बावस्कर, हिम्मतराव सालुबा (३ मार्च, १९५१).

भारतीय वैद्य (physician). बावस्कर यांनी विंचूदंश व सर्पदंश यांवर गुणकारी औषधाचा शोध लावला.त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील डेहेड (भोकरदन तालुका) गावी अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण बुलढाण्याच्या सरकारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम्.बी.बी.एस्.ची पदवी मिळविली (१९७४) आणि नंतर पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून एम.डी. पदवी संपादन केली (१९८१). विद्यार्थीदशेत ‘‘कमवा आणि शिका’’ या योजनेत काम करून तसेच किरकोळ कामे करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. भोकरदन तालुक्यातील ते पहिले पदवीधर होत.

बावस्कर रायगड जिल्ह्यातील बिरवाडी, महाड, पोलादपूर, अलिबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच पूना चेस्ड हॉस्पिटल  यांत वैद्यकीय अधिकारी म्हणून १९७६—८६ पर्यंत कार्यरत होते. दरम्यान ते डॉ. प्रमोदिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले (१९८१). महाड येथे त्या दोघांनी बावस्कर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुरू केले. अतिदक्षता विभागासहित हे रुग्णालय सज्ज असून विंचूदंश व सर्पदंश यांमुळे उद्भवणारे रोग, अवटु कार्यन्यून्यता (Hypothyroidism), फ्ल्युओरिन क्षारांचे अति सेवन इत्यादी आजारावर तिथे गोरगरिबांवर मोफत उपचार केले जातात.

बावस्कर यांनी सलाइनद्वारे नायट्रोप्रुसाइड औषध देऊन तीव्र विंचूबाधा झालेले रुग्ण बरे केले आणि त्याच उपचार पद्धतीने केवळ एका महिन्यात पासष्ट विंचू विषबाधेचे रुग्ण बरे केले. सोडियम नायट्रोप्रुसाइडसारखे औषध अतिदक्षता विभागातसुद्धा फारसे वापरले जात नसल्याने त्यांनी अधिक सुरक्षित उपचारांचा शोध सुरू केला. वैद्यकीय शोधनिबंधांतून त्यांना प्राझोसिन नावाचे हृदय विकारावर उपयोगी पडणारे औषध ज्ञात झाले. विंचू दंशानंतर मानवी अधिवृक्क ग्रंथीमधून कॅटेकॉल अमाइन्स मोठ्या प्रमाणात रक्तात मिसळतात. यांवर उपचार म्हणून प्राझोसिन वापरता येईल, हा त्यांचा अंदाज खरा ठरला. त्यांनी प्राझोसिनचा वापर करून १२६ विंचू विषबाधेचे रुग्ण बरे केले (१९८४). ‘विंचू विषबाधेमुळे हृदयावर झालेल्या परिणामावर प्राझोसिन उपचार ’ अशा शीर्षकाचा त्यांचा शोधनिबंध ‘लान्सेट’ या जगन्मान्य वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला (१९८६). प्राझोसिन ह्या विंचू विषबाधेवरील उपचारामुळे मृत्यू होणाऱ्या कोकणातील रुग्णांची संख्या ३०—४० टक्क्यांनी कमी झाली. जवळपास तीस हजाराहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी विंचू दंश उपचार करण्यासाठी प्रशिक्षित केले. त्यांच्या या उपचार पद्धतीची दखल अनेक वैद्यकीय नियतकालिकांमध्ये घेतली गेली आहे. त्यांच्या या संशोधनावर त्यांना तीसहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संदर्भ :

  •  J Family Med Prim Carev.1(1); Jan-Jun 2012 ; NCBI Website, Lancet PMC3893953
  •  कार्यरत – यांत डॉ.हिंमतराव बावस्कर यांचे जीवन चरित्र लेखक – डॉ.अनिल अवचट
  • सांगण्यासारखे आहे म्हणून  – लेखक  श्री. एस्. एस्. देशमुख

समीक्षक – मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has One Comment

  1. डा.जुगलकिशोर लड्ढा,तिरोडा.जि.गोंदिया.

    आमच्या मेडिकल कालेज नागपूर१९७० च्या बॅच साठी अभिमानास्पद कारण डा.हिम्मत बावस्कर आमचे वर्ग मित्र.एक साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साधारण व्यक्तीची असाधरण, अलौकिक कामगिरी,,निश्र्चितच प्रशंसनीय आहे, गौरवास्पद आहे.

Comments are closed.