विद्युत् ऊर्जा निर्माण करताना व या ऊर्जेचा ग्राहकांना पुरवठा करताना आवश्यक असलेल्या आर्थिक खर्चाचे योग्य प्रकारे नियोजन करणे नेहमीच गरजेचे असते. असे केल्याने ग्राहकांना अल्प दरात वीज पुरविणे शक्य होते.

विद्युत् ऊर्जेची निर्मिती व त्या ऊर्जेचे वितरण करण्यासाठी जो आर्थिक खर्च करावा लागतो. त्याचे प्रामुख्याने दोन भाग होतात. ते भाग म्हणजे (१) स्थायी खर्च (Capital expenditure) व (२) परिवर्ती खर्च (Running expenditure).

स्थायी खर्चामध्ये खालील साहित्य उपलब्ध करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश होतो.

  • विद्युत् जनित्रे (Generators)
  • विद्युत् रोहित्रे (Transformers)
  • विद्युत् ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या तारांचे जाळे (Transmission and Distribution network)
  • हे जाळे उभे करण्यासाठी लागणारे मनोरे (Towers) व खांब (Poles)
  • सर्व यंत्रणेसाठी आवश्यक असलेले संरक्षक साहित्य. यामध्ये मंडल विभंगक (Circuit breakers), निरनिराळ्या प्रकारचे खंडक (Switches) इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
  • वर (१) ते (५) यामध्ये निर्देश केलेल्या सर्व साहित्याची कायमस्वरूपी उभारणी करण्यासाठी इमारती व अन्य बांधकाम खर्च व प्रत्यक्ष उभारणी खर्च (Installation expenditure)

परिवर्ती खर्चामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • वरील विभागात स्थायी खर्चामध्ये नमूद केलेल्या साहित्याची कायमस्वरूपी देखभाल (maintenance) करण्यासाठी आवश्यक खर्च त्या साहित्यासाठी कालानुरूप काही दुरुस्त्या कराव्या लागल्या तर त्यासाठी येणारा खर्च.
  • विद्युत् जनित्रे चालविण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा (Fuel) व आवश्यक त्या मनुष्यबळाचा पगार खर्च.
  • सर्व विद्युत् ऊर्जा वितरण यंत्रणा, नीट पद्धतीने राबविण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. या मनुष्यबळास द्यावा लागणारा मासिक पगार व इतर भत्ते.
  • दैनंदिन कामकाजासाठी दूरध्वनी, स्थानिक अभिगमन यासाठी लागणारा खर्च व अन्य कार्यालयीन खर्च.

याठिकाणी वर उल्लेख केलेल्या सर्व खर्चांव्यतिरिक्त आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याची दखल घेणे आवश्यक असते. तो मुद्दा म्हणजे विद्युत् ऊर्जेचा होणारा क्षय (Loss). विद्युत् जनित्रामध्ये निर्माण झालेली ऊर्जा अनेक घटकांमार्फत ग्राहकांपर्यंत पोचविली जाते. या घटकांमध्ये रोहित्रे, तारांचे जाळे, संपूर्ण संरक्षक साहित्य इत्यादी गोष्टी  असतात. या घटकांमधून ऊर्जेचा पुरवठा करताना, काही प्रमाणात ऊर्जेचा क्षय (loss) होतो. हा क्षय  ५—२५% इतका असतो. याचा अर्थ असा की, ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी लागणारा, वर उल्लेख केलेला सर्व खर्च, ग्राहकांकडून वसूल करावा लागतो व त्यानुसार ग्राहकाची देयक रक्कम (bill) ठरविली जाते. ग्राहकांना पुरविलेली ऊर्जा ‘किलो वॅट अवर’ (kWh) या परिमाणात मोजली जाते. म्हणजे देयकाची रक्कम ‘क्ष’ रुपये प्रति किलो वॅट अवर अशी ठरविली. ग्राहकास परवडेल अशा दरात विद्युत ऊर्जा दिली जावी यासाठी ‘क्ष’ ही किंमत कमीत कमी रहावी, असा प्रयत्न नेहमीच केला जातो.

संदर्भ :

  • Bhatnagar, U. S.; Chakrabarti, A.; Gupta, P.V.; Rai, Dhanpat; Soni, M.L. & Co.,  A Text book on Power System Engineering, New Delhi.
  • Chand, S.; Mehta, V.K. & Co., Principles of Power Systems, New Delhi.

समीक्षक – उज्ज्वला माटे

प्रतिक्रिया व्यक्त करा