सपुष्प वनस्पतींचा प्रजननासाठीचा अवयव. वनस्पतीचे स्व व परपरागणाद्वारे प्रजनन घडवून आणणे हे फुलाचे मुख्य कार्य असते. अनेक फुले प्राण्यांना आकर्षक वाटावीत आणि त्या प्राण्यांनी फुलातील परागकण वाहून नेण्यास मदत करावी अशा पद्धतीने उत्क्रांत झालेली असतात. फलनानंतर फुलातील अंडाशय विकसित होऊन त्याचे फळात रूपांतर होते. फुलांचे सामान्यपणे शाकीय आणि लैंगिक असे दोन भाग केले जातात. शाकीय भागात परिदलपुंज व त्यातील संरचना यांचा, तर लैंगिक भागात प्रजनन इंद्रियांचा समावेश होतो.

फुलातील पुष्पपर्णाची एकात एक
असलेली चार मंडले

फूल हे एक प्रकारचा, विशिष्ट कार्य असलेला प्ररोह आहे. फुलाच्या खोडासारख्या (अक्षासारख्या) भागाला ‘पुष्पाक्ष’ म्हणतात. पुष्पाक्षाच्या तळभागाला पुष्पवृंत किंवा देठ म्हणतात. पुष्पवृंताच्या टोकाशी असलेल्या पसरट भागाला ‘पुष्पासन’ म्हणतात. पुष्पासनावर फुलातील पुष्पपर्णांची एकात एक अशी रचलेली चार मंडले असतात. सर्वांत बाहेरचे मंडल हिरवट दलांचे असून त्याला ‘निदलपुंज’ व त्याच्या सुट्या दलांना ‘निदले’ म्हणतात. ते वेष्टनासारखे असून त्याद्वारे कळीचे संरक्षण होते. त्याच्या आत ‘दलपुंज’ असून त्याच्या दलांना ‘दले’ किंवा ‘पाकळ्या’ म्हणतात; त्यांचा उपयोग प्राण्यांना परागणासाठी आकर्षित करण्यासाठी होतो. दले आणि निदले यांना एकत्रितपणे परिदले म्हणतात. काही फुलांमध्ये निदलपुंज व दलपुंज जुळलेले असतात. अशा फुलांना ‘संयुक्त परिदली’ म्हणतात. फूल उमलण्यापूर्वी त्यातील पुष्पपर्णे अविकसित असून ती कमी जागेत सामावलेली असतात. फुलाच्या या अवस्थेला ‘कळी’ म्हणतात. कळीमध्ये निदलपुंज व दलपुंज स्वत:भोवती वेगवेगळ्या प्रकारे दुमडलेली असतात आणि दोन्ही पुंज एकमेकांशी जुळलेली असतात. त्यांच्या रचनेला ‘कलिकारचना’ किंवा ‘कलिकांतर्विन्यास’ म्हणतात.

दलपुंजाच्या आत तंतूंसारख्या दलांचे म्हणजे पुंकेसरांचे मंडल असते. त्याला ‘पुमंग’ म्हणतात. ते वनस्पतीचे नर प्रजनन इंद्रिय आहे. सर्वांत आतील मंडल जायांग असून ते वनस्पतीचे मादी प्रजनन इंद्रिय आहे. त्यांत एक किंवा अधिक अंडपी  असतात. ज्या फुलामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग व जायांग अशी पुष्पपर्णाची चारही मंडले असतात त्याला ‘पूर्ण पुष्प’ म्हणतात.

काही फुले झाडांवर एकेकटी, तर काही अनेक व समूहाने म्हणजे फुलोऱ्यात येतात. काही फुलांचे देठ आखूड किंवा लांब असतात, तर काही फुलांना देठ नसतात. देठ असलेल्या फुलांना ‘सवृंत’, तर नसलेल्या फुलांना ‘अवृंत’ म्हणतात.

