मानव प्राण्याची शारीरिक विविधता, उत्पत्ती, उत्क्रांती, विकास इत्यादींचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. यास भौतिकी मानवशास्त्र किंवा जैविक मानवशास्त्र असेही म्हटले जाते. जीवशास्त्रीय मानवशास्त्रामुळे पुरातत्त्वीय मानवशास्त्र या शाखेच्या अभ्यासास साह्य होते. मानवशास्त्राची ही शाखा इंग्लंडमध्ये जैवपुरातत्त्वविज्ञान या नावाने परिचित आहे. जीवशास्त्रीय मानवशास्त्रात मुख्यत: (१) मानव सर्वप्रथम कोठे व केव्हा उगम पावला? (२) मानव कसा दिसत होता? (३) मानवाच्या उगमापासून ते आजपर्यंत त्याची शारीरिक ठेवण व वैशिष्ट्ये कसकशी बदलत गेली? (पर्यायाने तो कसकसा उत्क्रांत होत गेला?) या तीन प्रश्नांचा ऊहापोह केला जातो. तत्कालीन आणि आजच्या मानवाची शारीरिक विविधता, या विविधतेमागील आहार-विहार, वर्तन, पर्यावरणविषयक कारणे आणि परिणाम इत्यादींचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. त्यात मानवातील रूपिकीय, मापनीय, आंतरबाह्य, जीवरासायनिक, आनुवंशिक इत्यादी सर्व प्रकारची विविधता तसेच मानवी वर्तनातील जैविक स्वरूप इत्यादींचा समावेश होतो.
जीवशास्त्रीय मानवशास्त्रात मानवाचे सजीव सृष्टीतील स्थान, मानव आणि मानवेतर नरवानर गण (Primates) या वर्गांची उत्क्रांती, प्राचीन मानव, मानवप्राणी (Man) त्यांचा उगम व विकास, उत्क्रांतीनुरूप मानवी जीवाश्म (Fossil) इत्यादींविषयक अध्ययन अंतर्भूत आहे. विविध नरवानर गण आणि अस्तित्वात असलेल्या प्राण्यांतील उत्क्रांतीविषयक संबंध समजण्यासाठी मानवशास्त्रज्ञ तुलनात्मक पद्धती वापरतात. जीवाश्मभूत अस्थींमधील तुलनात्मक आणि फरकांचा ते अभ्यास करतात. प्राचीन मानवांच्या अवशेषांची आपापसांत तुलना करून व त्यांची वर्तमान मानवांशी तुलना करून मानवाच्या शरीररचनेच्या विकासावर प्रकाश पडतो.
नरवानर गणातील माकड, कपी आणि माणूस यांचा पूर्वज गट (ancestral stock) हा एकच होता आणि कालानुरूप, उत्क्रांतीद्वारे हे सर्व एकमेकांपासून वेगळे होत गेले. या कपिगटामध्ये ‘ओरँगउटान’ हा आशियाई कपी आणि गोरिला व चिंपँझी हे आफ्रिकन कपी यांचा समावेश होतो. आजचा माणूस हासुद्धा आफ्रिकेतच उत्पन्न झाला असून चिंपँझी हा त्याचा सर्वांत जवळचा चुलत भाऊबंद आहे असे आपण म्हणू शकतो. माकड-नरवानर कपी म्हणजे गोरिला, चिंपँझी आणि आधुनिक मानव यांच्या शरीररचनेत – अस्थिस्वरूपात – जो बदल होत गेला आहे, त्याचाही अभ्यास या शास्त्रात होतो. प्रसिद्ध ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (Charles Darwin) यांनी १८५९ मध्ये द ऑरिजिन ऑफ स्पीशीज आणि १८७१ मध्ये द डीसेंट ऑफ मॅन ही दोन पुस्तके लिहिली. त्यांत मानवाचा विकास निम्नस्तरीय प्राणिजीवांपासून झाला, असा सिद्धांत मांडला आहे. हा सिद्धांत आता सर्वमान्य आहे.
प्रत्यक्षात जगातील सर्व मानव सेपियन या एकाच प्रजातीचे घटक आहेत. तरीही आपल्यात विविधता आहे. ही विविधता फक्त दृश्य स्वरूपातील म्हणजेच त्वचेचा रंग किंवा नाकाचा आकार अशा प्रकारची नसून रक्तगट आणि जीवरासायनिक घटक यांमध्येही असते. त्वचाविज्ञानामध्ये (Dermatoglyphics) हाता-पायांचे तळवे आणि बोटांवरील ठशांचा, रेघांचा अभ्यास केला जातो. पोलीस आणि न्यायवैद्यक (Forensic medicine) खात्यात त्याचा व्यापक उपयोग होतो; त्याप्रमाणेच अनुवंशशास्त्र दृष्ट्याही त्याला खूप महत्त्व असते.
मानवसमूहांची शरीरविषयक तुलना करण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागांची, सांगाड्यांच्या अस्थींवर मोजमापे घेतात, त्यास ‘मानवमिती’ (Anthropometry) असे म्हणतात. यातून मानवाच्या शरीरावर किंवा अस्थींवर मोजमापे घेण्याची तंत्रे, मानवाचे लिंगभेदानुसार वर्णन, व्यक्ती–व्यक्तीतील शारीरिक विभिन्नतेचे वर्णन, शारीरिक रचनाशास्त्र व शरीरवाढीचे मानवशास्त्र, शरीरवाढीचे नियम, आहार व पोषण, शरीरमापनावरून व्यक्तीची वाढ इत्यादी गोष्टी अभ्यासता येतात. आहार आणि वाढ यांवरून व्यक्तीचा पोषणदर्जा कळू शकतो. तसेच मानवीय मानसशास्त्र, विविध शरीरप्रकार व रोग यांचा संबंध, आनुवंशिकताविज्ञान (Gentics), पर्यावरण आणि मानवी आरोग्य, मानवी दातांचा आकार आणि स्वरूप यांतील विविधता, काळानुरूप त्यात झालेली स्थित्यंतरे अभ्यासली जातात. जसे की शेती व्यवसाय व प्रक्रियायुक्त शिजविलेल्या आहारामुळे दात आणि जबड्यावरील कामाचा ताण कमी झाला आणि हजारो वर्षांच्या या आहारपद्धतीमुळे दात आणि जबड्याचा आकार लहान झाला. हा बदल सूक्ष्म असला, तरी वर्तनातील फरकांमुळे झालेली उत्क्रांती ती हीच होय.
मानवाची त्वचा, केस, डोळ्यांचा रंग, आकार, शरीरावरील केसांचे प्रमाण, डोळ्यांच्या घड्या, नाकाचा आकार आणि उंची, कुंदकळ्यासारखे दात, पुढे आलेले दात, पुढे अथवा आत बसणारे जबडे, कानाच्या, सुट्या अथवा चिकटलेल्या पाळ्या, हनुवटी, खळ्या पडणारे गोल गोबरे गाल यांवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व निर्माण होत असले, तरी या सौंदर्यामागे आनुवंशिकतेचे क्लिष्ट नियम असतात. ही विविधता जरी व्यक्तिनिष्ठ असली, तरी एखाद्या समाजाचे किंवा त्यातील समूहाचे गुणधर्म आणि स्वरूप समान असतात. याशिवाय रंगांधळेपणा, चवीचे ज्ञान, रक्तगटाचे विविध प्रकार, हिमोफेलिया, दात्र-कोशिका पांडुरोग (Sickle Cell Anaemia) अशा गुणधर्मांचाही अभ्यास याच शाखेत होतो. आनुवंशिकता विज्ञानाचा विकास झाल्याने या सर्वांमागील आनुवंशिकतेचा अभ्यास जास्त परिणामकारक रीत्या करता येतो. मानवामानवांत आनुवंशिक साम्य आणि फरक काय असतात? त्यांचा उगम अथवा लोप कसा होतो? दोन मानवसमूहांतील साम्य अथवा फरक आनुवंशिकतेच्या तत्त्वाने समजण्यासारखा आहे का? आनुवंशिकता, रोग व मानवसमूह यांचे संबंध काय असतात? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शारीरिक मानवशास्त्रज्ञ आनुवंशिकतेचा अभ्यास करतात. वंशाचा बुद्धिमत्तेशी किंवा प्रगत, अप्रगत आचारविचारांशी काहीही संबंध नाही, हा विचार शारीरिक मानवशास्त्राने प्रस्थापित केला. तसेच वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या मानवांच्या शरीररचनेला सोयीस्कर असे कपडे, पादत्राणे, यंत्रे, गाड्या व त्यांना चालविण्याकरिता बसायच्या जागा, तसेच विविध रोगांचा व मानवसमूहांचा संबंध इत्यादी बाबतींत शारीरिक मानवशास्त्रज्ञांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणाकरिता अनुप्रयुक्त मानवशास्त्रात केला आहे.
मानवशास्त्राचा उल्लेख सुरुवातीच्या काळात मानववंशशास्त्र असाच होत होता. मानवसमूहामधील विविधतेमुळे वेगवेगळे मानवी वंश मानले गेले. प्रत्यक्षात ज्या त्या भौगोलिक भागातील वास्तव्य, त्याला अनुसरून आहार, विहार आणि निर्माण झालेले अनुकूलन; यांशिवाय असंख्य वर्षे अस्तित्वात असलेले आंतरविवाही गट, आपल्याच पंचक्रोषित विवाह करण्याची पद्धत यांमुळे ठराविक वैशिष्ट्यांसह किंवा गुणधर्मांसह मानवी गटांमधील विविधता ही त्या त्या गटाची वैशिष्ट्ये ठरू लागली. पुढे याच गटांच्या वैशिष्ट्यांमागील पर्यायाने वंश कल्पनेमागील मर्यादा लक्षात आल्यावर वंश कल्पनाच या मानवशास्त्राने रद्दबातल ठरविली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शारीरिक मानवशास्त्राच्या अभ्यासप्रणालीमध्ये मोठे आमूलाग्र बदल घडून आले. १९५० च्या दशकात ‘शारीरिक मानवशास्त्र’ हे वंशशास्त्राच्या तात्त्विक बैठकीतून बाहेर पडून उत्क्रांतीवादी आणि गतिशील असे शास्त्र बनले. मानवाचा अभ्यास फक्त वांशिक वर्गीकरणापुरता मर्यादित न राहता, मानवी उत्क्रांती व त्याच्या वैविध्याचा, जीवशास्त्रीय व सांस्कृतिक संबंधाचा अभ्यास या नवीन चौकटीत केला जाऊ लागला. यामुळेच आज ‘शारीरिक मानवशास्त्र’ ही संज्ञा कालबाह्य ठरली असून त्याऐवजी ‘जीवशास्त्रीय अथवा जैविक मानवशास्त्र’ ही योग्य संज्ञा वापरली जाते.
साठच्या दशकातील डी. एन. ए., प्रथिने व ॲमिनो आम्ल, विद्युत निःस्सरण (Electrophoresis) तंत्रज्ञान, तसेच मानवाच्या पूर्वजांच्या अनेक जीवाश्मांच्या शोधांमुळे जैविक मानवशास्त्र हे मानवाच्या उत्पत्ती, उत्क्रांती व जैविक वैविध्यावर अधिक परिपूर्णतेने प्रकाश टाकू लागले. १९९० ते २००० या दशकात बहुवारिक शृंखला क्रिया (Polymerase Chain Reaction), डी. एन. ए. क्रमवारी (DNA sequencing) आणि मानवी जनुक क्रमावारी (संच) प्रकल्प (Human Genome Sequencing Project) या क्रांतिकारी घटनांमुळे मानवशास्त्रच नाही, तर इतर सर्वच जैवशास्त्रीय शाखाप्रणाली व तीमधील संशोधने आणि पर्यायाने सर्व मानवी जीवनच ढवळून निघाले. या काळातील संशोधनाचे सार खालीलप्रमाणे मांडता येईल :
पृथ्वीवरील विविध खंडांतील मानवप्राण्यांमध्ये जरी दर्शनीय शारीरिक विविधता दिसली, तरी विविध मानवी समूह हे जैविक आणि जनुकीय दृष्ट्या एकमेकांशी खूपच मिळतेजुळते
आहेत. चिंपँझीचे ९८% जनुकीय गुणधर्म मानवीय जनुकांशी मिळतेजुळते आहेत. मानवाचे बाह्य गुणधर्म व रंगरूप यांत वैविध्य असले, तरी त्याचे कारण उत्क्रांती व जैविक अनुकूलन असून त्याचा ‘वंश’ या संकल्पनेशी काहीही संबंध नाही. किंबहुना बाह्य गुणधर्म हे मानवी जनुक संचाच्या (Genome) खूपच कमी भागांवरून ठरतात. त्यामुळे त्यांचा वापर करून वंश वर्गीकरण करणे हे विज्ञानाला धरून होत नाही. यामुळे ‘वंश’ या संकल्पनेचा आता वैज्ञानिक दृष्ट्या वापर केला जात नाही. साधारणपणे ३ लक्ष वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची (Homo sapiens) उत्पत्ती ही आफ्रिका खंडात झाली व साधारणपणे १ लक्ष ९५ हजार ते ६५ हजार वर्षांपूर्वी अनेक वेळा हा आधुनिक मानव आफ्रिका खंडाबाहेर अनेक मार्गांनी पसरला. यामध्ये ८० हजार ते ६५ हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचे इतर खंडांतील स्थलांतर महत्त्वाचे आहे. या प्रसारातच आधुनिक मानवाने सर्व पृथ्वी पादाक्रांत केली. यालाच ‘आफ्रिकेतील उगम आणि बाहेर प्रसार’ (African Origin and Out of Africa Theory) सिद्धांत म्हणतात. या कालखंडातील मानवाच्या वाटचालीत पश्चिम आशियातील अगोदरच स्थित निअँडरथल मानवाबरोबर आधुनिक मानवाचा संकर घडून आला किंवा त्यांचे जनुकीय मिश्रण घडून आले. यामुळे आफ्रिकेबाहेर आज आढळणाऱ्या सर्व मानवांच्या जनुक संचामध्ये निअँडरथल मानवाचे ३% ते ५% जनुकीय मिश्रण आढळून येते. इतर मानवांचे (उदा., डेनिसोव्हंस मानव) अशाच प्रकारचे मिश्रण हे काही मानवांमध्ये दिसून येते. याचाच अर्थ असा की, आधुनिक मानवाच्या प्रसारामध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागात अस्तित्वात असणाऱ्या इतर मानवी प्रजातींबरोबर आधुनिक मानवाचा संकर झालेला आहे. आधुनिक डी. एन. ए. तंत्रज्ञानाच्या विश्लेषणातून हे वारंवार सिद्ध झाले आहे की, आज जगातील कोणतीही व्यक्ती ही शुद्ध वंशाची नसून मानवाच्या विविध सांस्कृतिक गटांमध्ये वारंवार सरमिसळ होत गेलेली आहे. विसाव्या शतकातील विविध तंत्रज्ञान पद्धती जसे, डी. एन. ए. क्रमवारी, त्रिमितीय छायाचित्रण, त्वचेच्या रंगाचे तसेच केसांच्या रंगांचे प्रकाश परिवर्तनाने करण्यात येणारे अचूक मोजमाप व जनुकीय अभ्यास संघटना यांसारख्या आधुनिक संशोधन पद्धतींच्या साह्याने आजच्या मानवाच्या बाह्यरूपाला कारणीभूत असणारी जनुकीय कारणे, उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा त्यातील सहभाग व त्यातून निर्माण होणारी विविधता हे सर्व उलगडण्यास मदत झाली आहे. तसेच विविध वातावरणांतील उष्णता, आर्द्रता इत्यादींबरोबर अनुकूलन होताना मानवाच्या शरीराचा तसेच नाकाचाही आकार बदलत गेलेला आहे. पुरामानवशास्त्र, मानवी जीवाश्म विज्ञान, रेणवीय मानवशास्त्र, भूगर्भशास्त्र, पुरातत्त्वविद्या या सर्व शाखांमधील आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या संशोधनामुळे आजच्या काळातील संशोधन हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि आंतरशास्त्रीय झाले आहे.
समीक्षक – एस. आर. वाळिंबे