प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन मानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. जैविक मानवशास्त्र, भाषिक मानवशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र आणि सांस्कृतिक मानवशास्त्र यांप्रमाणेच पुरातत्त्वीय मानवशास्त्र हीसुद्धा मानवशास्त्राची एक उपशाखा आहे. लुप्त संस्कृतीचे मानवशास्त्र म्हणजे पुरातत्त्वविद्या होय. पुरातत्त्वीय मानवशास्त्राचा अभ्यास करताना मानवशास्त्रातील जैविक मानवशास्त्र या शाखेचा उपयोग होतो.

अठराव्या शतकामध्ये प्राचीन मानवी संस्कृतीची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्या वेळी उत्खननांत सापडलेल्या पुरातन काळातील वस्तू संग्रहित करण्यात आल्या. या वस्तुंवरून त्या त्या समाजाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात झाली. प्रसिद्ध प्राचीन वस्तुसंशोधक विल्यम स्टकली यांनी १७२० मध्ये उत्खननशास्त्राचा अभ्यास केला. ॲव्हबरी यांनी या अवशेषांचा अर्थ प्रस्तुत कारण्याचे काम केले. नंतर एकोणिसाव्या शतकात पुराणवस्तुशास्त्रात प्रगती झाली. तसेच प्रागैतिहासकालीन मानवाचा इतिहास समजण्यासाठी भूगर्भशास्त्राचीही मदत घेण्यात आली; मात्र प्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ चार्ल्स रॉबर्ट डार्विन (Charles Robert Darwin) यांनी १८५९ मध्ये लिहिलेले दि ऑरिजिन ऑफ स्पीशीज आणि १८७१ मध्ये लिहिलेले दि डीसेंट ऑफ मॅन हे प्राणी जाती विषयक ग्रंथ, भूगर्भशास्त्रीय ज्ञान, वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास आणि थॉमसन यांनी प्राचीन हत्यारांचे केलेले वर्गीकरण या चार साधनांमुळे मानवी विकासाचे टप्पे कल्पिण्यात मोलाची मदत झाली.

भौतिक वस्तूंच्या अवशेषांवरून प्राचीन संस्कृतिविषयक अंदाज पुरातत्त्वज्ञ करतात. तसेच वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींचे परस्परसंबंध लक्षात घेण्याचे प्रयत्नही केले जातात. अवशेषांचे हे पुरावे प्रागैतिहासिक (म्हणजे लेखन संस्कृती पूर्वीचे), इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक (म्हणजे लेखन संस्कृती काळातील) असे वर्गीकृत करता येतात. पुरातत्त्ववेत्ता वस्तुरूप उपकरणांच्या अवशेषांवरून कौटुंबिक जीवन, राज्यसंघटना, धार्मिक श्रद्धा इत्यादींविषयक अंदाज वर्तवितो; तसेच संस्कृतिविषयक कालखंडही ठरवितो. शेतीनिष्ठ अर्थव्यवस्था, लाकडी घरे व चकचकीत दगडांची औजारे असलेली संस्कृती ही अन्न–संकलन करणारी अर्थव्यवस्था, गुंफा निवास व दगडाची ढलपी काढून तयार केलेली औजारे असलेल्या संस्कृतीनंतर झाली, इतके अंदाज पुरातत्त्वविद्येत केले जातात.

पुरातत्त्ववेत्ता हा सांस्कृतिक इतिहास व विकासाची दिशा दर्शवितो. हाडांच्या अवशेषांवरून मानवप्राण्याच्या उगम–विकासाबाबत तो शारीरिक मानवशास्त्रास बहुमोल मदत करतो. तसेच संस्कृतीची निर्मिती कोठे झाली? तिचा विकास कसा झाला? तिचे प्रकार व स्वरूप कोणते होते? शेतीची तंत्रे कशी बदलत गेली? लोखंड आणि कास्य (ब्राँझ) या धातुंचा वापर केव्हापासून प्रचारात आला? इत्यादी समस्यांवर तौलनिक संशोधन करून पुरातत्त्ववेत्ता प्रकाश टाकतो. त्यावरून सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञास संस्कृतीचा विकास जगाच्या सर्व भागांत सारखा झाला नाही, तसेच संस्कृती परिवर्तनाचा वेग सर्व ठिकाणी सारखा नव्हता हे ज्ञात झाले. ईजिप्त, भारत, चीन, मेसोपोटेमिया व यूरोपातील संस्कृती यांच्या परिवर्तनाचा वेग ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका व आफ्रिका यांतील आदिवासी संस्कृतीच्या परिवर्तन वेगापेक्षा जास्त होता. यावरून पुरातत्त्वविद्येत केवळ प्राचीन संस्कृतीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला जातो असे नव्हे, तर संस्कृती परिवर्तनाबाबतही विचार मांडले जातात. याचा सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञास फार उपयोग होतो. आज पुरातत्त्वज्ञांनी पुरातत्त्वविद्या शाखेद्वारे अनेक प्राचीन अवशेषांचे पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संशोधन करून मानवाच्या अनेक प्रश्नांचा उलगडा केला आणि आजही करीत आहे.

समीक्षक – एस. आर. वाळिंबे

प्रतिक्रिया व्यक्त करा