पुष्पासन : पुष्पवृंताचा म्हणजे देठाचा हा पसरट भाग असून त्यावर पुष्पपर्णे आधारलेली असतात. काही फुलांमध्ये पुष्पासन सुळक्यासारखे किंवा दंडगोलाप्रमाणे (उदा., सीताफळ), काहींमध्ये फुगीर (उदा., रासबेरी), तर काहींमध्ये ते मोठे व भोवऱ्यासारखे (उदा., कमळ) असते. गुलाबात ते खोलगट पेल्यासारखे असते. कधीकधी ते पाकळ्यांच्या वर वाढून पुंकेसर व पुढे आणखी वाढून अंडपीला आधार देते. काही फुलांमध्ये पुष्पासन आणखी वाढून फळांच्या भागांना आधारभूत बनते (उदा., बडिशेप, गाजर). काही फुलांमध्ये अंडाशय पुष्पासनाच्या टोकावर असते, त्यास ‘ऊर्ध्वस्थ’ अंडाशय म्हणतात. काही फुलातील अंडाशय पुष्पासनाच्या आत असते, त्यास ‘निम्न’ किंवा ‘अध:स्थ’ अंडाशय म्हणतात.

सूर्यफुलाचा उभा छेद

सहपत्र : फुले (फुलोरा) ज्या पानांसारख्या दिसणाऱ्या अवयवाच्या कक्षेतून उगवतात त्यांना ‘सहपत्रे’ म्हणतात. त्यांचे कार्य संरक्षण व आकर्षकता असे दोन्ही असते. जास्वंदाच्या फुलामध्ये अनेक सहपत्रांचे एक मंडल निदलपुंजाखाली असते. अशा मंडलास ‘उपनिदलपुंज’ म्हणतात. सूर्यफूल व कोथिंबीर यांच्या फुलोऱ्याखालच्या अनेक सहपत्रांच्या मंडलास ‘परिचक्र’ म्हणतात. गवतांच्या फुलांमध्ये शुष्क व पातळ किंवा जाड सहपत्रे (तुषे) असतात. बुगनविलियाची फुले पाकळ्यांसारख्या रंगीत सहपत्रांमुळे शोभिवंत दिसतात. अळू व नारळ यांच्या संपूर्ण फुलोऱ्याच्या संरक्षणासाठी सहपत्रे मोठी असतात. केवड्याची नर फुलोऱ्यावरची सहपत्रे सुवासिक असतात.

निदलपुंज : पुष्पासनावरच्या सर्वांत बाहेरच्या मंडलास ‘निदलपुंज’ म्हणतात. त्याचा रंग हिरवा असल्यामुळे त्यात अन्ननिर्मिती होते. द्विदल वनस्पतीमध्ये चार किंवा पाच निदले असतात. एकदल वनस्पतीमध्ये निदले तीन किंवा तीनच्या पटीत असतात. निदले एकमेकांना जुळलेली असल्यास त्यास ‘संयुक्तनिदली’, तर एकमेकांपासून सुटी असल्यास ‘पृथक्‌निदली’ म्हणतात. उदा., धोतरा, जास्वंद. बऱ्याच फुलांमध्ये परागण होऊन गेल्यानंतर निदलपुंज गळून पडतो. टोमॅटो व वांगे या फुलांमध्ये निदलपुंज फळाला चिकटून राहतो. वांग्यासारख्या काही फळांमध्ये तो फळाबरोबर वाढतो.

दलपुंज : पुष्पासनाच्या बाहेरून दुसऱ्या मंडलास ‘दलपुंज’ म्हणतात. सामान्यपणे द्विदल वनस्पतींच्या दलपुंजात चार किंवा पाच दले म्हणजे पाकळ्या असतात. दले विविध रंगांची असल्याने ती प्राण्यांना परागणासाठी आकर्षित करतात. हिरव्या चाफ्याची दले हिरवी, तर जाई व मोगरा यांसारख्या रात्री उमलणाऱ्या फुलांची दले पांढरी असतात. गारवेल, धोतरा व तुळस यांच्या पाकळ्या एकमेकांशी जुळलेल्या असतात. त्यांना ‘संयुक्तदली’ म्हणतात. गुलाब व संकेश्वर अशा फुलांच्या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या असतात. त्यांना ‘मुक्तदली’ किंवा ‘पृथक्‌दली’ म्हणतात.

दलपुंजाच्या सममितीवरून त्याचे नियमित व अनियमित असे दोन प्रकार केले जातात. नियमित दलपुंजामध्ये अरीय सममिती पाहावयास मिळते आणि अशा दलपुंजाचा कोणत्याही व्यासातून उभा छेद घेतला असता होणारे दोन भाग एकरूप असतात. उदा., धोतरा, मुळा. अनियमित दलपुंजाचा असा उभा छेद फक्त एकच व्यास घेऊन मिळतो. उदा., तुळस, वाटाणा, गोकर्ण.

