एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्‍या चेता बाधित होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास डोळे, यकृत, प्लीहा, स्नायू आणि अस्थिमज्जा यांवरही परिणाम होऊ शकतो. कुष्ठरोग हा प्राणघातक रोग नाही. या रोगावर वेळीच उपचार न केल्यास संसर्गामुळे बाधित व्यक्तीत शारीरिक व्यंग येऊन ती विकलांग होते. त्यामुळे कुष्ठरोगी हे भीती आणि गैरसमजुती यांचे बळी ठरतात. कुष्ठरोगबाधित रुग्णांना अनेकदा समाजाबाहेर टाकले जाते.

क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे जीवाणू मायकोबॅक्टेरिएसी कुलातील आहेत. मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या दंडाकार जीवाणूंच्या संसर्गामुळे कुष्ठरोग होतो. इ.स. १८७३ मध्ये नॉर्वेतील वैद्य गेरहार्ट हेन्‍रिक आरमौअर हान्सेन यांना प्रथम ऊतींच्या नमुन्यात कुष्ठरोगाचे जीवाणू आढळले. या जीवाणूंमुळे कुष्ठरोग होतो, असे त्यांनी इ.स. १८७४ मध्ये सिद्ध केले. म्हणून या रोगाला हान्सेन रोग, तर या जीवाणूंना हान्सेन बॅसिलस असेही म्हणतात. मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूंचा संसर्ग प्रामुख्याने माणसात आढळतो; परंतु आर्मडिलो, चिंपँझी आणि मँगाबे या सस्तन प्राण्यांच्या शरीरात हे जीवाणू आढळले आहेत. हे जीवाणू कसे संक्रामित होतात, याचे कारण संशोधकांना समजलेले नाही. श्वसनमार्गातून या जीवाणूंचा संसर्ग होत असावा, असे बहुतांशी घटनांतून आढळले आहे; तर काही उदाहरणांतून त्वचेच्या संपर्कापासून ह्या रोगाचा संसर्ग होतो, असे दिसले आहे.

बहुतांशी लोक, मायक्रोबॅक्टिरियम लेप्री  हे जीवाणू, त्यांच्या संपर्कात आल्यास संसर्गाला प्रतिरोध करण्याची क्षमता असते आणि या संपर्कानंतर लोकांमध्ये प्रतिरोधक्षमता निर्माण होते. वास्तविक काही मोजक्या लोकांना कुष्ठरोग होतो. या जीवाणूंची वाढ खूप हळूहळू होते. यांचा परिपाक काळावधी १ ते ३० वर्षांचा असतो. संसर्ग झाल्यानंतर, साधारत: ३-५ वर्षांनी या रोगाची विशिष्ट लक्षणे दिसू लागतात.

प्रमुख लक्षणे

त्वचेवर पांढरा किंवा लाल चट्टा दिसतो, त्वचेची संवेदनक्षमता कमी होते आणि चेता जाड दिसतात. या रोगामुळे त्वचादेखील जाड होऊन शरीराच्या विविध भागांवर गाठी वाढलेल्या दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास चेतांची गंभीर हानी होते. हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो. परिणामी बोटे आणि पंजा आतील बाजूला वळतात. मायक्रोबॅक्टिरियम लेप्री  डोळ्यात शिरल्यास वेदनामय दाह निर्माण होतो आणि तीव्रता वाढल्यास अंधत्व येऊ शकते.

प्रकार 

कुष्ठरोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत : (१) ग्रंथिसदृश (ट्युबरक्युलॉइड) आणि (२) कुष्ठार्बुदीय (लेप्रोमॅटस). पहिल्या प्रकारच्या बहुतांशी रुग्णांमध्ये शरीरावर एक किवा मोजकेच चट्टे आणि कमी संख्येने जीवाणू असतात. हा प्रकार प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींतच दिसतो. दुस-या प्रकारच्या कुष्ठरोगाने बाधित बहुतांशी रुग्णांच्या शरीरावर खूप चट्टे आणि त्याच्या ऊतींमध्ये लक्षावधी जीवाणू आढळतात. हा प्रकार प्रतिकारशक्ती अगदी कमी वा मुळीच नसलेल्या व्यक्तीत दिसतो. हा प्रकार फार सांसर्गिक असतो.

उपचार 

आतापर्यंत कुष्ठरोगाला प्रतिबंध करणारी कोणतीही प्रभावी व खात्रीलायक लस विकसित झालेली नाही. मात्र काही विशिष्ट औषधे कुष्ठरोगाची वाढ थांबवितात आणि रुग्णाला वेगाने ‘असांसर्गिक’ बनवितात. १९४० च्या दशकापासून कुष्ठरोगावर उपचार करण्यासाठी डॅप्सोन नावाचे सल्फा औषध वापरले जात आहे. मात्र १९८० च्या दशकात डॅप्सोन या औषधाला प्रतिरोध होत असल्याचे कुष्ठरोगबाधित अनेक रुग्णांमध्ये आढळले आहे.

कुष्ठरोग जीवाणू

डॅप्सोन-प्रतिरोधी जीवाणूंचा नाश करण्यासाठी वैद्य आता दोन-तीन वेगवेगळ्या औषधांचा वापर करून उपचार करतात. ज्या रुग्णांच्या शरीरावर कमी चट्टे आणि काही जीवाणू असतात, अशा रुग्णांना डॅप्सोन आणि रिफाम्पीन नावाचे प्रतिजैविक, अशी दोन्ही औषधे सहा महिने देतात. ज्या कुष्ठरोग्यांच्या शरीरावर अनेक चट्टे आणि अनेक जीवाणू आढळतात; अशा रुग्णांना डॅप्सोन, रिफाम्पीन आणि क्लोफॅझीमीन नावाचे रंजक ही तीन औषधे दोन वर्षे घ्यावी लागतात.

जगभरातील दीड अब्ज लोक कुष्ठरोगप्रवण क्षेत्रात राहतात. त्यामुळे प्रत्येक कुष्ठरोगबाधित व्यक्तीवर उपचार करण्याबरोबर, या रोगावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक धोरणे आखली जातात. शतकानुशतके सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांनुसार कुष्ठरोगबाधित व्यक्तीला, केवळ एकटे ठेवणे आणि अशा व्यक्तीचा वावरही फक्त रुग्णालयापुरता मर्यादित ठेवणे, असे उपाय योजले जातात. यामुळे या रोगाचा प्रसार रोखता येतो; परंतु रुग्णांसाठी हा दृष्टिकोन योग्य नाही. अशा उपायांमुळे लोकांच्या मनात कुष्ठरोगाबद्दल असलेले भय आणि गैरसमज काढण्यासाठी जगभर चाललेल्या कुष्ठरोग निवारण प्रयत्‍नांना खीळ बसत आहे.

कुष्ठरोगाच्या आधुनिक नियंत्रण कार्यक्रमांमध्ये दोन पद्धतींवर भर देण्यात आलेला आहे: (१) कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी समाजाधिष्ठित चाचणी आणि (२) रोगांसंबंधी समाज प्रबोधन, त्वरित रोगनिश्चिती आणि तात्काळ उपचार केल्यास समाजात होणारे मायक्रोबॅक्टिरियम लेप्री जीवाणूंचे संक्रामण थांबविता येते. या रोगामुळे आलेले व्यंग काही प्रमाणात कमी करता येते. या कार्यक्रमातून शाळेतील किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली जाते. ज्यांना या रोगाचा संसर्ग झालेला आहे, त्यांवर औषधोपचार केले जातात. समाज प्रबोधन कार्यक्रमात कुष्ठरोगाविषयी असलेली भीती दूर करणे आणि रुग्णाला उपचारांसाठी प्रोत्साहित करणे, यांसाठी प्रयत्‍न केले जातात.

इतिहास

कुष्ठरोग मुळात केव्हा आणि कोठे आढळला, याची माहिती इतिहासकारांना नाही. बायबलमध्ये ‘लेप्रसी’ हा शब्द आहे, मात्र तो वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचारोगांसाठी वापरला आहे. केवळ कुष्ठरोगासाठी नाही. कुष्ठरोगाचे अचूक विवेचन भारतीय वैद्य सुश्रुत यांच्या लेखात आढळते. इ.स.पू. यूरोपात कुष्ठरोगाचा प्रवेश झाला असे मानले जाते. काही इतिहासकारांच्या मते, पर्शियाचा राजा झेर्झेक्स याच्या सैन्याने जेव्हा इ.स.पू. चौथ्या शतकात ग्रीसमध्ये शिरकाव केला, तेव्हा त्यांच्यामुळे या रोगाचा प्रसार यूरोपात झाला असावा, असे मानतात.

इ. स. अकराव्या आणि बाराव्या शतकांमध्ये पश्चिम यूरोपात रोगाच्या साथी येत, त्याप्रमाणे कुष्ठरोगाच्या साथी आल्या. लोकांचे जीवनमान आणि आहार यांत सुधारणा झाल्यामुळे यूरोपमध्ये या रोगाचे प्रमाण कमी झाले. मात्र अठराव्या शतकापर्यंत नॉर्वेमध्ये हा रोग अस्तित्वात होता.

आज जगात सर्वत्र सु. ५० ते ६० लाख लोक कुष्ठरोगामुळे पिडीत आहेत. आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, भारत आणि आग्नेय आशिया अशा उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत हे रुग्ण आढळतात. मात्र मागील काही दशकांत जगभर झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन प्रयत्‍नांमुळे कुष्ठरोगाचे प्रमाण कमी होत आहे.

इ.स. १९५५ पासून कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन प्रकल्प राबविला जात आहे. शासकीय आणि अशासकीय संस्थांनी कुष्ठरोगासंबंधीची व त्याच्या उपचारक्षमतेबाबत समाजात जाणीव जागृत केली आहे. त्यामुळे समाजात कुष्ठरोगाबाबतची तिरस्कार व भेदभावाची भावना मोठ्या प्रमाणात घटली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा