अपिवनस्पती दुसर्या वनस्पतीच्या फांदीवर किंवा खोडावर वाढतात. आपले अन्न व पाणी आधारभूत वनस्पतीच्या शरीरातून किंवा मुळांद्वारे जमिनीतून शोषून न घेता स्वतंत्रपणे मिळवून ते जीवनक्रम चालवितात. आश्रयी वनस्पतींचा केवळ आश्रयासाठी उपयोग करतात.
दमट हवामान प्रदेशातील वृक्षांच्या आडव्या फांदीवर आढळणारी ऑर्किड (आमर), शैवाक, शेवाळी, नेचे व गवत ही या वनस्पतींची मुख्य उदाहरणे आहेत. अपिवनस्पतींना स्वतःची मुळे, पाने, फुले, फळे व बिया असतात. मुळे तीन प्रकारची असतात: आश्रयी वनस्पतींवर चिकटून राहणारी मुळे आणि खाचांतील पाणी व क्षार शोषून घेणारी मुळे, लोंबती व मांसल मुळे. ही मुळे पृष्ठभागावरील जलशोषी त्वचेच्या साहाय्याने दमट वातावरणातून जलांश शोषून घेतात. या मुळांमध्ये हरितद्रव्यही असते. त्याद्वारे प्रकाशसंश्लेषणाचे कार्यही केले जाते.
अननसाच्या कुलातील बहुतेक जाती या गटात दिसतात. यापैकी स्पॅनिश मॉस ही वनस्पती ओक या आश्रयी वनस्पतींच्या खोडावर लोंबकळताना दिसते. या वनस्पतीला मुळे नसतात, पण बारीक अक्षांवर खवल्यासारखे केस असतात. तेच वातावरणातून जलांश शोषून घेतात. याकरिता काही वनस्पतींमध्ये खास जलकलश असतात.
वड, अंजीर यांसारख्या वनस्पतींच्या बियांचा प्रसार पक्ष्यांच्या विष्ठेतून होतो. त्यामुळे या बिया प्रथम आश्रयी वनस्पतींच्या फांद्यांच्या बेचक्यातून रुजून काही काळ अपिवनस्पतीसारख्या वाढतात. कालांतराने त्यांची मुळे जमिनीपर्यंत पोहोचून त्या स्वतंत्रपणे जगतात.
अॅनाबीनासारख्या शैवालांच्या काही जाती अॅझोला, सायकस व अँथोसिरॉस यांसारख्या वनस्पतींच्या शरीरातील कोशिकांमधून असणार्या पोकळ्यांमध्ये वाढतात, मात्र त्या जीवोपजीवी नाहीत. या वनस्पती हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण करून तयार झालेली नत्रयुक्त संयुगे आश्रयी वनस्पतींना उपलब्ध करून देतात. त्यामुळे दोहोंचाही फायदा होतो. सहजीवनाचे हे एक उदाहरण आहे.
अपिवनस्पती दुसर्या वनस्पतींवर वाढतात. त्यामुळे जमिनीवरच्या प्राण्यांपासून त्यांना संरक्षण मिळते. शिवाय उंचीने कमी असूनही उंच वृक्षांवर वाढत असल्याने त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. तसेच जमिनीवर वाढण्यास त्यांना जागेसाठी स्पर्धाही करावी लागत नाही.