मसूर ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लेंस क्युलिनॅरिस आहे. ती लेंस एस्क्युलेंटा या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची मध्य आशियातील असून पुरातत्त्व दाखल्यांनुसार तिची लागवड ९,५००-१३,००० वर्षांपूर्वीपासून करण्यात येत असावी, असे मानतात. तिच्या बियांना बाजारात सामान्यपणे मसूर म्हटले जाते. कमी पावसाच्या प्रदेशातही तग धरून राहत असल्यामुळे तिची लागवड जगात सर्वत्र केली जाते.

मसूर (लेंस क्युलिनॅरिस) : (१) वनस्पती, (२) फुले व शेंगा असलेली फांदी, (३) बिया

मसुराचे झुडूप साधारणपणे १५–७५ सेंमी. उंच वाढते. ते काहीसे वेलीसारखे, सरळ वाढणारे व लवदार असून त्याला तणावे असतात. या झुडपाला तळापासून शाखा फुटलेल्या असतात. पाने संयुक्त, पिसासारखी व एकाआड एक असतात. उपपर्णे दोन, रेषाकृती आणि पर्णिकांच्या ५-७ जोड्या असतात. फुले पांढरी, गुलाबी, लाल किंवा जांभळी, एकेकटी किंवा २-४ च्या असीमाक्ष पुष्पविन्यासात म्हणजे मंजिरीसारख्या फुलोऱ्यात येतात.  शेंगा चपट्या असून त्या  गुळगुळीत व लांबट गोलसर असतात. तिच्यात सामान्यपणे दोन बिया असतात. बिया गोल, बहिर्वक्र आणि रंगाने लालसर, पिंगट किंवा तपकिरी असतात.

मसुराच्या १०० ग्रॅ. बियांपासून २६ ग्रॅ. प्रथिने आणि ६० ग्रॅ. कर्बोदके शरीराला उपलब्ध होतात. तसेच त्यांमध्ये आयसोल्युसीन व लायसीन यांसारखी ॲमिनो आम्ले असतात. मोड आलेल्या मसुरात पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. यांखेरीज बियांमध्ये तंतुमय पदार्थ, ब-समूह जीवनसत्त्वे आणि मुबलक प्रमाणात लोह असते. बियांमध्ये असलेल्या कर्बोदकांपैकी सहज आणि सावकाश पचणारे स्टार्च (३०%) असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी मसूर फायद्याची असते. भारतात हरभरा आणि उडीद या कडधान्यांच्या खालोखाल मसुराचे उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये त्याचा उपयोग उसळ व डाळीची आमटी अशा पदार्थांसाठी केला जातो. उत्तर भारतात त्यापासून दालमोठ नावाचा खाद्यपदार्थ बनविला जातो. जगात इतरत्र सूप तयार करण्यासाठी मसूर वापरतात. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांवर मसूर उपयोगी असते. जगात वर्षाला सु. ४० लाख मे. टन मसुराचे उत्पादन होते. त्याच्या उत्पादनात कॅनडा अग्रेसर असून त्याखालोखाल भारत, ऑस्ट्रेलिया, टर्की आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे देश आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा