फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅमॅरिंडस इंडिकस आहे. चिंच हा शिंबावंत व बहुवर्षायू वृक्ष मूळचा मध्य आफ्रिकेतील असून उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो. मध्ययुगीन काळात अरबी व्यापाऱ्यांनी हा वृक्ष यूरोपात नेला. प्रामुख्याने कोकण, कारवार आणि दक्षिण भारतात हा वृक्ष आढळतो. बऱ्याचदा या वृक्षाची लागवड शेताच्या कडेने, रस्त्याच्या दुतर्फा करतात. शिवाय पडजमिनीवर आणि गावाबाहेर आपोआप उगवलेले वृक्ष दिसून येतात.

चिंच (टॅमॅरिंडस इंडिकस)

चिंच हा सदाहरित व मोठ्या आकाराचा डेरेदार वृक्ष असून सु. २४ मी.पर्यंत वाढतो. साल जाड, खरबरीत आणि उभ्या रेषांनी भेगाळलेली दिसते. खोडाचा व्यास १.८ ते २.४ मी. असतो. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून त्यात पर्णिकांच्या १०—२० जोड्या असतात. फुले विरळ मंजिऱ्यावर पिवळी व लहान, तीन पाकळ्यांची मे-जून महिन्यात येतात. चिंचेची शेंग जाड, किंचित वाकडी, मांसल, न तडकणारी, साधारण चपटी व पिंगट असते. या शेंगांना सामान्यपणे चिंच म्हटले जाते. बिया (चिंचोके) ३—१२, चपट्या, टणक, काळपट लालसर आणि चकचकीत असतात.

चिंचेची साल, पाने, फुले व फळे औषधी आहेत. साल स्तंभक व पौष्टिक असते. पाने पाण्यात कुस्करून ते पाणी मूत्रमार्ग जळजळीवर पोटात घेतात. फुले भूकवर्धक असून वात व कफ यांवर गुणकारी आहेत. पिकलेली चिंच चवीला आंबट-गोड असून ती पाचक, सारक व शीतल आहे. त्यात टार्टारिक आम्ल तसेच अ, ब-समूह जीवनसत्त्वे, क जीवनसत्त्वे असतात. इतर कोणत्याही फळांच्या तुलनेत चिंचेच्या मगजात अधिक शर्करा आणि आम्ल असते. मगजाच्या आंबटपणामुळे भारतीय स्वयंपाकात खास करून चटणीत व आमटीमध्ये चिंचेचा वापर करतात. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ राज्यांतील लोकांच्या आहारात चिंचेचा वापर जास्त केला जातो. चिंचेचा मगज नुसता खातात किंवा त्यापासून जाम, सॉस, सरबत आणि पेय तयार करतात. बियांपासून मिळणारे पेक्टिन उद्योगांसाठी वापरतात. चिंचोक्यापासून तयार केलेली खळ घोंगडी, जेन (लोकर पसरून तयार केलेले जाजम) आणि सुती कापडाला कडकपणा आणण्यासाठी वापरतात. चिंचेचे लाकूड जड, जांभळट, पिंगट, टिकाऊ व टणक असल्याने बांधकामात तसेच बैलगाड्यांची चाके, कणे, नांगर, हत्यारांचे दांडे इ. वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. सालीपासून मिळणारे टॅनिन कातडे कमाविण्यासाठी वापरतात. पितळेची, तांब्याची भांडी चकचकीत करण्यासाठी चिंच व मीठ लावतात.