पाळीव बदक (ॲनस प्लॅटिऱ्हिंकस डोमेस्टिकस)

एक पाणपक्षी. बदकाचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲनॅटिडी कुलामधील ॲनॅटिनी उपकुलात होतो. ॲनॅटिडी कुलाच्या अनेक उपकुलांपैकी काही उपकुलांतील पक्ष्यांनाही ‘बदके’ म्हणतात. ॲनॅटिनी उपकुलात सु. ४० प्रजाती असून त्यांच्या सु. १४६ जाती आहेत. जगातील नद्या, सरोवरे, तलाव, समुद्रकिनारे अशा आर्द्रभूमी प्रदेशांत बदके दिसून येतात. त्यांच्या काही जाती गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्‍या असतात, तर काही जाती सागरी असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्रकिनारी होते. भारतात प्रामुख्याने पाळीव बदके आढळतात. ती सामान्यत: पांढरी असून त्यांचे शास्त्रीय नाव ॲनस प्लॅटिऱ्हिंकस डोमेस्टिकस आहे. जगातील पाळीव बदकांच्या जवळजवळ सर्व जाती मॅलार्ड बदकांच्या ॲनस प्लॅटिऱ्हिंकस या वन्य जातीपासून पैदा झाल्या आहेत.

 

बदक (ॲनस प्लॅटिऱ्हिंकस)

 

बदके हिरवी, निळी, लाल, तपकिरी व पांढरी अशा विविध रंगांची असतात. ती आकाराने हंसापेक्षा लहान व स्थूल असतात. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्‍याच मागच्या बाजूला असतात. पायांमधील अंतर अधिक असल्याने ती फेंगडी चालतात. पाय मजबूत असून त्यांवर खवले असतात. पायाचा रंग पिवळा असून त्याच्यावर पुढे तीन बोटे व मागे एक बोट असते. पुढची बोटे पातळ चामडी पडद्याने जुळलेली असतात. त्यांच्या साहाय्याने बदके पोहतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असून पातळ त्वचेने आच्छादलेली असते. चोचीच्या कडा दंतुर असतात. त्यामुळे पकडलेले अन्न चोचीतून निसटून बाहेर पडू शकत नाही. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तैलग्रंथींचा स्राव बदके चोचीच्या साहाय्याने पिसांना चोपडतात. त्यामुळे त्यांची पिसे पाण्यात पोहताना ओली होत नाहीत. शरीरावरील सर्व त्वचेला मऊ कोमल पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून त्यांचे संरक्षण होते. सामान्यपणे नर व मादी यांचे रंग वेगळे असतात.

बदके चांगली पोहतात आणि बुड्याही मारतात. जमिनीवर ती डुलतडुलत चालतात. ती वेगाने उडू शकतात. त्यांच्या काही जाती प्रजननासाठी शेकडो किमी. अंतर दूर उडत जातात. पाण्यातील व जमिनीवरील लहान प्राणी, कीटक, धान्य, बी आणि रसाळ मुळे हे त्यांचे अन्न आहे. नर बदक प्रौढ झाला की त्याची शेपटीची पिसे वर वळतात आणि आवाज हळूहळू क्षीण होत जातो. मादी बदकाचा आवाज घोगरा होत जातो. नर व मादी यांची पिसे दरवर्षी गळून पडतात व नवीन येतात. मादी अंडी उबवायला बसली की नराची पिसे गळतात, तर पिलांची वाढ झाली की मादीची पिसे गळतात.

मार्च-एप्रिल हा बदकांच्या प्रजननाचा काळ असतो. हिवाळ्यात नर आपल्या आकर्षक रंगाने व शरीराचा फुगीरपणा वाढवून मादीला आकर्षित करतो. त्यानंतर मादी ही नराला घरट्याकडे घेऊन जाते. सहसा, मादीचा जन्म जेथे झालेला असतो, त्याच जागी मादी घरटे तयार करते. हे घरटे गवत व झाडाच्या काड्यांनी बनविलेले असते. मादी एका वेळी ५–१२ अंडी घालते. अंडी मादी उबविते. साधारणपणे तीन आठवडे ते एका महिन्यात अंडी फुटून पिले बाहेर पडतात.

बदकाच्या वेगवेगळ्या माद्यांची पिले सारखीच दिसतात. मात्र मादी कोणत्याही पिलांचा सांभाळ करते. ती विशेषकरून रात्रीच्या वेळी पिलांना पंखाखाली झाकून घेते. काही वेळा एकमेकांच्या बदकांची पिले एकत्र मिसळल्यामुळे काही माद्यांसमवेत १५–२५ पिले, तर काही माद्यांसमवेत २ किंवा ३ पिले दिसतात. पिलांची वाढ वेगाने होते. पिले जन्मल्यानंतर ३६ तासांत धावू व पोहू शकतात किंवा अन्न शोधतात. ५–८ आठवड्यांनंतर ती उडण्यास सक्षम होतात.

वर्षानुवर्षे बदकांचे थवे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात विशिष्ट जागी एकत्र येतात. त्यांचे विश्रांतीचे ठिकाणही ठरलेले असते. मुख्यत: अंडी तसेच मांस यांसाठी जगात सर्वत्र पाळीव बदके पाळली जातात. पाळीव बदकाची मादी एका वर्षात सु. ३०० अंडी घालते. या बदकांचे पालन करताना विशेष काळजी  घेतात कारण त्यांना बर्ड फ्ल्यू या विषाणूंची  लागण सहज होऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा