(आरथ्रायटीस). ‘सांधे दुखणे व ताठर होणे’ हे मुख्य लक्षण असलेल्या अनेक विकारांना मिळून ‘संधिशोथ’ ही संज्ञा वापरली जाते. या विकारात एक किंवा अधिक सांध्यांच्या जागी सूज येते आणि ते हळवे होतात. संधिशोथाची लक्षणे वाढत्या वयाबरोबर बळावत जातात. संधिशोथाचे जास्तीत जास्त आढळणारे प्रकार अस्थिसंधिशोथ (ओस्टिओआरथ्रायटीस) आणि संधिवाताभ संधिशोथ (ऱ्हुमॅटॉइड आरथ्रायटीस) हे आहेत.

अस्थिसंधिशोथामुळे सांध्यातील हाडांच्या टोकाला असलेल्या कठीण, गुळगुळीत कास्थी तुटतात. संधिवाताभ संधिशोथ हा विकार रुग्णाच्याच प्रतिक्षम संस्थेने त्याच्या सांध्यावर केलेल्या आघातामुळे होतो. गाऊट या विकारात रक्तात खूप प्रमाणात यूरिक आम्ल वाढत असल्याने यूरिक आम्लाचे स्फटिक तयार होतात. कंडुरोग (सोरायसिस) किंवा लुपस यांसारखे आजार झाल्यास वेगळ्या प्रकारचे संधिशोथ उद्भवतात.

संधिशोथाच्या प्रकारानुसार त्यांवर इलाज केले जातात. संधिशोथाची लक्षणे दूर करणे आणि आरोग्य सुधारणे, ही उपचारांची मुख्य उद्दिष्टे असतात. सांध्यांमध्ये वेदना जाणवणे, सांधे ताठर होणे, सूज येणे, लाली येणे अथवा स्पर्श केल्यास किंवा दाब दिल्यास वेदना सहन न होणे आणि हालचालींवर मर्यादा येणे इ. लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे आढळून आल्यास क्ष-किरण प्रतिमा काढून आणि रक्तचाचण्या करून विकाराचे निदान केले जाते. या निदानांनुसार संधिशोथाचे पुढील प्रकार केले जातात –

(१) दृढकारी कशेरू संधिशोथ (अँकिलोझिंग स्पाँडिलायटीस) : बहुतकरून पुरुषांमध्ये आढळणाऱ्या या विकाराचा प्रारंभ पाठीच्या कण्याच्या तळाला असलेल्या त्रिकास्थी (सॅक्रम) या हाडाच्या आणि नितंबाच्या हाडाचा वरचा भाग म्हणजे श्रोणिफलक (इलियम) यांना जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सांध्यांत होतो; तेथून पाठीच्या कण्यांच्या सांध्यामधून पसरत या वेदना मानेपर्यंत पोहोचतात. कंबर दुखणे, पाठ धरणे, मांडीतून पायापर्यंत चमक निघणे अशा तक्रारी रुग्ण सुरुवातीला करतात. हळूहळू या विकारात पाठीच्या कण्यातील काही मणके एकमेकांना जोडले जातात. त्यामुळे पाठीचा कणा पुढे झुकून त्याच्या हालचालीवर मर्यादा येतात. जर बरगड्यांवर परिणाम झाला, तर खोलवर श्वास घ्यायला मर्यादा येतात. या प्रकारच्या संधिशोथाचे नेमके कारण अजून ज्ञात नाही, परंतु पर्यावरणीय आणि जनुकीय असे दोन्ही घटक एकत्र येऊन हा विकार होतो, असे मानतात. काही व्यक्तींमध्ये एचएलए-बी२७ (HLA-B27) हे प्रतिजन असल्यास त्यांना हा विकार होऊ शकतो. एका अभ्यासात इंग्लंडमधील हा विकार झालेल्या ९०% लोकांमध्ये HLA-B27 हे प्रतिजन आढळून आले आहे.

(२) गाऊट : संधिशोथाचा हा गुंतागुंतीचा प्रकार असून तो कोणालाही होऊ शकतो. सांध्यांमध्ये उद्भवणाऱ्या एकाएकी तीव्र वेदना, सूज, लाली आणि ताठरता येणे इ. लक्षणे गाऊटमुळे उद्भवतात. बऱ्याचदा ही लक्षणे रात्री झोपेत जाणवतात आणि विशेषकरून पायाच्या अंगठ्यापाशी जाणवतात. शरीरात यूरिक आम्लाच्या चयापचयातील क्रियांमध्ये बिघाड होऊन रक्तात यूरिक आम्लाचे प्रमाण वाढते. परिणामी मोनोसोडियम युरेटचे स्फटिक मूत्रावाटे बाहेर फेकले न जाता सांध्यांमध्ये साचत जातात आणि गाऊट उद्भवतो.

(३) बाल अज्ञातकारण संधिशोथ : हा विकार मुख्यत: १६ वर्षाखालील कुमारांमध्ये दिसून येतो. या विकारामुळे सांध्यांमध्ये सतत वेदना, सूज आणि ताठरता अशी लक्षणे दिसतात. काही बालकांमध्ये या वेदना काही महिने टिकतात, तर काहींमध्ये आयुष्यभर टिकतात. ज्या बालकांमध्ये त्यांची प्रतिक्षम संस्था स्वत:च्या पेशींवर किंवा ऊतींवर हल्ला करते त्यांच्यामध्ये हा विकार उद्भवू शकतो. यामागील कारण निश्चित माहीत नसले, तरी आनुवंशिकता आणि पर्यावरण हे दोन्ही घटक यामागे आहेत असे दिसते. या विकारामुळे बालकांमध्ये वाढीच्या समस्या उद्भवतात, सांध्यांची हानी होते आणि डोळ्यांची जळजळ होते. या विकारावरील उपचारांचा उद्देश वेदना आणि शोथ कमी करणे, सांध्यांची हानी टाळणे आणि सांध्यांचे कार्य सुधारणे हा असतो.

(४) अस्थिसंधिशोथ : संधिशोथाचा हा सर्वांत सामान्य विकार असून जगातील लाखो लोक या विकाराने बाधित असतात. या विकारात सांध्यातील हाडांच्या टोकांवर मऊ, गादीसारख्या असलेल्या कास्थींची (ज्या हाडांच्या टोकांमधील घर्षण कमी करतात त्यांची) हानी होते. या विकारात कास्थींच्या ऊतींचे कोलॅजेन आणि प्रोटिओग्लायकेन हे घटक निर्माण करणाऱ्या पेशींचे कार्य बिघडते आणि कास्थींमध्ये भेगा पडू लागतात. कास्थींची झीज झाल्यामुळे त्यांच्याखालील हाडे उघडी पडून वेदना जाणवतात. सांध्याजवळील भागात लहानलहान गोलाकार पोकळ्या तयार होतात; सांध्याभोवती हाडांची अतिरिक्त वाढ होऊन कठीण गाठी तयार होतात. हळूहळू सांध्यातील घटक वेडेवाकडे वाढल्याने सांधे निकामे होतात.

सुरुवातीला या विकाराची लक्षणे (सांधेदुखी व सांधे ताठर होणे) खूप काम किंवा व्यायाम केल्यानंतर जाणवतात. पाठ बाधित झाल्यास हातपाय अशक्त होतात, तसेच हातापायांना मुंग्या येतात. मुख्यत: हाताच्या बोटांच्या टोकांचे सांधे, अंगठ्याच्या तळाकडील भाग, मान, पाठीचा खालचा भाग, गुडघे हे भाग बाधित होतात. या विकारामुळे दैनंदिन कार्यक्षमता कमी होते.

(५) कंडुरोग संधिशोथ : हा दीर्घकालीन दाहकारक संधिशोथ असून ज्या व्यक्तींना आत्मप्रतिरक्षा संस्थेतील बिघाडातून कंडुरोग झालेला असतो त्यांना होतो. शरीराचा कोणताही भाग (बोटांची टोके किंवा पाठीचा कणा धरून) या विकारामुळे बाधित होऊ शकतो. शरीरातील प्रतिक्षम संस्थेने निरोगी पेशी किंवा ऊती यांवर हल्ला केल्यास हा विकार संभवतो. यात प्रतिक्षम प्रतिसाद बिघडल्याने सांधे दुखतात तसेच त्वचेतील पेशींची संख्या बेसुमार वाढते.

(६) प्रतिक्रियात्मक संधिशोथ : काही वेळा शरीराच्या वेगळ्या भागाला (उदा., आतडे, जननेंद्रिये किंवा मूत्रमार्ग) संक्रामण झाल्याने सांधेदुखी उद्भवते. प्रामुख्याने घोटा आणि पाऊल या विकाराने बाधित होतात. अनेक जीवाणूंमुळे जसे क्लॅमिडिया, साल्मोनेला, शिंगेला, अर्सिनिया, कॅम्पायलोबॅक्टर इ. प्रजातींच्या संक्रामणामुळे हा विकार होतो. यांपैकी काही जीवाणूंचा प्रसार अन्नातून होतो, तर काही लैंगिकदृष्ट्या संक्रामित रोगाचे वाहक आहेत. अनेक रुग्णांमध्ये याची लक्षणे उद्भवतात आणि वर्षभरात नाहीशी होतात.

(७) संधिवाताभ संधिशोथ : संधिशोथापैकी हा सर्वांत दीर्घकालीन विकार असून जगातील २% लोकांमध्ये २० ते ५० वर्षे वयाच्या दरम्यान कधीही उद्भवू शकतो. स्त्रियांमध्ये या विकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आढळते. सांध्यातील संधिकलेवर (सांध्याभोवती असलेल्या पटलांवर) जेव्हा शरीरातील प्रतिक्षम संस्थेचा हल्ला होतो, तेव्हा संधिवाताभ संधिशोथ उद्भवतो. उद्भवलेल्या दाहामुळे संधिकलेला सूज येते, ज्यामुळे सांध्यातील कास्थी आणि अस्थी दोन्हींचा ऱ्हास होतो. सांध्यांना धरून ठेवणारे कंडरा आणि अस्थिरज्जू दुबळे होतात आणि ताणले जातात. हळूहळू सांध्याचा आकार व बांधणी बदलते. यात मुख्यत: मनगट आणि हात बाधित होतात, तसेच एकाच वेळी शरीराच्या दोन्ही बाजू बाधित होतात. परिणामी तांबड्या पेशींची संख्या घटणे, फुप्फुसांभोवती दाह होणे, हृदयाभोवती दाह उद्भवणे इ. लक्षणे दिसतात. काही वेळा ताप आणि अशक्तपणा अशीही लक्षणे दिसतात.

रक्तद्रव आणि बी लसीका पेशी यांद्वारे ‘संधिवाताभ घटक’ नावाने ओळखली जाणारी काही प्रथिने निर्माण होतात. हे घटक इम्युनोग्लोब्युलीन-जी (IgG) या प्रथिनांशी जोडले जाऊन त्यातून होणारी संयुगे संधिवाताभ संधिशोथाला कारणीभूत ठरतात, असे मानले जाते. या विकारामुळे काही व्यक्तींमध्ये त्वचा, डोळे, फुप्फुसे, हृदय, रक्तवाहिन्या इ. बाधित होतात.

(८) पूतिसंधिशोथ : सांध्यांमध्ये होणारे हा एक वेदनाकारी संक्रामण आहे. जीवाणू, विषाणू, कवके आणि परजीवी यांच्या संक्रामणामुळे हा विकार जडतो. शरीरातील एखाद्या ठिकाणी वरील रोगकारकांचा संक्रामण झाल्यास आणि ते रक्तात मिसळून सांध्यापाशी आल्यास त्यांद्वारे सांधे बाधित होतात. काही वेळा खोलवर जखम झाल्यास त्यापासूनही संक्रामण होऊ शकते. अर्भके आणि वृद्ध यांना या विकाराची लागण लवकर होते. या विकारात गुडघे लवकर बाधित होत असले, तरी नितंब, खांदे आणि इतर सांधेही बाधित होतात. संक्रामण झाल्यास सांध्यामधील कास्थी आणि हाडे यांची हानी वेगाने होते. त्यामुळे तत्काळ उपचार करणे गरजेचे असते.

वाढत्या वयानुसार हाताच्या अंगठ्याचा संधिशोथ होऊ शकतो. हाताचा अंगठा जेथे हाताच्या सांध्याला जुळलेला असतो तेथे हाडांच्या टोकाकडील कास्थींची झीज झाल्याने हा विकार उद्भवतो. या विकारामुळे सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात, सूज येते आणि हाताची ताकद कमी होऊन हालचालींवर मर्यादा येतात.

सामान्य स्थितीत हाडांच्या टोकाभोवती कास्थींचे आवरण असते जे गादीसारखे काम करते आणि हाडांची हालचाल मऊपणे होण्यास मदत करते. या विकारात कास्थींची झीज होते आणि मऊ पृष्ठभाग खडबडीत होतो. जेव्हा हाडे घासली जातात तेव्हा घर्षण निर्माण होऊन सांध्यांची हानी होते. कधीकधी हाडांची हानी होत असताना आधीच्या हाडालगत नवीन हाड वाढलेले दिसते, ज्यामुळे अंगठ्याच्या सांध्याच्या जागी उंचवटा दिसून येतो.

संधिशोथावरील उपचार : संधिशोथ या विकारसमूहात विविध प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश होत असला, तरी सांधेदुखी आणि सांध्यांतील रचनात्मक बदल यांकरिता उपचार केले जातात. या सर्व विकारांवर उपलब्ध उपचार पद्धती सारख्याच आहेत. फक्त विकाराच्या अवस्थेनुसार, तीव्रतेनुसार आणि संभाव्य दोषानुसार या उपचारांपैकी योग्य उपचार निवडावे लागतात. वेदना कमी करणे आणि सांध्यामधील संभाव्य दोष टाळणे हा या उपचारांचा उद्देश असतो. गरम पाण्याचा शेक, मसाज, खनिज जलचिकित्सा यांसारख्या प्राचीन काळापासून वापरात असणाऱ्या उपचारांपासून आधुनिक किरणोपचार व शस्त्रक्रियांपर्यंत अनेक तंत्रे उपचारासाठी वापरतात. विकाराच्या निदानासंबंधी रुग्णाला पूर्णपणे माहिती देऊन त्याचे सहकार्य प्राप्त करणे आवश्यक असते कारण उपचार दीर्घकाळ चालू ठेवावे लागतात.

भौतिक उपचार : विविध प्रकारचे मसाज, शेक, डायाथर्मी, स्वनातीत किरण, सूचिचिकित्सा (ॲक्युपंक्चर), आधारदायी उपकरणे आणि ताण देऊन सांध्यामधील ऊतींवरील दाब कमी करणे यांचा भौतिक उपचारांत समावेश होतो.

औषधे : वैद्यकीय सल्ल्यानुसार सुरुवातीला ॲस्पिरिनच्या गटातील वेदनाशामक औषधे दिली जातात. वेदना कमी करण्यासाठी आयब्युप्रोफेन वर्गातील वेदनाहारके औषधेही देतात. मात्र त्यांचा प्रभाव अपुरा पडल्यास स्टेरॉइड (हायड्रोकॉर्टिसोन) वर्गातील औषधे गोळ्यांच्या रूपात देतात किंवा सांध्यात अंत:क्षेपित (इंजेक्शन) करतात. काही वेळा प्रतिरक्षा संस्थेचे अवसादन करणारी ॲझाथायोप्रिनसारखी औषधे आणि कर्करोगावरील काही औषधेही (अल्प मात्रेमध्ये) गरज पडल्यास देतात.

शस्त्रक्रिया : तीव्र विकारांत सांध्यांची हालचाल मर्यादित सुधारणे, संरचनात्मक दोष काढून टाकणे किंवा तीव्र वेदना निर्माण करणारे दोष (उदा., चेतांवर दाब पडणे) दूर करणे याकरिता काही वेळा शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यासाठी एखाद्या कास्थीच्या दुरुस्तीपासून ते संपूर्ण सांधा (उदा., गुडघा) काढून कृत्रिम सांधा बसविण्यापर्यंत अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आता केल्या जातात.

प्रशिक्षण चिकित्सा : सांध्यांना विश्रांती देऊन इतर वेळी त्यांची कार्यक्षमता वाढविणारे व्यायाम करणे, स्नायूंना अधिक कार्यक्षम करणारे किंवा ताणणारे व्यायाम करणे, सुयोग्य असे मजबूत पृष्ठभागाचे आसन किंवा शय्या यांचा वापर करणे, सांध्यांवरील ताण कमी करणारी कार्यपद्धती अवलंबणे याचे प्रशिक्षण यात दिले जाते.