शेती व्यवसायामुळे शेताभोवतालचे प्रभावित क्षेत्र म्हणजे कृषी परिसंस्था. या परिसंस्थेत त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, पीक लागवडीखालील मृदा, बिगर लागवडीखालील क्षेत्र, कुरण, पाळीव प्राणी, त्यासंबंधित क्षेत्राचे वातावरण, मृदा, पृष्ठीय व अध:पृष्ठीय जल इ. घटकांचा समावेश होतो.
पृथ्वीवर अनेक नैसर्गिक परिसंस्था आहेत. याशिवाय मानवाने आपल्या गरजा, सुखसोयी यांनुसार काही परिसंस्थांची निर्मिती केली, त्या ‘मानवकृत परिसंस्था’ होत. यात खेडे, शहरे, नगरे, बागा, फळबागा, राखीव नैसर्गिक उद्याने, धरणे, जलाशय, सरोवरे, कालवे मत्स्यतलाव, मत्स्यालय, कृषी इ. परिसंस्थांचा समावेश होतो. या परिसंस्था नैसर्गिक परिसंस्था आणि शहरासारख्या जवळजवळ संपूर्ण मानवनिर्मित असलेल्या कृत्रिम परिसंस्थांच्या दरम्यान मोडतात.
निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळ्या कृषी परिसंस्था आढळतात. कृषी परिसंस्थेत अक्षांश-रेखांश, भूरूपे, हवामान, नदी प्रणाली इ. घटकांनुसार विविधता आढळून येते. निरनिराळ्या पर्यावरण स्थितीत वाढणारी पिके निरनिराळ्या प्रकारची असतात. क्षेत्र, हंगाम, हवामान, शेतकर्यांची निवड इ. घटकांनुसार लागवडीखालील पिकांत विविधता असते. शेतातील पिकांत जैवसमूह विपुल प्रमाणात असतात. त्या जैवसमूहात गवत, कीटक, गांडूळ, उंदीर, घूस, पक्षी, पाळीव प्राणी आणि अपघटक असतात.
नैसर्गिक परिसंस्थेत मानवाने सर्वांत प्रथम कृषी व्यवसायातून बदल केले. लोकसंख्येची वाढ झाल्याने लोकांची अन्नधान्याची गरज भागविणे अपरिहार्य होते. अग्नीचा शोध लागल्यानंतर पशुपालन, वनस्पतीची पुनर्वाढ आणि लागवड करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी कृत्रिम परिसंस्था निर्माण करण्यात आल्या. पेरणी, पिकांची वाढ करणे व त्यांची निगा राखणे यांसाठी कृत्रिम कृषी परिसंस्था निर्माण करण्यात आल्या. पूर्वी कृषी परिसंस्था अल्पकालीन, अस्थायी स्वरूपाच्या होत्या. जमीन निवडून त्यावरील वृक्षतोड करून जमीन साफ केली जाई. ती जमीन पिकांच्या लागवडीसाठी वापरली जात असे. पिकांचे काही वर्षे उत्पादन घेतल्यानंतर तिची सुपीकता घटल्यावर ती जमीन सोडून दिली जात असे. त्यामुळे त्या कृषी परिसंस्था तात्पुरत्या कालावधीसाठी असत. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कृषी परिसंस्था कायम किंवा स्थायी स्वरूपाच्या झाल्या आहेत. शेतजमिनीची व पिकांची देखभाल केल्याशिवाय पिकांची उत्तम वाढ होत नाही. पाळीव प्राण्यांच्या उपजीविकेसाठी कुरणांची गवताळ भूमी तयार करावी लागते. कुरणांसाठी व पीक लागवडीसाठी गवताळ भूमी निवडली जाते. त्यावरील गवत कापून जमीन साफ केली जाते. त्यामुळे गवताळ भूमी परिसंस्थेत बदल होतो. बहुतांश भागातील वने शेतीसाठीच उपयोगात आणली गेली. अशा प्रकारे या परिसंस्था तयार झाल्या.
सर्व कृषी परिसंस्थांची समान वैशिष्ट्ये आढळतात. ती पुढीलप्रमाणे आहेत : (१) कृषी परिसंस्था मानवी श्रमशक्तीवर अवलंबून असतात. त्या कृत्रिम असतात. (२) कृषी परिसंस्था स्वयंनियामक व स्वरचित नसतात. (३) कृषी परिसंस्थेची स्थिरता त्यातील विविधतेवर अवलंबून असते; परंतु पिकांचे क्षेत्र बहुधा ‘एकपीक’ पद्धतीचे असते. त्यात विविधतेचा अभाव असतो. (४) अवर्षण, महापूर, रोगराई, कीटक इत्यादींमुळे कृषी परिसंस्थांचा नाश होऊ शकतो. (५) गवत, रोग यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. (६) पिकांच्या वाढीसाठी, कापणीसाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जातो. (७) पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी बियाण्यांमध्ये जनुकीय सुधारणा केली जाते. (८) कापणीमुळे जैववस्तुमानाचे संचयन शेतात होऊ दिले जात नाही. (९) कृषी परिसंस्था निरोगी राहण्यासाठी मृदेस खतपुरवठा करावा लागतो.
कृषी परिसंस्थेत पुढील प्रमुख जैविक घटक आढळतात :
(१) उत्पादक : कृषी परिसंस्थेत मुख्य पीक व शेतातील गवत हे उत्पादक असतात.
(२) भक्षक : कृषी परिसंस्थेत कीटक, उंदीर, ससे, पक्षी व मानव हे प्राथमिक भक्षक तर; गांडूळ, झुरळ, माशी, कोळी इ. द्वितीयक भक्षक असतात. सस्तन प्राणी, वन्य प्राणी व काही पक्षी हे तृतीयक भक्षक असतात.
(३) अपघटक : विविध जीवाणू व कवक हे अपघटक असतात.
कृषी परिसंस्था असे दोन प्रमुख प्रकार पडतात. पारंपरिक कृषी परिसंस्थेत शेतीची सर्व कामे पारंपरिक पद्धतीने केली जातात. या कृषी परिसंस्था निर्वाह स्वरूपाच्या असतात. यात कृषी उत्पादकता खूप कमी असते; परंतु या परिसंस्थेत परिस्थितिकीय समतोल अधिक प्रमाणात टिकून असतो. कृषी व्यवसायात आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो. तो भाग आधुनिक कृषी परिसंस्थेचा असतो. विकसित राष्ट्रांतील कृषी परिसंस्था आधुनिक स्वरूपाच्या आहेत.