भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जेचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,८०० मध्ये केला गेला, तर इराणमध्ये इ. स. ६०० मध्ये करण्यात आला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पवनचक्क्यांचा वापर विद्युत् निर्मितीसाठी होऊ लागला. पवन ऊर्जेचा वापर विद्युत् निर्मिती करण्यासाठी, पवनचक्की चालविण्यासाठी, पाणी उपसा करणारे किंवा मलमूत्राचा निचरा करणारे पंप चालविण्यासाठी तसेच शिडाची जहाजे चालविण्यासाठी केला जातो. आजच्या काळात जगभर पवन ऊर्जेचा वापर करून आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या वातझोत यंत्रांच्या (विंड टरबाइन) साहाय्याने विद्युत् निर्मिती करण्यात येत आहे. विद्युत् निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग किमान ताशी १६ किमी. असावा लागतो. तसेच वाऱ्याच्या प्रवाहात सातत्य असावे लागते. वाऱ्याचा वेग जसा वाढतो त्याप्रमाणे विद्युत् निर्मितीची क्षमता वाढते.
पवन ऊर्जा ही अक्षय्य ऊर्जा आहे आणि ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. ही ऊर्जा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर आहे. पवन ऊर्जेमुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषण होत नाही. पवन ऊर्जेचा विकास काही पाश्चिमात्य देशांमध्ये मोठया प्रमाणात झालेला दिसून येतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, भारत, डेन्मार्क, चीन इत्यादी देशांत पवन ऊर्जेवर विद्युत् निर्मिती करण्यात येत आहे. भारतात तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत पवन ऊर्जा केंद्रे उभारण्यात आली आहेत. भारतात १९८५ मध्ये गुजरातमधील मांडवी येथे व्यापारी तत्त्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले. हे आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र आहे. भारताला मोठया लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामुळे पवन ऊर्जानिर्मितीला बऱ्याच ठिकाणी वाव आहे.
पवन ऊर्जेपासून विद्युत् निर्माण केली जाते. तिचा भारताच्या एकूण ऊर्जानिर्मितीमध्ये असणारा वाटा १.६% आहे. पवन ऊर्जा विद्युत् निर्मितीमध्ये जगात जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व स्पेन या देशांनंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. २०११ साली प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जगभरातील पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या पहिल्या १० देशांची मिळून क्षमता २,३८,३५१ मेवॉ. एवढी आहे आणि या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. भारतात सद्यस्थितीला ३३९ पवन ऊर्जा विद्युत् प्रकल्प आहेत. त्यांपैकी ४४ प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. भारतातील पवन ऊर्जा विद्युत् निर्मिती क्षमता ४९,१३० मेवॉ. असून महाराष्ट्रात ५,४३९ मेवॉ. एवढी ऊर्जा निर्माण होते. तसेच सु. ३९३ मेगावॉटचे खाजगी पवन ऊर्जा विद्युत् प्रकल्प राबविले गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे येथे राज्यातील पहिला पवन ऊर्जा विद्युत् प्रकल्प उभारण्यात आला आहे. १९९४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे १.५ मेवॉ. क्षमतेची राज्यातील पहिली वातभूमी (विंडफार्म) उभारण्यात आली. सातारा जिल्ह्यात पवन ऊर्जा निर्मितीची अनेक केंद्रे असून या जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर ५०० मेवॉ. क्षमतेचा चाळकेवाडी पवन ऊर्जा विद्युत् प्रकल्प विकसित झाला असून तो आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. आता अहमदनगर, सांगली, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार इ. जिल्ह्यांतही असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
एखाद्या विशिष्ट क्षेत्रात पवन ऊर्जेपासून विद्युत् निर्मिती करण्यासाठी वातझोत यंत्रांचा समूह उभारावा लागतो. त्याला वातभूमी म्हणतात. सामान्यत: ग्रामीण क्षेत्रात अथवा सागर किनारी भागात अशी वातभूमी असते. एका वातभूमीमध्ये सु. १०० पर्यंत जनित्रे असतात.
पवन ऊर्जा विद्युत् निर्मिती क्षेत्रात मोठा आवाज निर्माण होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होण्याचा संभव असतो. जागेची योग्य निवड, यंत्रांची विशिष्ट रचना व ध्वनिरोधक यंत्रणा यांमार्फत आवाजाचा त्रास कमी करता येऊ शकतो. काही वेळा झोत यंत्राच्या पात्यांना अडकून पक्ष्यांचा अपघाती मृत्यूही होतो. पवन ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणावर इतर ऊर्जा निर्मिती पद्धतींपेक्षा कमी प्रतिकूल परिणाम होतो.