भूकंप मार्गदर्शक सूचना १६
दगडापासून बांधलेल्या भिंती मजबूत वाटल्या तरी त्या भूकंपाच्या धक्यापुढे तग धरू शकत नाहीत. भूकंप होत असताना जी भूकंपने होतात त्यातून निर्माण होणारे धक्के सहन करू शकण्याकरिता इमारतीच्या बांधकामात लवचिकता असावी लागते. अशी लवचिकता पारंपरिक दगडी बांधकामांच्या इमारतीत नसते. त्यामुळे भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपरोधक भिंती बांधण्याकरिता विशेष तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो.
प्राचीन काळापासून इमारतीच्या बांधकामामध्ये अत्यंत टणक, टिकाऊ आणि स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अगदी ग्रामीण भागातील इमारतीपासून राजमहाल किंवा मंदिरे बांधतानाही दगडी भिंतींचा वापर होतो. ग्रामीण भागातील इमारती नदीच्या किंवा ओढ्याच्या पात्रातील गोलाकार दगड आणि चिखलाचा मसाला (मिश्रण) यांचा वापर करून सुमारे ६० ते १२० सेंमी. इतक्या जाडीच्या भिंती बांधण्यात येतात. या भिंती एका दगडावर एक अशा रचून बांधलेल्या असल्याने त्यामध्ये विटांच्या भिंतीप्रमाणे स्तर नसतात. अनेक इमारतीमध्ये लाकडी छपरावर चिखलाचा जाड थर दिला जातो व हे छप्पर दगडी भिंतींच्या आधारावर उभे राहते. या छताला आधार देण्याकरिता भिंतीच्या वरच्या बाजूला सुट्या दगडांचे डबर आणि चिखलाचा मसाला वापरला जातो.
मोठे दगड वापरून बांधलेल्या मोठ्या जाडीच्या भिंती अतिशय मजबूत समजल्या जातात. परंतु भूकंपरोधक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने त्या कुचकामी ठरतात. या भिंतींची अतिरिक्त जाडी, भिंतींच्या दोन पाख्यामध्ये (Beam) मजबूत जोडणीचा अभाव आणि योग्य आकाराच्या दगडाऐवजी गोलाकार दगडांचा वापर यामुळे ग्रीस, इराण, तुर्कस्थान पूर्वीचा युगोस्लाव्हिया व भारत आदि देशांत मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात किल्लारी येथे सन १९९३ साली झालेल्या भूकंपात आठ हजारांहून अधिक लोक पारंपरिक दगडी बांधकामाच्या घरांच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून मरण पावले. अशाच प्रकारच्या बांधकामामुळे सन २००१ च्या भूज येथील भूकंपात तेरा हजारांपेक्षा अधिक लोक बळी पडले.
भूकंपामुळे दगडी बांधकामांच्या इमारतींचे नुकसान होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
अ) क्षितिज पातळीत (जमिनीशी समांतर) दोन सुस्पष्ट पाखांमध्ये भिंतींचे विभाजन होते.
आ) कोपऱ्यावर आणि सांध्यांच्या ठिकाणी भिंती विलग होतात. (आकृती २)
क) कमजोर पद्धतीने बांधलेले छत भिंतींपासून विलग होते आणि कोसळते.
ड) भिंती ढासळून संपूर्ण घर कोसळते.
भूकंपरोधक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :
पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या दगडी इमारती भूकंपादरम्यान धोकादायक ठरतात म्हणून त्या भूकंपप्रवण प्रदेशामध्ये टाळल्या पाहिजेत. भारतीय मानक आय. एस. १३२८८-१९९३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष भूकंपरोधक तंत्रज्ञान आणि बांधकाम वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केल्याने अशा इमारतींची भूकंपरोधकता वाढून जीवितहानी कमी करता येऊ शकते.
या भूकंपरोधक बांधकामातील प्रत्येक वैशिष्ट्यामुळे येणाऱ्या सुरक्षिततेचे वेगवेगळे मूल्यमापन करणे अवघड आहे. परंतु भूकंपामध्ये अशा तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारती अधिक सुरक्षित ठरतात असे आढळून आले आहे.
अ) भिंतींची सुयोग्य बांधणी : भिंतींची जाडी ४५ सेंमी. पेक्षा अधिक ठेवू नये. गोलाकार दगडाऐवजी छन्नी आणि हातोड्याने आकार देण्यात आलेल्या दगडांचा वापर करावा. अतिभूकंपप्रवण क्षेत्रात चिखलाच्या मसाल्याऐवजी (मिश्रण) सिमेंट-वाळू मसाला (१:६) किंवा चुना-वाळू मसाला (१:३) याप्रमाणे वापरावा. सिमेंटचा किंवा चुन्याचा अधिक वापर अधिक सुरक्षितता देऊ शकतो.
ब) दगडी बांधकामाच्या थरामध्ये योग्य बंधाचा वापर : दगडी भिंती बांधत असताना प्रत्येकी ६० सेंमी. उंचीवर प्रत्येक भिंतींच्या संपूर्ण जाडीदरम्यान पसरलेला आरपारी दगड (through stones) किंवा भिंतींच्या जाडीच्या पाऊणपट असलेल्या अधिछादी जोडींच्या दगडाचा वापर करावा. त्याचबरोबर जोत्याच्या बांधकामातही दर १.२ मी. अंतरावर अधिछादी जोडींच्या दगडांचा वापर आकृती ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे करावा.
क) क्षितिज प्रबलन घटकांची तरतूद : दगडी बांधकामांच्या घरांना मजबुती येण्यासाठी जमिनीला समांतर असे लाकूड किंवा प्रबलित काँक्रीटपासून तयार केलेल्या किमान एका तरी क्षितिज पट्ट्याचा वापर करणे आवश्यक आहे. (आकृती ४).
ड) संपूर्ण आकारमान आणि उंचीवर नियंत्रण : काटभित्तीवरील बिनआधारित भिंतींची लांबी ५ मी. पेक्षा अधिक असू नये. अधिक लांबीची भिंत बांधायची असल्यास प्रति ४ मी. वर काटआधार (Buttresses) देणे आवश्यक आहे. प्रत्येक मजल्याची उंची ३ मी. पेक्षा अधिक ठेवू नये. सिमेंट वापरून दगडी बांधकामाची इमारत बांधल्यास दोन मजल्यापेक्षा अधिक उंच बांधू नये. चुना किंवा चिखल यांचा वापर केल्यास एक मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारत बांधू नये. भिंतींची किमान जाडी तिच्या उंचीच्या १:६ इतकी असावी.
या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या इमारती भूकंपामध्ये शंभर टक्के टिकू शकतील अशी खात्री नसली तरी भविष्यात होणाऱ्या भूकंपादरम्यान जीवित आणि वित्तहानी कमी करण्याकरिता त्यांचा उपयोग होऊ शकतो. पारंपरिकता आणि कमी किंमत यांमुळे दगडी भिंतींचे बांधकाम करणे ज्यांच्यासाठी आवश्यक आहे त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
संदर्भ :
- IITK-BMTPC-भूकंपमार्गदर्शक सूचना १६.
समीक्षक – सुहासिनी माढेकर