जलजीवालय म्हणजे खाऱ्या व गोड्या पाण्यातील प्राणी ठेवण्यासाठी, ज्याची एक बाजू तरी पारदर्शी असेल, असे मुद्दाम तयार केलेले बंदिस्त क्षेत्र. जलजीवालय ही साहचर्याने राहणाऱ्या सजीवांची मानवनिर्मित परिसंस्था असून जलचरांच्या नैसर्गिक परिसंस्थेची लहान स्तरावरील प्रतिकृती असते. पाणी, वनस्पती व जलचर यांचा योग्य समतोल साधून ही परिसंस्था विकसित केली जाते. अनेकजण घराची शोभा वाढविण्यासाठी किंवा छंद म्हणून अशा जलजीवालयात वेगवेगळे मासे व इतर जलचर ठेवतात.
जलजीवालय

घरगुती जलजीवालयांसाठी पूर्वी धातूच्या पट्ट्यांच्या आधाराने काचा जोडून काचेची टाकी तयार केली जात असे. परंतु पाण्याच्या संपर्काने या पट्ट्या खराब होतात, हे लक्षात आल्यावर आता काचा चिकटविण्यासाठी सिलिकॉन जेल वापरतात आणि केवळ काचेपासून आयताकृती, चौकोनी, षट्कोनी टाक्या तयार करतात. टाकीचा आकार आणि त्यात भरल्या जाणाऱ्या पाण्याचे वजन लक्षात घेऊन योग्य जाडीची काच निवडावी लागते. उदा., ६० सेंमी. लांब  ३० सेंमी. रुंद ३० सेंमी. उंच जलजीवालयासाठी ६ मिमी. जाडीची काच वापरली जाते. यापेक्षा मोठ्या आकाराच्या टाकीसाठी जाड काच वापरतात. निवडलेल्या जाडीच्या काचेच्या योग्य आकाराच्या पट्ट्या कापून त्या सिलिकॉन जेलने चिकटवितात. २४ तासांत सिलिकॉन जेल सुकून पट्ट्या एकमेकांना जोडल्या जातात. अशा प्रकारे तयार केलेल्या जलजीवालयात पाणी भरून त्यात जलचर व मासे सोडता येतात. जलजीवालयासाठी विहिरीचे पाणी वापरतात, कारण असे पाणी निर्धोक असते. नळावाटे आलेले क्लोरीनयुक्त पाणी वापरल्यास ते पाणी क्लोरीन निघून जाण्यासाठी काही वेळ तसेच ठेवतात आणि नंतर वापरतात.

जलजीवालयासाठी पाणी, पाण्यातील कचरा काढून टाकण्यासाठी गाळणयंत्र (फिल्टर )आणि पाण्यामध्ये ऑॅक्सिजन खेळता राहावा यासाठी हवेचा पंप (एअरेटर) या गोष्टी आवश्यक असतात. तसेच शोभेसाठी रंगीत वाळू व दगड, चिनी माती किंवा प्लॅस्टिकची खेळणी, स्वयंप्रकाशित (फ्लूअरेसंट) दिवा अशा अतिरिक्त वस्तू बसविल्या जातात. यांखेरीज काही पाणवनस्पती लावतात. त्यानंतर या पेटीत पाणी भरून टाकी काही दिवस तशीच ठेवतात. त्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसतो. तसेच पाण्यात माशांना खादय म्हणून उपयोगी पडणारे प्लवक वाढते (याला टाकी ‘सेट’ होणे म्हणतात). अशा तऱ्हेने तयार झालेल्या जलजीवालयात गोल्ड फिश, गपी, न्यूऑन टेट्रा, असिपुच्छ (स्वोर्ड टेल), गुरामी, कोई, ऑस्कर, अरवाना, फ्लॉवर हॉर्न, सयामीज फायटर, मॉली, एंजल, डिस्कस, झीब्रा मासा व गोडया पाण्यातील शोभिवंत मासे सोडले जातात. जलजीवालयात अॅमेझॉन सोअर्ड प्लान्ट, व्हॅलसनेरिया, कबोम्बा, हायड्रिला व कमळ अशा वनस्पती लावून निसर्गसादृश्य जलावरण तयार करता येते. जलजीवालयात योग्य प्रमाणातील सूर्यप्रकाश, तापमान (२५ से.-२६से.), सामू (अल्कधर्मी) ७ पेक्षा अधिक, पुरेसा ऑक्सिजन, तसेच फॉस्फेटे, नायट्रेटे इत्यादी घटकांची गरज असते. या घटकांच्या उपलब्धतेनुसार पाण्यातील मासे व वनस्पती जिवंत राहतात व जलजीवालयातील घटकांवर नियमित लक्ष ठेवावे लागते.

आज वेगवेगळ्या आकारांची व प्रकारांची जलजीवालये उपलब्ध आहेत. गोडया पाण्याप्रमाणेच सागरी मासे व जलचर आता जलजीवालयांमध्ये ठेवतात. त्यासाठी समुद्राचे खारे पाणी वापरतात आणि अशा जलजीवालयात डॅमसल फिश, क्लाउन फिश, सार्जंट मेजर, एंपरर एंजल, पॅरट फिश, रॅबिट फिश, मोनो एंजल, मूरिश आयडॉल असे मासे ठेवतात.

शोभिवंत मासे पाळणे हा आज एक छंद आहे. कमी किंमतीच्या गपी माशांपासून हजारो रुपये किंमतीचे अरवाना, डिस्कस, ऑस्कर इत्यादी मासे आज बाजारात उपलब्ध आहेत. उत्तम प्रकारे विकसित झालेले जलजीवालय डोळ्यांना आणि मनालाही आनंद देतात. घराचे व कार्यालयाचे सौंदर्य वाढविण्यासाठी जलजीवालयांचा उपयोग केला जातो. जलजीवालयातील माशांच्या हालचाली न्याहाळण्याने बौद्धिक व मानसिक ताण कमी होतो.

काही शहरांमध्ये तसेच काही प्राणिसंग्रहालयांमध्ये सार्वजनिक जलजीवालये तयार करण्यात आलेली आहेत. त्यात सागरी आणि गोड्या पाण्यातील जलजीवालये असे दोन्ही प्रकार असतात. सागरी जलजीवालयात जिवंत स्पंज, प्रवाळ, समुद्री शंख-शिंपले, समुद्रपुष्प, खेकडे इत्यादींचा सजावटीसाठी उपयोग करतात. गोड्या पाण्याच्या जलजीवालयापेक्षा सागरी जलजीवालय खर्चिक असून त्यासाठी विशेष व्यवस्था करणे गरजेचे असते. सार्वजनिक सागरी जलजीवालयात डॉल्फिन, सील, व्हेल, मुशी, पाकट व कासवे यांसारखे मोठ्या आकाराचे, तसेच समुद्री घोडा, कोळंबी, खेकडा, शेवंडा, समुद्रतारा, म्हाकूळ असे तुलनेने लहान आकाराचे जलचर ठेवतात.

जलजीवालयांमुळे जीवविज्ञानाच्या विदयार्थ्यांना  जिवंत जलचरांचा अभ्यास करता येतो. या प्राण्यांसंबंधी संशोधन करता येते. संशोधनादवारे या जलचरांचे जीवनचक्र व प्रजनन यांचा अभ्यास करून काही जलचरांचे व्यापारी उत्पादन घेता येते. जलजीवालयांमुळे अनेक जलचरांच्या जातींचे संरक्षण आणि संवर्धन करता येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा