पॅसेरीफॉर्मिस गणाच्या मोटॅसिल्लिडी कुलातील मोटॅसिल्ला प्रजातीमधील पक्ष्यांना सामान्यपणे धोबी म्हणतात. भारतात या पक्ष्याच्या ३–४ जाती आढळतात. त्यांपैकी मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस असे शास्त्रीय नाव असलेली जाती भारतात कायमची निवासी आहे. याला मराठीत शबल (चित्रविचित्र रंगाचा) धोबी असेही म्हणतात. हे पक्षी सतत शेपूट वर- खाली हलवीत असल्यामुळे या प्रजातीला मोटॅसिल्ला हे नाव पडले आहे. या कुलातील शबल धोबी हा आकाराने सर्वांत मोठा पक्षी आहे. शबलखेरीज इतर धोबी उत्तरेकडील शीत प्रदेशांतून स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येतात. आसाम वगळता, हिमालयाच्या सस.पासून सु. १,००० मी. उंचीपासून दक्षिणेपर्यंत हा पक्षी सर्वत्र आढळतो. मदरासपटेन्सिस हे नाव मद्रास शहरावरून पडले आहे.

धोबी (मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस)

शबल धोबी साधारणत: बुलबुल पक्षाएवढा असतो. शरीराची लांबी सु.२१ सेंमी. असून त्याचे शेपूट बुलबुलच्या तुलनेत थोडे जास्त लांब असते. वारंवार या शेपटीची खाली-वर हालचाल करण्याच्या सवयीमुळे त्याला धोबी हे नाव मिळाले आहे. या पक्ष्याचे डोके, हनुवटी, पाठ आणि छातीकडचा भाग काळा असून पोटाचा भाग पांढरा असतो. चोचीच्या बुडापासून पांढरा पट्टा निघून भुवयांवरून मानेच्या मागे गेलेला असतो. या पट्ट्यांवरून हा पक्षी सहज ओळखता येऊ शकतो. पंख काळे असून दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे असतात. शेपटीच्या दोन्ही कडा पांढऱ्या पिसांच्या असतात. चोच छोटी व टोकदार असते. पाय काहीसे लांबट असून प्रत्येक पायाला पुढे तीन आणि मागे एक अशी काहीशी लांबट चार बोटे असतात.

पाण्याजवळ धोबी पक्षी जोडीने किंवा छोट्या समूहाने दिसतात. माळराने, नांगरलेली जमीन, खुरट्या गवताचे प्रदेश, खेळाची मैदाने, मनुष्य वस्ती इ. ठिकाणी माणसांना न बिचकता ते धीटपणे वावरतात. ते इकडेतिकडे वळत जमिनीवर तुरूतुरू चालतात आणि पळतात. चालताना किंवा पळताना कीटक खातात. अधूनमधून ते हवेत उडणारे कीटकही पकडतात. जमिनीवर, तारेवर किंवा छतावर बसून आराम करतात. लांब अंतर वेगाने उडत जातात आणि उडताना मधूनच खाली येतात, पुन्हा वर जातात. ‘व्हिचऽऽव्हिच’ अशी शीळ घालतात. शीळ दिर्घ आणि मोठ्या आवाजाची असते. धोबी पक्ष्याचा विणीचा हंगाम मार्च ते सप्टेंबर असतो. बहुधा पाणवठ्यालगतच्या जमिनीवर घरटी करतात. झुडपांमध्ये तसेच मोठ्या दगडांच्या किंवा खडकांच्या कपारीत गवत, वनस्पतींच्या मुळ्या व तंतू यांच्या साहाय्याने लहान आणि साधे घरटे बनवितात. मादी एकावेळी ३–४ अंडी घालते. नर व मादी दोघेही अंडी उबवितात. उबवण कालावधी सु. १२ दिवसांचा असतो. दोन्ही पक्षी पिलांना चारा भरवितात. सुमारे १४ दिवसांत पिले उडण्यायोग्य होतात. त्यानंतरसुद्धा साधारण आठवडाभर नर व मादी पिलांना चारा भरवून त्यांची काळजी घेतात.

हिवाळ्यात भारतात येणाऱ्या मोटॅसिल्ला प्रजातींमध्ये करडा धोबी (मो. सिनेरिया), पांढरा धोबी (मो. अल्बा) आणि पिवळा धोबी (मो. फ्लावा) या मुख्य जाती आहेत. (१) करडा धोबी पक्ष्याची वरची बाजू करडी व खालची पिवळी. (२) पांढरा धोबी पक्ष्याची वरची बाजू करडी; चेहरा, हनुवटी व गळा पांढरा; छातीवर काळा पट्टा; पंख काळे पांढरे. (३) पिवळा धोबी पक्ष्याचे कपाळ पिवळे, भुवया पिवळ्या. उन्हाळ्याच्या आरंभी नराचे सगळे डोके पिवळे होते. विणीच्या हंगामात अनेक जातींचे नर आकर्षक रंगसंगतीमुळे ओळखणे सोपे जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा