कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्सीनिया इंडिका आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत केली जाते. याच्या सु. २०० जाती असून त्यांपैकी ३५ जाती भारतात आढळतात.
कोकमचा वृक्ष ८-१२ मी. उंच व सरळ वाढतो. त्याच्या फांद्या वाकलेल्या असतात. पाने साधी, लंबगोल-भाल्यासारखी, चिवट, अखंड व समोरासमोर असतात. ती कोवळेपणी लालसर व पुढे हिरवीगार होतात. फुले एकाकी अगर गुच्छाने पानांच्या बगलेत नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये येतात. फुले चार पाकळ्यांची, एकलिंगी, लहान, क्वचित द्विलिंगी, परंतु एकाच झाडावर येतात. नरफुले आणि स्त्रीफुले स्वतंत्र फुलोर्यात येतात. फळ जांभळटलाल असून त्यांचा व्यास २.५ सेंमी. पेक्षा अधिक असतो. बिया पाच ते आठ, चपट्या व मगजात विखुरलेल्या असतात.
कच्ची फळे आंबट, वातशामक व आवनाशक असतात. एप्रिल-मेमध्ये फळे पिकतात. फळातील रंस रंगबंधक असतो. त्याचे सरबतही करतात. पक्व फळ शामक, शीतकर व पित्तरस उत्पन्न करणारे असते. फळात मुख्यत: ‘क’ जीवनसत्त्व असते.
कोकम तेल पौष्टिक, स्तंभक आणि जळजळशामक असते. ते क्षतांवर, हातापायांच्या भेगांवर व ओठांवर वापरतात. कफक्षय, गंडमाळा, फुप्फुस रोग, अतिसार आणि मुरड्याची तिडीक यांवर ते गुणकारी आहे. सौंदर्यप्रसाधनातही याचा उपयोग होतो. पक्व सुकविलेल्या कोकमाच्या सालीचा आमसूल बनविण्यासाठी उपयोग होतो. आमटी, सोलकढी इत्यादींना आंबट चव येण्यासाठी आमसुलाचा वापर करतात. आमसुलात मॅलिक व टार्टारिक आम्ले असतात. फळातील गरापासून रस काढल्यावर त्यांतील बिया वाळवून साठवितात. टरफलासहित गळित केल्यास २३-२६% आणि टरफल काढून गळित केल्यास मगजापासून ४६% तेल मिळते. कोकम तेल फिकट करड्या किंवा पिवळसर रंगाचे असते. ते वंगणासारखे गुळगुळीत असते. या तेलात स्टिअरिक आणि ओलेइक आम्ले असतात.