काही वेळा दलपुंजापासून एक अतिरिक्त मंडल तयार झालेले आढळते. ते मंडल दलपुंजापासून मुक्त किंवा त्याच्याशी जुळलेले असते. ते शल्क, तंतू किंवा पालीसारख्या दलांचे बनलेले असते. त्याला किरीट (तोरण) म्हणतात. उदा., डॅफोडिल, कृष्णकमळ. काही वेळा परिदलपुंजापासून एक पोकळ नलिका तयार झालेली असते. या नलिकेत मकरंद असल्यामुळे कीटक तिच्याकडे आकर्षित होतात. उदा., कण्हेर, तेरडा, लार्कस्पर.

फुलांतील प्रजनन इंद्रिये : प्रजनन प्रक्रियेत भाग घेणारे पुमंग आणि जायांग हे दोन्ही अवयव एकाच फुलात आढळून येणाऱ्या फुलाला ‘द्विलिंगी’ किंवा ‘उभयलिंगी’ म्हणतात; उदा., सदाफुली. काही फुलांत फक्त पुंकेसर किंवा फक्त अंडपी असतात. अशा फुलांना ‘एकलिंगी’ म्हणतात आणि त्या फुलांसाठी नर-फुले किंवा मादी-फुले अशी संज्ञा वापरतात. उदा., पपईची नर-फुले एका वृक्षावर, तर मादी-फुले दुसऱ्या वृक्षावर येतात. त्यामुळे पपईचे नर-वृक्ष व मादी-वृक्ष वेगवेगळे असतात. आंबा, काजू, रिठा इ. वृक्षावर एकलिंगी व द्विलिंगी अशी दोन्ही प्रकारांची फुले असतात. एकलिंगी फुलात कधीकधी दुसऱ्या लिंगाचा प्रजनन अवयव वंध्य रूपात असतो.

पुमंग : पुष्पासनाच्या बाहेरून तिसरे मंडल पुमंगाचे असते. ते फुलाचे नर प्रजनन इंद्रिय असून त्याच्या प्रत्येक दलास ‘पुंकेसर’ म्हणतात. त्याचे परागकोश आणि वृंत हे मुख्य भाग असतात. परागकोशाचे दोन कप्पे असून ते योजी या भागाद्वारे जुळलेले असतात. परागकोशाच्या प्रत्येक कप्प्यात दोन अशा एकूण चार परागपेशी असून त्यात असंख्य परागकण असतात. योजीच्या खालच्या भागाला वृंत जुळलेला असतो. पुंकेसरांची लांबी वृंताच्या लांबीवर अवलंबून असते. पुंकेसर बहुधा एकमेकांपासून तसेच निदलपुंजापासून किंवा दलपुंजांपासून विलग असतात. मात्र काही फुलांमध्ये ते विविध प्रकारे जुळलेले असतात.

पुंकेसर : पुंकेसर परस्परांना चिकटलेले असल्यास त्यास ‘संसंजन’ म्हणतात. त्यांचे पुढील प्रकार आहेत. (अ) एकवृंतसंधी : सर्व पुंकेसरांचे वृंत एकत्र जुळून एकाच गुच्छात असतात आणि परागकोश सुटे असतात. उदा., जास्वंद, कापूस. (आ) द्विवृंतसंधी : सर्व पुंकेसरांचे वृंत दोन गुच्छांत जुळलेले असतात. उदा., गोकर्ण, वाटाणा. (इ) बहुवृंतसंधी : सर्व पुंकेसरांच्या वृंतांचे दोनपेक्षा जास्त गुच्छ असतात. उदा., तुती, भोपळा. (उ) संयुक्त कोशी : जेव्हा परागकोश एकमेकांशी जुळलेले असतात, परंतु वृंत सुटे असतात. उदा., सूर्यफुलाचे बिंबपुष्पक.

