मिर्टेसी कुलातील ही उंच व बहुपर्णी वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव यूकॅलिप्टस ग्लोब्युलस आहे. ब्लू गम किंवा गम ट्री या इंग्रजी नावांनी ही ओळखली जाते. या वनस्पतीचे मूलस्थान ऑस्ट्रेलिया असून तेथील सर्वांत उंच व सदाहरित वृक्ष आहे. याच्या सु. ५४० जाती आहेत. यूकॅलिप्टसच्या अनेक जातींची लागवड त्यांच्या आर्थिक महत्त्वामुळे केली जाते. भारतात सु. १०० जातींच्या वृक्षांची लागवड यशस्वी रीत्या करण्यात आली आहे. तमिळनाडूतील ऊदकमंडलम् परिसरात निलगिरी टेकड्यांवर या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याने त्याला निलगिरी वृक्ष नाव पडले आहे.
निलगिरी वृक्ष सु. ९० मी. उंचीपर्यंत वाढतो. खोड सरळ व मऊ असून त्यावरील त्वक्षा तुकड्यातुकड्यांत गळून पडते. लहान रोपटे असताना पाने समोरासमोर, तर वृक्षात पाने एकाआड एक, भाल्यासारखी, २०–२५ सेंमी. लांब, रुंद, थोडीशी जाडसर आणि वळणदार असतात. फुले मोठी, घंटेसारखी, पांढरी, क्वचित पिवळट वा लालसर, १–३ एकत्र आणि कक्षस्थ येतात. पुमंगात अनेक पुंकेसर असतात. फळ कठीण व लहान करंड्याप्रमाणे असून ते करंड्याप्रमाणे उघडते. बिया लहान व अनेक असतात.
निलगिरीची लाकडासाठी तसेच सावलीसाठी उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत लागवड केली जाते. त्यापासून मिळणारे लाकूड जहाज बांधणीसाठी, सिलीपाट (रेल्वे स्लीपर्स), वीज व तारेचे खांब म्हणून वापरतात. पाने ऑस्ट्रेलियातील कोआला या सस्तन प्राण्याचे मुख्य खाद्य आहे. पानांपासून तेल काढतात. या तेलात यूकॅलिप्टॉल हे संयुग असते. तेल झोंबणारे (जहाल), कडू, पाचक, वायुनाशी, कफ व वात स्थितीत उपयुक्त असते. ते जंतुरोधक व दुर्गंधीरोधी असून कफ पातळ करण्यासाठी वापरतात. ते श्वासनलिकादाह, न्यूमोनिया व इतर श्वसन संस्थेच्या विकारांवर उपयुक्त असते. मात्र, तेलाचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यास उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.