कोरांटी : फांदी व फुले

मध्यम उंचीचे बहुवार्षिक फुलझाड. ही वनस्पती अ‍ॅकँथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बार्लेरिया प्रिओनिटीस आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांतील उष्ण भागात या वनस्पतीला वज्रदंती असेही म्हणतात. भारतात कोकण, दख्खन पठार व गुजरात या भागांत तिचा प्रसार झालेला दिसतो. मूलत: कुंपणाकरिता या वनस्पतीचा वापर केलेला आढळतो.

कोरांटीचे झुडूप ०.६ ते १.५ मी. उंचीपर्यंत वाढते. खोड काटेरी व फांद्या चौकोनी असतात. तसेच खोड आणि फांद्या मजबूत व मऊ असून रंगाने किंचित करड्या व राखाडी असतात. पाने लांबट गोल असून त्यांच्या बगलेत काटे असतात. फुले खालच्या भागात पानांच्या बगलेत व एकटी तर वरच्या भागात कणसाप्रमाणे फुलोर्‍यात येतात. फुले नाजूक, पिवळी व नरसाळ्याप्रमाणे असून त्यांतून लांब पुंकेसर बाहेर आलेले दिसतात. जांभळट, निळी आणि पांढरी फुले असलेले प्रकारही आढळतात. फुलांच्या रंगावरून या वनस्पतीच्या चार जाती ओळखल्या जातात. फळ (बोंड) लंबवर्तुळाकार, लांब निमुळत्या चोचीसहीत व द्विबीज असते. बिया रेशमी व केसाळ असतात.

कोरांटी ही वनस्पती प्रामुख्याने फुलांसाठी, कुंपणासाठी आणि बागेत शोभेसाठी लावतात. मुळांचा लेप केसतूड आणि ग्रंथियुक्त सुजेवर लावतात. हालणार्‍या दातांसाठी काढ्याच्या गुळण्या करतात. वाळलेली साल डांग्या खोकल्यावर देतात. खोड आणि पाने गोड्या तेलात उकळून बनलेले औषधियुक्त तेल जखमेवर लावतात. पानांचा रस पावसाळ्यात पायांना भेगा पडू नये म्हणून लावतात.