काही फुलांमध्ये पुंकेसर निदलपुंजाशी, दलपुंजाशी अथवा जायांगाशी चिकटलेले असतात. त्याला ‘आसंजन’ म्हणतात. त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे असतात: (अ) निदललग्न: फुलातील पुंकेसर निदलपुंजाशी जुळलेले असतात. उदा., मधुमालती. (आ) दललग्न : फुलातील पुंकेसर दलपुंजाला चिकटून असतात. उदा., धोतरा, गारवेल. (इ) परिदललग्न : फुलातील पुंकेसर परिदलावर जुळलेले असतात. उदा., निशिगंध. (उ) पुंजायांग : फुलातील पुंकेसर जायांगाशी जुळलेला असतो. उदा. रुई, ऑर्किड.

फुलाच्या जायांगातील विविध भाग

जायांग : फुलात केंद्रस्थानी असलेले हे मंडल असून त्यात एक किंवा अनेक अंडपी असतात. अंडपी हे पानांचे रूपांतरण असून तिचे अंडाशय, कुक्षी व कुक्षिवृंत हे तीन भाग असतात. बहुअंडपी जायांगातील अंडपी सुटी असल्यास त्यांना ‘मुक्त अंडपी’ (उदा., सोनचाफा) आणि जुळलेली असल्यास ‘संयुक्त अंडपी’ (उदा., भोपळा) म्हणतात. काही बहुअंडपी वनस्पतींमध्ये अंडपींच्या दरम्यान पट (पडदे) असतात. या पटांची संख्या अंडपींच्या संख्येइतकी किंवा कमी असू शकते.

अंडाशय : अंडाशयामध्ये एक किंवा अनेक कोष्ठके (कप्पे) असतात. कोष्ठकांमध्ये गोलाकार व अंड्यासारख्या एक किंवा अनेक अविकसित बिया म्हणजे बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये एक अंडाकार पेशी असते. तिला ‘भ्रूणकोश’ म्हणतात. बीजांडास संरक्षण, आधार व अन्न पुरविणे ही अंडाशयाची कार्ये असतात. ज्यांच्या अंडपीत बीजांडे नसतात त्या जायांगाचा उल्लेख ‘वंध्य जायांग’ असा होतो.

बीजांड : बीजांडावर दोन आवरणे असतात, त्यांना ‘अध्यावरणे’ म्हणतात. अंडाशयाच्या भित्तीवर अन्न पुरविणाऱ्या ऊतींचा घडीसारखा उंचवटा म्हणजे ‘अपरा’ असते. प्रत्येक बीजांड अपरेशी एका वृंताद्वारे म्हणजे बीजांडवृंताद्वारे जोडलेला असतो. हा वृंत बीजांडाला जेथे जोडला जातो, त्याला ‘नाभिका’ म्हणतात. बीजांडवृंत बीजांडावर नाभिकेपलीकडे वाढून एक कंगोरा तयार करतो. त्याला ‘सेवनी’ म्हणतात. सेवनीच्या वरच्या टोकाला ‘निभाग’ म्हणतात. बीजांडाच्या मुख्य गाभ्याला ‘बीजांडकाय’ म्हणतात. बीजांडाला असलेल्या छिद्राला ‘बीजांडद्वार’ म्हणतात. त्यावर असलेली लंबगोल पेशी म्हणजे भ्रूणकोश.

कुक्षी : ही परागकणांच्या ग्रहणासाठी असून तिचा पृष्ठभाग खरबरीत, रोमश अथवा चिकट असतो; काही फुलांतील कुक्षींची रचना शाखायुक्त असते. जास्वदांच्या फुलातल्या कुक्षिवृंताच्या टोकास पाच शाखा असून त्या प्रत्येकीच्या टोकाला चकतीसारखी कुक्षी असते; अफू व कमळाच्या कुक्षीला अनेक शाखा असतात; लाल कण्हेरीच्या कुक्षीचा आकार डमरूसारखा असतो.

कुक्षिवृंत : हा भाग कधी लांब (उदा., मका), कधी आखूड (उदा., पपई), तर कधी जवळजवळ नसल्यासारखा असतो (उदा., अफू, कमळ). कुक्षिवृंत ही पोकळ नळी असते व ती अंडाशयाच्या टोकावरून निघते. काही वेळा ती अंडाशयाच्या बाजूने वळलेली असते (उदा., स्ट्रॉबेरी, सीताफळ) किंवा पुष्पासनात रुतलेल्या अंडाशयाखालून आल्यासारखी वाटते. कुक्षीला आधार देणे व परागकण ग्रहण करणे हे कुक्षिवृंताचे कार्य असते.

भ्रूणकोशाचा विकास : बीजांडात प्रारंभिक अवस्थेपासूनच भ्रूणकोशाची जनक पेशी असते. ही जनक पेशी आकाराने वाढते आणि दोनदा विभाजित होऊन तिच्यापासून चार महाबीजाणू तयार होतात. या प्रत्येक पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी असते. त्यांपैकी तीन पेशींचा ऱ्हास होतो, तर चौथी पेशी कार्यक्षम असते. याच पेशीतील केंद्रक विभागले जाते अणि तयार झालेली दोन जन्य केंद्रके भ्रूणकोशाच्या दोन विरुद्ध टोकांकडे (एक बीजांडद्वाराकडे व दुसरे निभागाकडे) सरकतात. ती केंद्रके पुन्हा विभागली जाऊन त्यांची संख्या चार होते. त्यानंतर प्रत्येक केंद्रक पुन्हा विभागले जाते आणि भ्रूणकोशात एकूण आठ केंद्रके तयार होतात. दोन्ही टोकांकडे म्हणजे ध्रुवाकडे चार केंद्रके अशी त्यांची रचना असते. भ्रूणकोशाचा आकार वाढतो व दोन्ही ध्रुवांकडून एकेक केंद्रक मध्यभागी येऊन ती केंद्रके जुळून जातात. याला ‘ध्रुवीय केंद्रक’ म्हणतात.

बीजांडद्वारापाशी असलेली तीन केंद्रके पातळ भित्तिकेने वेढली जाऊन त्यांचा अंडपरिवार बनतो. अंडपरिवारातील एक पेशी मादी-युग्मक म्हणजे अंडपेशी असते, तर अन्य दोन पेशींना सहायक पेशी म्हणतात. सहायक पेशी अल्पायू असतात. निभागाच्या बाजूला असलेली तीन केंद्रके एकत्रित होतात व त्यांपासून प्रतिपदस्य पेशी तयार होतात. या पेशींना विशिष्ट कार्य नसल्यामुळे त्या कालांतराने अकार्यक्षम होतात. फलनानंतर अंडपेशीपासून भ्रूण तयार होतो, तर ध्रुवीय केंद्रकापासून भ्रूणपोष तयार होतो.

सपुष्प वनस्पतींमधील दुहेरी फलन : दोन भिन्नलिंगी युग्मकांच्या संमीलनाला ‘फलन’ म्हणतात. सपुष्प वनस्पतींमध्ये, परागणानंतर परागकण कुक्षीवर जाऊन पडतात आणि परागकणापासून एक नळी (परागनलिका) तयार होते. प्रत्येक परागकणापासून एक अशा अनेक परागनलिका तयार होतात. परागनलिकेची वाढ कुक्षी व कुक्षिवृंत यांद्वारे स्रवलेली प्रथिने आणि शर्करा यांच्यामुळे होते. परागनलिका हळूहळू वाढते, कुक्षीमध्ये शिरते आणि कुक्षिवृंतामधून आत सरकत अंडाशयाच्या आत पोहोचते. परागकणात असलेल्या म्हणजेच परागनलिकेत आलेल्या शाकीय (कायिक) आणि जनन पेशी या दोन पेशींपैकी जनन पेशीचे विभाजन होऊन दोन शुक्रपेशी (पुं-युग्मके) तयार होतात. शाकीय पेशी कालांतराने अकार्यक्षम होते. परागनलिका जसजशी लांब होत जाते, तशी पुं-युग्मके परागनलिकेच्या टोकाशी पोहोचतात. परागनलिका अंडाशयातील एखाद्या बीजांडाच्या छिद्रातून आत घुसते, तेथे तिचे टोक विरघळले जाऊन पुं-युग्मके मुक्त होतात. त्यांपैकी एक पुं-युग्मक आणि अंडपेशी यांचे संमीलन होते, तर दुसरे पुं-युग्मक अधिक आत शिरते व त्याचे ध्रुवीय केंद्रकाशी संमीलन घडून येते. फलनाच्या या प्रकारात युग्मकांच्या दोन जोड्यांचे संमीलन होत असल्याने त्यास ‘दुहेरी फलन’ म्हणतात व ते सपुष्प वनस्पतींचे वैशिष्ट्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा