इस्लाम धर्मीयांचे पवित्र उपासनागृह. मक्केच्या सर्वश्रेष्ठ मशिदीच्या मध्यभागी असलेली, भुरकट दगडी व संगमरवरात बांधलेली, १२⋅२० मी. लांब, १०⋅६५ मी. रुंद व १५⋅२४ मी. उंचीची ही एकमजली इमारत सर्व इस्लाम जगताचा केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. या इमारतीला फक्त एकच दार असून विशेष प्रसंगीच ते उघडण्यात येते. इतर वेळी ही संपूर्ण इमारत, जरीकामाने कुराणातील आयते (वचने) भरलेल्या काळ्या कापडाने (किस्व) आच्छादलेली असते. हे आच्छादनाचे कापड दरवर्षी तयार करून, काबाभोवती घालण्याचा मान ईजिप्तकडे आहे. आयुष्यातून एकदातरी प्रत्येकाने मक्केची (काबाची) यात्रा करावी, अशी इस्लाम धर्मीयांकडून अपेक्षा असते व ती करण्याची त्यांची उत्कट इच्छाही असते. प्रत्येक यात्रेकरू काबाला सात वेळा प्रदक्षिणा घालतो. सर्व मुसलमान काबाच्या दिशेला तोंड करून नमाज पढतात. तसेच प्रेतेही काबाच्या दिशेला तोंड करून पुरतात.

मुहंमद पैगंबरांच्या काळी व त्याअगोदर काबामध्ये निरनिराळ्या अरब जमातींच्या व टोळ्यांच्या देवतामूर्ती होत्या. दरवर्षी सर्व अरब काबाची यात्रा करून आपापल्या देवतेच्या मूर्तीची पूजा करीत. मुहंमदांनी मक्का जिंकल्यावर ह्या मूर्ती नष्ट केल्या गेल्या. मक्का विजयानंतर प्रेषित उंटावर स्वार होऊन काबागृहात शिरले व त्यांनी आपल्या हातातील काठीने सर्व मूर्ती तोडल्या. एका अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही, हे त्यांना मूर्तीपूजकांना दाखवायचे होते. सध्या काबाच्या इमारतीत फक्त एक प्रचंड काळा दगड (‘हज्रे अस्वद’) आहे. प्रेषितांच्या तारुण्यात काबागृहाचा जीर्णोद्धार होत होता. त्या वेळी सर्व कबिल्यांचे सरदार हा दगड इमारतीच्या भिंतीच्या बाह्य भागावर आपल्या हाताने बसवू इच्छित होते. या भांडणाला संपविण्याकरिता त्यांनी मुहंमदांची निवड केली. मुहंमदांनी एक चादर मागविली. त्यावर आपल्या हातांनी तो दगड ठेवला. सर्व सरदारांनी चादरीला उचलून बांधकामस्थळी तो दगड नेला आणि प्रेषितांनी तो दोन्ही हातांनी उचलून दाखविलेल्या जागी बसवला. त्या वेळी मुहंमद हे प्रेषित झाले नव्हते, तर एक चारित्र्यसंपन्न सुस्वभावी तरुण होते. विशेष असे की, त्याला लोक पवित्र मानत; परंतु प्रेषितपूर्व काळातही त्याची पूजा केली जात नसे. काबागृहाच्या छताला आधार म्हणून तीन लाकडी खांब आहेत. छताला सोन्याचे व चांदीचे अनेक दिवे टांगलेले असून दारे, खांब, चौकटी यांवर चांदीचा मुलामा केलेला आहे. भिंती चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या आहेत.
आदिमानव आदमने प्रथम काबाची इमारत बांधली व ती पडल्यानंतर अब्राहम व त्यांचा पुत्र इस्माइल यांनी काबाचा जीर्णोद्धार केला. त्या वेळी ईश्वराने ही शिला पाठविली, अशी मुसलमानांची श्रद्धा आहे. ही शिला प्रथम शुभ्र होती. परंतु अनंत कालापासून प्रत्येक यात्रेकरू शिलेला हाताने स्पर्श करतो आणि तिचे चुंबन घेऊन आपले पाप तिला देतो. त्यामुळे ती काळीठिक्कर पडली, अशी समजूत आहे. काबाच्या इमारतीचा अनेकवेळा जीर्णोद्धार झाला असून, इ. स. ९३० मध्ये कार्मेथियन पंथाच्या आक्रमकांनी ही शिला पळविली होती; ती वीस वर्षांनी परत मिळाली. सध्या ही शिला भग्नावस्थेत असून चांदीच्या पट्ट्याने एकत्र बांधलेली आहे. या शिलेसमोर झमझम नावाची एक विहीर आहे. काबाचा जीर्णोद्धार करीत असताना इस्माइल व त्यांची आई हाजर यांची तृष्णा भागविण्यासाठी देवदूत गॅब्रिएलने ही विहीर उघडली, अशी आख्यायिका आहे. यात्रेकरू शिलेला स्पर्श करून झमझमचे पाणी पितात. काहीजण हे पवित्र जल आपल्याबरोबर नेतात.
“निःसंशय सर्वप्रथम उपासनास्थळ जे मानवाकरिता बांधण्यात आले, ते तेच आहे जे मक्का शहरी विद्यमान आहे. त्याला मांगल्य व समृद्धी दिली गेली आणि सर्व जगवासीयांकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनवले गेले” अशाप्रकारे या उपासनागृहाचा उल्लेख कुराण (कुरआन)मध्ये केला आहे (आलिइम्रान-९६). ही एक जवळपास घनाकृती इमारत आहे, जिच्या भोवती गोलाकार मशीद (मस्जिद) आहे. ह्या मशीदीला ‘मस्जिदे हराम’ असे म्हणतात. जगातील सर्व मुसलमान या काबागृहाकडे तोंड करून नमाज पठण करतात. काबागृहाच्या पूर्वेला जे देश आहेत, ते काबागृहाकडे म्हणजे पश्चिमेला तोंड करून नमाज पठण करतात आणि काबागृहाच्या पश्चिमेला जे देश आहेत, ते काबागृहाकडे तोंड करून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून नमाज पठण करतात. अशा तऱ्हेने काबागृहाला केंद्र मानून त्याच्या सभोवती वर्तुळाकार पद्धतीने संपूर्ण जगात दिशानिश्चिती करून मशिदी बांधल्या जातात आणि घरी-दारी, शेतातही या दिशेनेच तोंड करून नमाज पठण केले जाते. काबागृहाच्या जीर्णोद्धारानंतर दोन ते तीन हजार वर्षांनी प्रेषित मूसा आले (इ.स.पू. १२६२). त्यांच्यानंतर अंदाजे तीन शतकांनी प्रेषित सुलैमान (सॉलोमन) यांनी अल्लाहच्याच आज्ञेने जेरूसलेम (इझ्राएल) येथे ‘बैतुल मकदिस’ या नावाचे एक नवीन उपासनागृह बांधले असून यहुदी (ज्यू) लोक जे हजरत इब्राहीमचे दुसरे पुत्र प्रेषित इसहाक (आयझाक)चे कुटुंबीय व संतानांपैकी आहेत, त्यांचे हे उपासनास्थळ आहे. या प्रेषितांच्या कुटुंबीयांना कुराणात ‘बनी इझ्राएल’ असे संबोधले आहे आणि विशेष हे की, जरी ते बनी इझ्राएलनी बांधलेले होते, तरी ते त्या काळी असलेल्या सर्व मुस्लिमांकरिता उपासनागृह बनवले गेले. प्रेषित मूसांच्यानंतर आठशे ते नऊशे वर्षांनी हजरत अब्राहम यांचे पहिले पुत्र हजरत इस्माइल यांच्या घराण्यांत प्रेषित मुहंमदांचा जन्म झाला (२२-४-५७१इ.) आणि अल्लाहने त्यांना इ.स. ६१० मध्ये प्रेषित्व बहाल केले. १३ वर्षे मक्केत इस्लामचा प्रचार केल्यानंतर नातेवाईक, सरदार आणि उच्चभ्रूंचा विरोध आणि छळ असह्य झाल्यानंतर अल्लाहने त्यांना मदीनेस जाण्याची आज्ञा केली (१६-९-६२२इ.). यानुसार जे स्थलांतर झाले, त्याला ‘हिजरत’ असे म्हणतात. हजरत मुहंमदांच्या स्थलांतरानंतर सार्वजनिक रीत्या नमाज पठण करण्याची आज्ञा झाली आणि हे सर्व स्थलांतरित मुस्लिम मक्कास्थित काबागृहाकडे तोंड करून नमाज पठण न करता जेरूसलेमच्या ‘बैतुल मकदिस’ या उपासनागृहाकडेच तोंड करून नमाज पठण करत होते आणि पुढील १६-१७ महिने हेच त्यांचे उपासनाकेंद्र होते. त्यानंतर अल्लाहने ‘बनी इझ्राएल’ यांना नेतृत्वस्थानावरून पदच्युत केले आणि मक्कास्थित काबागृहाकडे तोंड करून नमाज पठण करण्याची आज्ञा दिली. म्हणजे आता नेतृत्व हजरत मुहंमदांचे राहील, असे घोषित झाले. परंतु ‘बनी इझ्राएल’ यांनी हा बदल मान्य केला नाही. तेव्हापासून यहुदी आणि मुसलमान आपापली वेगळी उपासनागृहे मानतात. म्हणून जगातील सर्व मुस्लीम जेरूसलेमच्या ‘बैतुल मकदिस’ला आपले पहिले उपासनागृह मानतात आणि मक्कास्थित काबागृहाला विद्यमान उपासनागृह मानतात. म्हणजे जेरूसलेममधील उपासनागृहावर तेही आपला ऐतिहासिक हक्क सांगतात. यामुळे यहूदी आणि मुसलमान यांत संघर्ष आहे. काबागृह या अर्थाने जगात मुस्लिमांचे उपासनागृहच नव्हे, तर त्यांना अल्लाहने बहाल केलेल्या धार्मिक नेतृत्वाचे प्रतीक आहे.
फेब्रुवारी इ.स. ६२८ मध्ये प्रेषितांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांना दिसले की, ते आपल्या अनुयायांसह मक्कास्थित काबागृहाच्या प्रदक्षिणा घालत आहेत. त्यांनी सकाळी ते स्वप्न आपल्या सोबत्यांना सांगितले. याच दिवशी अरबस्तानात पवित्र महिना ‘जिलकद’सुरू झाला होता. या महिन्यात सबंध अरब जगतात युद्धाला, हिंसेला प्रतिबंध होता. या काळात मक्का परिसर शांतताक्षेत्रच बनलेले असे. या संधीचा फायदा घेण्याकरिता हिजरतच्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदा प्रेषितांनी मक्कायात्रेला जाण्याची तयारी करण्यास आपल्या अनुयायांना सांगतले. १५०० सोबती, ७० उंट (बळी देण्यासाठी) आणि म्यान केलेल्या तलवारी घेऊन हे लोक निघाले. परंतु मक्काप्रवेशाच्या ६ मैल आधी त्यांना मक्काप्रवेशापासून रोखण्याकरिता २०० सैनिकांसह त्यांचा एक सेनापती (खालिद बिन वलीद) तेथे तळ ठोकून असल्याचे त्यांना समजले. संघर्ष टाळण्यासाठी प्रेषितांनी मार्ग बदलून उजवीकडील हुदैबिया या ठिकाणी तळ ठोकला. कुरैश हे युद्ध होणार म्हणून तयारी करीत आहेत, असे प्रेषितांना सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी दूतामार्फत खुलासा केला की, “पवित्र काबागृहाचे दर्शन घेणे एवढाच आमचा हेतू असून याला विरोध झाल्याशिवाय आम्ही लढणार नाही” यावर मक्कावासीयांनी सांगितले की, “तुम्ही या वेळेस परत जा व पुढील वर्षी याच काळात येऊन काबागृहाचे दर्शन घ्या.” अशा तऱ्हेने मुस्लिमांचा काबागृहाचे दर्शन घेण्याचा अधिकार मक्केच्या सरदारांनी मान्य केल्याने एक करार करण्यात आला, ज्याला ‘हुदैबियाचा शांतता करार’ असे म्हटले जाते. या करारात अनेक अटी होत्या. त्यांपैकी एक अट, १० वर्ष कुरैश (मक्कास्थित प्रेषितांच्या घराण्याचे इमान न आणलेले लोक) आणि मदीनेला हिजरत करून गेलेले मुसलमान यांच्यातील युद्धबंदी ही होती. या करारानंतर प्रेषितांनी सोबत आणलेल्या उंटांची कुरबानी केली आणि काबागृहाचे दर्शन न घेताच ते मदीनेला परत गेले. पुढच्या वर्षी फेब्रुवारी इ.स. ६२९ मध्ये हे लोक मदीनेहून मक्केला आले आणि शांततेत काबागृहाचे दर्शन घेतले. यानंतर एक वर्ष कुरैश करारावर कायम राहिले आणि नंतर त्यांनी त्याचा भंग केला. यामुळे प्रेषितांनी त्यांना करार मोडल्याची सूचना केली आणि इ.स. ६३० मध्ये रमजान महिन्याचे उपवास चालू असताना मक्केवर स्वारी केली आणि विजय मिळविला. त्यांनी स्वतः काबागृहातील सर्व मूर्ती तोडून टाकल्या आणि काबागृहाचे पावित्र्य बहाल केले.
संदर्भ :
- Husain, Athar, Prophet Muhammad and His Mission, New Delhi, 1967.
- Kidwai, Mohammad Asif, What Islam Is?, Lucknow, 1967.
- Salahi, M. A. Muhammad : Man and Prophet, Massachusetts, 1995.
- Watt, W. Montgomery, Muhammad : Prophet and Statesman, Edinburgh, 1960.
- अबुल हसन अली नदवी, इस्लाम : एक परिचय, नई दिल्ली, २०१६.
- केळकर, श्रीपाद, अनु. इस्लामची सामाजिक रचना, पुणे, १९७६.
समीक्षक – गुलाम समदानी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.