आरारुट वनस्पती

व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव एका प्रकारच्या खाद्य पिठाला दिले आहे. हे विविध वनस्पतींपासून तयार करतात. त्यांपैकी भारतात आरारूट हे यूफोर्बिएसी कुलातील मॅनिहॉट एस्क्युलेंटा असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीच्या ग्रंथिक्षोडांपासून (बटाट्यासारख्या गाठदार खोडांपासून) मिळवतात. इंग्रजीत सामान्यपणे या वनस्पतीला कसावा, मॅनिऑक किंवा टॅपिओका असे म्हणतात. केरळ आणि तमिळनाडू राज्यांत या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

आरारुट कंद

या वनस्पतीचे झुडूप २-५ मी. उंच असून खोडे आणि फांद्यांचे रंग वेगवेगळे असतात. पाने गळली की खोडावर व्रण मागे राहतात. ग्रंथिक्षोडे गुच्छाने असतात. पाने हाताच्या आकाराची, फिक्कट हिरवी, ५-९ खंडी, खंडे भालाकृती व लांब टोकाची असतात. फुले पिवळट किंवा हिरवट पांढरी व एकलिंगी असतात. फळांच्या बोंडात तीन बिया असतात.या वनस्पतींची ग्रंथिक्षोडे सोलून, धुवून व कुटून तो लगदा चाळणीच्या रुंद नळ्यांतून गाळतात व त्यातून मिळणारा पिठूळ पदार्थ पाण्याबरोबर टाक्यांत जमा झाल्यावर वाळवितात. बाजारात पांढरी स्वच्छ पूड अथवा लहानमोठ्या खड्यांच्या स्वरूपात आरारूट मिळते. हे पीठ पचण्यास हलके असल्याने लहान मुलांना व अशक्त माणसांना चांगले मानवते. बिस्किटे, केक, पुडिंग व जेली यांत त्याचा उपयोग करतात. शिवाय खळ व चेहर्‍यास लावण्याची सुवासिक पूड यांकरिता आरारूट वापरले जाते. लगद्याचा चोथा गुरांना चारा म्हणून घालतात.