अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात. अन्नाच्या पचनाला तोंडापासून सुरुवात होते. अन्न चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते. निरनिराळ्या भागांत निरनिराळे विकर अन्नावर प्रक्रिया करतात व अन्नातील निरनिराळ्या घटकांचे पचन व शोषण होते. या सामान्यपणे चालणार्या प्रक्रियेत व्यत्यय आला तर अपचन होते.
अपचनामुळे पोटात दुखते अथवा कळ येते. वायूमुळे आतडी फुगल्यावर वायू पुढे ढकलण्यासाठी आतड्यातील गोलाकार स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे पोट दुखते. अशा वेळी ढेकर आल्यास जठरातील आम्ल अन्ननलिकेत येते. त्यामुळे छातीत जळजळते. अन्ननलिकेच्या व जठराच्या दाहामुळे पोट दुखते.
यकृताच्या विकारात, पित्ताशयाच्या दाहात व पित्ताश्मरीत पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूस दुखते. विशेषतः स्निग्ध पदार्थ खाल्ल्यावर हे दुखणे वाढते. डाव्या बाजूस दुखले तर स्वादुपिंडाचा दाह असू शकतो. जेवल्यावर दुखणे कमी झाले तर जठराचा दाह किंवा व्रण किंवा आद्यांत्राचा व्रण दाहास कारणीभूत असू शकतो.
काही जणांना वावडे पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊ शकते. उदा., वांगी, अळू, काही मासे हे पदार्थ खाल्ल्यावर पोट दुखू लागते. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच एखाद्या विकराची न्यूनता असते. लॅक्टेज या विकराच्या न्यूनतेमुळे काही व्यक्तींना दूध पचत नाही.
गियार्डियासिस या रोगात गियार्डिया लॅम्बलिया या आदिजीवामुळे पोटात खूप वायू धरतो. विशेषतः कर्बोदके व गोड पदार्थ खाल्ल्यावर त्यांचे किण्वन होते. पोट फुगते, गुरगुरते, शौचास पातळ होते, अपान वायू सरकतो पण त्यास दुर्गंधी नसते.
काही लोकांना हवा गिळण्याची सवय असते. मानसिक ताण व घाईघाईने खाणे यामुळेदेखील हवा जठरात जाते आणि ढेकर येतात.
अपचनाचे निदान करण्यासाठी विष्ठा व जठरातील आम्ल यांची तपासणी करतात. दुर्बिणीने आतील भागाची ही तपासणी (गॅस्ट्रोस्कोपी) करतात.
अन्नसेवनाची काही पथ्ये पाळल्यास अपचनाची समस्या दूर होते. शक्यतो शांतपणे व सावकाश जेवावे. अन्न नीट चावून खावे. अतितिखट व मसाल्याचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. अती खाणे वर्ज्य करावे. एका वेळी थोडे, असे बरेच वेळा खावे. जेवणानंतर पपईसारखी पाचक फळे खावीत. जेवणानंतर तासभर झोपू नये. आवश्यक वाटल्यास वैद्यकीय उपचार करावेत.