प्राणिसृष्टीचा एक संघ. रज्जुमान संघात सु. ५३,००० पेक्षा अधिक जातींचा समावेश केला गेला आहे. या संघातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जीवनचक्रामध्ये कोणत्या तरी एका टप्प्याला पाठीच्या भागात एक ताठ व दांड्यासारखी संरचना म्हणजे पृष्ठरज्जू (नोटोकॉर्ड) असतो. म्हणून या संघाला ‘पृष्ठरज्जुमान संघ’ असेही म्हणतात. या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्‍वसममित व देहगुहायुक्त असते. तसेच हे प्राणी ड्युटेरोस्टोमिक असतात. ड्युटेरोस्टोमिक प्राण्यांत भ्रूणाच्या विकास प्रक्रियेमध्ये आद्यभ्रूणातील गर्भांत्राच्या कोरक (ब्लास्टोपोअर) रंध्रापासून गुदद्वार बनते. याउलट प्रोटोस्टोमिक प्राण्यांमध्ये कोरक रंध्रापासून मुख बनते.

रज्जुमान संघातील प्राण्यांमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात आणि ती लक्षणे त्यांच्या जीवनचक्राच्या कोणत्या तरी एका टप्प्याला दिसून येतात. (१) पृष्ठरज्जू : हा कास्थींपासून बनलेला असून तो शरीराच्या आत लांब वाढलेला असतो. पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जूचे रूपांतर पाठीच्या कण्यात झालेले असते आणि या गटातील जलचर प्राणी शेपटी हालवून पाठीच्या कण्याद्वारे पाण्यात पोहतात. (२) पृष्ठ चेतानलिका : मासे आणि इतर पृष्ठवंशींमध्ये या नलिकेचे रूपांतर मेरूरज्जूमध्ये झालेले असते. मेरूरज्जू हा चेतासंस्थेच्या संदेशवहनाचा मुख्य मार्ग असतो. (३) ग्रसनी विदरे (स्लिट किंवा चिरा) : तोंडाच्या आत घशाच्या भागात ग्रसनी असते. माशांमध्ये ग्रसनी विदरांचे रूपांतर कल्ल्यांमध्ये झालेले असते. मात्र काही पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये त्याचे रूपांतरण अन्न भक्षणगाळणीमध्ये झालेले असते. या भक्षणगाळणीने तोंडावाटे घेतलेल्या पाण्यातील अन्न वेगळे करून पाणी बाहेर टाकले जाते. (४) पश्चगुद शेपटी : या सर्व प्राण्यांना गुदद्वारावरती स्नायूंपासून बनलेली शेपटी असते. (५) पूर्व-अवटू ग्रंथी : या प्राण्यांच्या ग्रसनीच्या अधर भित्तीवर एक श्लेष्म स्रवणारी संरचना असते. अन्नभक्षण करणाऱ्या प्राण्यांमध्ये अन्न जमा करताना ती श्लेष्म स्रवते, ज्याद्वारे अन्न ग्रासनलीकडे वाहून नेले जाते. या ग्रंथीत आयोडीन साठलेले असते. म्हणून तिला पृष्ठवंशीमधील अवटू ग्रंथीची पूर्वगामी ग्रंथी मानतात.

रज्जुमान संघाचे विभाजन पुढील तीन उपसंघामध्ये केले जाते: (१) पुच्छरज्जुमान, (२) शीर्षरज्जुमान व (३) पृष्ठवंशी.

(१) पुच्छरज्जुमान : (ट्युनिकेटा). या उपसंघातील प्राण्यांचे शरीर चर्मसदृश आवरणाने वेढलेले असते. ते आवरण प्रथिने व कर्बोदके यांपासून बनलेले असून ती रचना कंचुकीसारखी (ट्युनिक) असल्यामुळे त्यांना कंचुकयुक्त प्राणी (ट्युनिकेट) म्हणतात. सामान्यपणे ते उभयलिंगी असतात. रूपांतरण होत असताना त्यांच्यातील रज्जुमान संघाची बहुतेक लक्षणे नाहिशी होतात. हे अवनत रूपांतरणाचे उदाहरण आहे. प्रथमदर्शनी हे प्राणी रज्जुमान संघातील असतील, असे वाटत नाही. या सर्व प्राण्यांच्या डिंभावस्थेत मंडुकासारखी (टॅडपोल) शेपटी असते. या शेपटीमध्ये पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे पृष्ठरज्जू असतो. म्हणून या उपसंघाला यूरोकॉर्डेटा असेही म्हणतात. यूरो या ग्रीक शब्दाचा अर्थ शेपटी असा होतो. या प्राण्यांना प्रकाशसंवेदी इंद्रिये, विचलनसंवेदी इंद्रिये व अविकसित स्वरूपाचा मेंदू असतो. शरीर पाण्याने भरलेले असून शरीराला श्वसन व भक्षण यांसाठी दोन नळीदार रंध्रे असतात. त्यांपैकी एका (अंतर्वाही) रंध्रातून अन्न व पाणी आत घेतले जाते, या दोन रंध्रांमधील मार्गात पाणी गाळून अन्न वेगळे करण्याची, श्वसनाची आणि पचनाची इंद्रिये असतात. दुसऱ्या (बहिर्वाही) रंध्रातून पाणी बाहेर टाकले जाते.

ट्युनिकेट उपसंघाचे ॲसिडियासिया, थॅलिॲसिया आणि लार्व्हासिया असे तीन वर्ग केले जातात.

(अ) ॲसिडियासिया : या वर्गातील प्राणी जगभरातील समुद्राच्या उथळ पाण्यात आढळतात. ते तळाशी असलेल्या एखाद्या खडकाला किंवा शंखाला पकडून राहतात. शरीर पिशवीसारखे असून त्यांवर कठीण आवरण असते. त्यांपैकी काही एकेकटे असतात, काही समूहाने दिसून येतात आणि अनेकांची मुकुलनाद्वारे वसाहत बनलेली असते. या वसाहतीतील वैयक्तिक सजीवाला जीवक म्हणतात. त्यांच्या वसाहतीचा व्यास काही मीटर असू शकतो. उदा., समुद्र पिचकारी (सी स्क्वर्ट).

(आ) थॅलिॲसिया : या वर्गातील प्राणी समुद्राच्या पृष्ठभागावर मुक्तपणे तरंगत त्यांचा जीवनकाल घालवितात. ते प्लवकांवर जगतात. शरीर लहान परंतु आकार पिंपासारखा असतो. ते एकेकटे राहतात किंवा त्यांच्या जीवक वसाहती असतात. उदा., साल्पा, पायरोसोम्स, डोलिओलम इ.

(इ) लार्व्हासिया : या वर्गातील प्रौढ प्राण्यांचे शरीर डिंभावस्थेतील मंडुकासारखेच असते. शरीराचे धड व शेपटी हे भाग ठळकपणे वेगळे दिसतात. अशा प्राण्यांना, ज्यांच्या प्रौढावस्थेत डिंभावस्थेतील लक्षणे टिकून राहतात त्यांना, चिरडिंभक (निओटेनिक) म्हणतात. शरीराची लांबी १ सेंमी.पेक्षा कमी असते. जगभरातील समुद्रात ते एकेकटे व मुक्तपणे संचार करताना दिसून येतात. उदा., ऑईकोप्‍लुरा.

(२) शीर्षरज्जुमान : (सेफॅलोकॉर्डेटा). या उपसंघातील प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू शीर्ष टोकापासून शेपटीपर्यंत असतो. आकार माशासारखा असून लांबी ४-५ सेंमी. असते. समुद्राच्या उथळ पाण्यातील वाळूत ते बिळे करून राहतात. त्यांचे स्नायू समखंडी असतात. पृष्ठरज्जू आणि मज्जारज्जू स्थायी असतात. ग्रसनी मोठी असून तिच्यावर कल्लाविदरे असतात. देहगुहा मोठी व खंडयुक्त असते. त्यांच्यात ओळखण्यासारखे बाह्यशीर्ष, मेंदू व जबडे नसतात. हे प्राणी एकलिंगी असतात. या उपसंघातील प्राण्यांची शरीररचना पृष्ठवंशी प्राण्यांच्या निर्मितीची सूचक असून त्यांच्या सु. ४५ जाती आहेत. उदा.,अँफिऑक्सस. (पहा : कु. वि. भाग – १ अँफिऑक्सस).

(३) पृष्ठवंशी : (व्हर्टिब्रेटा). या उपसंघातील प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जूचे रूपांतर पृष्ठवंशात अथवा कशेरू स्तंभात झालेले असते. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असून तो पाठीच्या बाजूस असतो. म्हणून त्याला पाठीचा कणा म्हणतात. या प्राण्यांत शीर्ष पूर्ण विकसित झालेले असते. मेंदू कवटीत संरक्षित असतो. अंत:कंकाल संधियुक्त असून कास्थिमय अथवा अस्थिमय असते. पृष्ठवंशी प्राण्यांना शीर्ष, मान, धड, पुच्छ आणि पाठीच्या कण्याजवळून निघालेल्या उपांगांच्या दोन जोड्या असतात. त्यांना अग्रपाद व पश्चपाद म्हणतात. त्यांच्या सु. ५१,००० जाती आहेत. शीर्षरज्जुमान उपसंघातील प्राण्यांमध्ये उपांगांची जोडी नसली तरी उपांगे निर्मितीसंबंधित सु. १२८ जनुके आढळली आहेत. या जनुकांना ‘समूह जनुके’ म्हणतात. ही जनुके मत्स्य अधिवर्ग तसेच उभयचर, सरिसृप, पक्षी आणि स्तनी वर्गातील प्राण्यांमध्ये विविध स्वरूपात अभिव्यक्त झाल्याने या प्राण्यांची उपांगे विकसित झाली आहेत. पृष्ठवंशी प्राण्यांचे जंभहीन आणि जंभयुक्त असे दोन विभाग करण्यात आलेले आहेत:

(अ) जंभहीन : या विभागातील प्राण्यांना जबडे नसतात. यात गोलमुखी हा एकच वर्ग आहे. उदा., पेट्रोमायझॉन, मिक्झिन.

(ब) जंभयुक्त : या विभागातील प्राण्यांना जबडे असतात. यात खालील सहा वर्ग आहेत.

१) कास्थिमत्स्य: अंत:कंकाल कास्थिमय असते. उदा., मुशी, पाकट इ. २) अस्थिमत्स्य: अंत:कंकाल अस्थिमय असते. उदा., रोहू, कटला, बोंबिल, बांगडा  इ. ३) उभयचर: हे प्राणी जलचर आणि भूचर असे दोन्ही जीवन जगतात. उदा., बेडूक, भेक, सॅलॅमँडर इ. ४) सरीसृप: हे मुख्यत: सरपटणारे प्राणी असून त्यातील काही पाण्यात राहतात. उदा., सरडा, पाल, साप, कासव इ. ५) पक्षी: हे प्राणी चोच, पिसे आणि पंखांनी युक्त असून आकाशात उडतात. उदा., चिमणी, कबुतर, बगळा इ. ६) स्तनी: या प्राण्यांना स्तन असतात. उदा., उंदीर, ससा, वटवाघूळ इ. (पहा: पृष्ठवंशी).

प्रतिक्रिया व्यक्त करा