीमोग्लोबीन आणि ग्लुकोज यांचे ग्लायकोसिलिशन मोजण्याच्या पद्धतीत रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण समजते. मधुमेहावर दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही चाचणी महत्त्वाची असते.

उपचार : टाइप-१ मधुमेह, गर्भारपणातील मधुमेह आणि टाइप-२ मधुमेह यांमध्ये इतर उपचार पुरेसे ठरत नसल्यास इन्शुलीनची अंत:क्षेपणे रोज घ्यावी लागतात. मधुमेह टाइप-२ उपचारात सल्फॉनिल-यूरिया, बायग्वानिड आणि थायाझोलिडीनेडिऑन इत्यादी औषधे तोंडावाटे दिली जातात. सल्फॉनिल-यूरिया गटातील औषधे बीटा-पेशी उत्तेजित करून इन्शुलीन स्रवण्यास मदत करतात. बायग्वानिड गटातील मेटमॉर्फिन औषधामुळे यकृतातील ग्लुकोज बाहेर पडण्यापासून रोखले जाते. तसेच स्नायू व मेद पेशींवरील इन्शुलीनची परिणामकारकता वाढते. थायझोलिडिनेडिऑन औषधांमुळे स्नायू व मेद पेशींमधील इन्शुलीन प्रतिरोध कमी होतो. मधुमेहाची औषधे वेळच्या वेळी घेतल्यास, आहारावर नियंत्रण ठेवल्यास आणि नियमित व्यायाम केल्यास रक्तातील ग्लुकोज जेवणानंतर दोन तासांनी १००-१४० मिग्रॅ./१००मिलि. राखता येते. मात्र बरीच वर्षे ही औषधे घेतल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होतो. म्हणून मधुमेही व्यक्तीने नियमितपणे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

मधुमेही व्यक्तीने आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे वजन आटोक्यात राहते. आहारात ३०% ऊष्मांक (कॅलरीज) मेदांपासून, २०% प्रथिनांपासून, तर ५०% कर्बोदकांपासून असतील, असा आहार सुचविला जातो. आहारात कडू पदार्थ घेतल्यास मधुमेह आटोक्यात येतो, अशी एक समजूत आहे; परंतु कारले, कडू भाज्या, कडुलिंब वगैरे खाऊन हा विकार बरा होत नाही. आहारातील तंतुमय घटक, गवारीच्या बियांतील डिंक, भेंडीतील चिकट पदार्थ इत्यादींमुळे आतड्यात ग्लुकोजचे शोषण हळूहळू होते. त्यामुळे असे पदार्थ आहारात अवश्य घ्यावेत.

रक्तातील ग्लुकोजची पातळी प्रमाणात राखणे हे मधुमेहावरील उपचारांचा भाग आहे. मधुमेही व्यक्तीने उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर दोन तासांनी रक्तातील ग्लुकोजची चाचणी नियमितपणे करून घेणे आवश्यक असते. दवाखान्यात रक्तचाचणीसाठी कोपराजवळील शिरेतून ३-४ मिलि. रक्त काढून रक्तातील ग्लुकोज मोजतात. घरच्या घरी ग्लुकोज तपासण्यासाठी ग्लुकोमीटर हे साधन वापरतात. त्यासाठी फक्त एक थेंब रक्त पुरेसे असते. ग्लुकोज चाचणीपेक्षा ग्लुकोमीटर चाचणीमध्ये साधारणपणे ५-१०% अधिक ग्लुकोज दाखविले जाते.

परिणाम : रक्तातील ग्लुकोज ६० मिग्रॅ./ १०० मिलि.पेक्षा कमी झाल्यास मधुमेही व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊ शकते. याला अल्पशर्करान्यूनता अर्थात हायपोग्लायसेमिया म्हणतात. अल्पशर्करान्यूनता झाल्यास चिडचिडेपणा, त्वचेवर घाम येणे, हृदयाची धडधड वाढणे व हातापायांत थरथर होऊन अचानक कोसळणे अशी लक्षणे दिसतात. तत्क्षणी गोड पदार्थ खायला दिल्यास त्या व्यक्तीला बरे वाटते. रक्तातील ग्लुकोज १८० मिग्रॅ./१०० मिलि.पेक्षा वाढल्यास अतिशर्करारक्तता अर्थात हायपरग्लायसेमिया स्थिती येते. दीर्घकाळ २००–२४० मिग्रॅ.पेक्षा अधिक ग्लुकोज राहिल्यास अंधुक दिसू लागते. रक्तातील ग्लुकोज ३०० मिग्रॅ.पेक्षा अधिक वाढल्यास डोळ्यांतील नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होऊन नेत्रपटल वेगळे होते. अशी स्थिती बराच काळ राहिल्यास हृदयवाहिन्या, पावलांच्या रक्तवाहिन्या व वृक्कवाहिन्या संकुचित होतात. वृक्कवाहिन्या संकुचित झाल्यामुळे कधीही बरे न होणारे वृक्कविकार होतात. पावलांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्यामुळे तळपायांची आग होते व तळव्याच्या चेता मृत होतात. अशा व्यक्तीला वेदना जाणवत नाहीत व पावलांमधून संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. अशा वेळी पावलांच्या मृत त्वचेमध्ये जीवाणुसंसर्गामुळे कोथ (गॅंग्रीन) होतो आणि संसर्ग झालेला भाग शस्त्रक्रियेने काढावा लागतो (पहा: कु. वि. भाग – १ इन्शुलीन).

प्रतिक्रिया व्यक्त करा