शिवण (मेलिना आर्बोरिया) : (१) वृक्ष, (२) पाने, (३) फुले, (४) फळे.

(काश्मीर ट्री/व्हाइट टिक). एक पानझडी वृक्ष. शिवण हा वृक्ष लॅमिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिना आर्बोरिया  आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएटनाम व दक्षिण चीन या देशांत तो नैसर्गिकरित्या वाढलेला दिसून येतो. तो एक उपयोगी वृक्ष असल्याने मलेशिया, सिएरा लिओन, नायजेरिया आणि इतर अनेक देशांत त्याची लागवड करण्यात आली आहे. खासकरून बागांमधून आणि रस्त्याच्या दुतर्फा शोभेसाठी हा वृक्ष लावला जातो. भारतात सु. १,५०० मी. उंचीपर्यंतच्या भागात तो वाढलेला दिसून येतो. हिमालयाच्या पायथ्याशी काश्मीर, तसेच आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा इत्यादी पूर्वेकडील राज्यांत तो मोठ्या प्रमाणांत आढळतो. गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांत त्याची लागवड केली जाते. जेथे ७००–४,५०० मिमी. पाऊस पडतो अशा ओलसर, घाटांच्या प्रदेशांत हा वृक्ष वाढतो. मात्र पाणी साचून राहत असलेल्या मृदेमध्ये त्याची वाढ खुंटते.

शिवण जलद वाढणारा वृक्ष असून सु. १८ मी.पर्यंत उंच वाढतो. पूर्ण वाढलेल्या या वृक्षाच्या खोडाचा घेर १.२–४ मी. असतो. खोडाच्या सालीलगतच हरितद्रव्याचा थर असल्याने खोड बाहेरून साधारणपणे हिरव्या रंगाचे दिसते. बहुधा खोड ६–९ मी. सरळ उंच वाढलेले असून या उंचीपर्यंत त्याला फांद्या नसतात. कोवळ्या भागांवर दाट मखमली लोम असते. पाने साधी, ७.५ सेंमी. लांब, समोरासमोर, रुंद, हृदयाच्या आकाराची, ग्रंथियुक्त आणि लांब देठाची असतात. फुले फांद्यांच्या टोकाला फुलोऱ्यात येत असून फुले पिवळी, सु. २.५ सेंमी. व्यासाची असून त्यांवर तपकिरी छटा असतात. फळे रसाळ, जांभळट आणि लांबट गोल असतात. फळ खाद्य असून ते गडद हिरवे, आठळीयुक्त आणि अंडाकृती, २–२.५ सेंमी. लांब असते. फळात १-२ बिया असून पिकल्यावर ते पिवळट नारिंगी होते.

शिवण हा वृक्ष इमारती लाकूड आणि आयुर्वेदिक औषधी यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे लाकूड कागदाचा लगदा, फळ्या, काडेपेटीतील काड्या, काष्ठशिल्प, संगीत उपकरणे, खेळणी, कपाटे इत्यादी बनविण्यासाठी उपयोगात आणतात. पाने जनावरांना चारा म्हणून, रेशमाच्या कीटकांना अन्न म्हणून खायला घालतात. कॉफी आणि कोको या वृक्षांना सावली मिळावी म्हणून त्यांच्या मळ्यांत शिवण वृक्ष मुद्दाम लावतात. आयुर्वेदानुसार या वृक्षाची मुळे कडू, भूकवर्धक, सारक व दुग्धवर्धक असतात; तसेच फुले शीतल असून कोड आणि रक्तदाब यांवर देतात. खोडाची साल ज्वरनाशक व पाचक असते.