कोंबडीचे अंडे

सर्व पक्षी, काही उभयचर प्राणी, काही सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या माद्या अंडी घालतात.  अंडी घालणार्‍या प्राण्यांना ‘अंडज’ म्हणतात. येथे फक्त पक्ष्यांच्या अंड्यांची माहिती दिलेली आहे.वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यांत विविधता आढळते. शहामृगाचे अंडे सु. १.५ किग्रॅ. वजनाचे असते, तर कोंबडीचे अंडे ५५-६० ग्रॅ. वजनाचे असते. अंड्याचे कवच कॅल्शियम कार्बोनेटाचे असून रंगाने पांढरे असते. कवचातील झिंकच्या संयुगामुळे त्यावर निळे हिरवे, तर प्रोटोप्रोफायरिनामुळे लाल तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात. बहुतांशी अंडी गुळगुळीत असतात. काही बदकांची अंडी बाहेरून तेलकट असतात. कवचावर मोठ्या प्रमाणात आढळणारी सूक्ष्म  छिद्रे अंड्यातील जीवाच्या श्वासोच्छ्वासासाठी उपयोगी असतात. अडे फलित किंवा अफलित अंडे उबविण्याच्या प्रक्रियेत अंड्यातील भ्रूणाला संरक्षण मिळून त्याचे पोषण होते.भ्रूणाची पूर्ण वाढ झाली की अंड्याचे कवच फोडून पिलू बाहेर येते.

पक्ष्यांच्या अंड्यांचा वापर अन्न म्हणून केला जातो.  अंडे हे अत्यंत पौष्टिक असल्याने मानवी आहारात त्याचा उपयोग वर्षानुवर्षे होत आहे. प्रामुख्याने कोंबडी, बदक, हंस, शहामृग इ. पक्ष्यांच्या अंड्यांचा वापर  खाण्यासाठी केला जात असला, तरी त्यात सर्वाधिक वापर पाळीव कोंबड्यांच्या अंड्यांचा होतो. अंडी दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी शीतगृहाचा वापर केला जातो.

कोंबडीच्या अंड्याचा छेद

अंड्याचे कवच, पांढरा बलक आणि पिवळा बलक असे तीन प्रमुख भाग असतात. अंड्याच्या एकूण वजनापैकी १० %  वजन कवचाचे, ५८ % वजन पांढर्‍या बलकाचे, ३२ % वजन पिवळ्या बलकाचे असते. पांढर्‍या बलकात पाणी ८७ %  व प्रथिने १३ % तर पिवळ्या बलकात पाणी, मेद व  प्रथिने असतात. प्रथिनांमध्ये माणसाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व अ‍ॅमिनो आम्ले असतात. पिवळ्या बलकातील मेदांमध्ये असंतृप्त मेदाम्ले व कोलेस्टेरॉल (३०० मिग्रॅ.) असते. कोंबडीच्या एका अंड्यात ६०-७५ कॅलरीज असतात. अंड्यामध्ये अ जीवनसत्त्व आणि ब जीवनसत्त्वांपैकी रिबोफ्लाविन, फॉलिक आम्ल आणि सायनोकोबालमिन असतात. ह्यांखेरीज लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम असे उपयोगी इतर घटकही असतात. अंड्याच्या दोन्ही बलकांवर सुकविणे, भुकटी करणे, द्रव स्थितीत ठेवणे, यांसारख्या विविध प्रक्रिया केल्या जातात. यांचा उपयोग केक, कँडी, सॅलड, आइस्क्रीम व लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी केला जातो. पाकशास्त्रातही अंड्याला महत्त्वाचे स्थान आहे. अंडे कच्चे, दुधातून, अर्धे उकडून, बुर्जी, रस्सा, पोळी आणि इतर गोड व तिखट पदार्थ करून खाल्ले जाते. अंड्याच्या कवचाची भुकटी कॅल्शियमसाठीचा स्रोत म्हणून कोंबड्याच्या, शहामृगाच्या व पांढर्‍या डुकराच्या खाद्यांत मिसळतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा