यूरी, हॅरल्ड क्लेटन : (२९ एप्रिल १८९३ — ५ जानेवारी १९८१).
अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी हायड्रोजनाचा जड अणू म्हणजेच ड्यूटेरीयम (Deuterium) याचा शोध लावला. या शोधासाठी त्यांना १९३४ सालातील रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. पृथ्वीवरील जीवोत्पत्तीच्या वेळेस कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडून आल्या असतील याबाबत यूरी यांचा अभ्यास होता.
यूरी यांचा जन्म अमेरिकेतील वॉकरटन (इंडियाना) शहरी झाले. त्यांचे शालेय शिक्षण वॉटर्लू (इंडियाना) येथे झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही दिवस शाळेत शिक्षकाची नोकरी केली (१९११-१४). पुढे त्यांनी माँटॅना विद्यापीठात प्राणिशास्त्र या विषयाबरोबरच रसायनशास्त्र या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हा कालावधी पहिल्या महायुद्धाचा होता त्यामुळे युध्दाच्या प्रसंगी लागणाऱ्या साधनसामग्रीची जास्त मागणी होती. युद्धसामग्री तयार करणाऱ्या एका कारख़ान्यात त्यांनी रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले. हे काम करत असतानाच त्यांनी भविष्यात रसायनशास्त्र हा विषय घेऊन अधिक अभ्यास करायचे ठरविले. पहिले महायुद्ध संपल्यावर यूरी यांनी माँटॅना विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवली (१९२३). ही पदवी मिळवताना गिल्बर्ट न्यूटन ल्यूइस यांचे मार्गदर्शन मिळाले. हायड्रोजन अणूतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळीवर होणारी विभागणी आणि वायूरूप रेणूमधील औष्णिक आणि गतिमान शक्तीच्या संदर्भातील गणिती भाग हे यूरी यांच्या प्रबंधाचे विषय होते, त्यांनी मांडलेली गणिती मूल्ये जवळजवळ बरोबर होती. त्यानंतर त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्र या कोपनहेगन शहरातील संस्थेमध्ये नील्स बोर यांच्या बरोबर संशोधन केले (१९२३-२४). हा काळ त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा काळ होता. त्यानंतर यूरी यांनी जॉन हॉप्किन्स विद्यापीठात पुंजकिय गतिशास्त्र या विषयाचे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन केले.
यूरी नंतर न्यूयार्कमधील कोलंबिया विद्यापीठात आले (१९२९). अणू आणि रेणूचे गुणधर्म, मूलद्रव्यांची समस्थांनके या विषयावर त्यांनी संशोधनास सुरुवात केली. काही मूलद्रव्यांच्या एका अणूतील प्रोटॉनची संख्या (अणूअंक) सारखीच असते, पण त्यांचे अणुवस्तुमान वेगवेगळे असते, या संदर्भात फेड्ररीक सॉडी यांनी संशोधन केले होते (१९१३). १९२० सालापर्यंत कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांमध्ये अशा प्रकारांची समस्थानके असतात याचे संशोधन झाले होते. यूरी आणि मर्फी यांनी हायड्रोजनची समस्थानके वर्णपट पद्धतीने मिळवली. त्यासाठी त्यांनी बालमर वर्णपट मालिका वापरली. बालमर वर्णपट मालिकेच्या अभ्यासातून यूरी यांच्या असे लक्षात आले की, हायड्रोजनच्या अणूंपैकी एक अणू इतर अणूंपेक्षा जड आहे. बालमर वर्णपट मालिकेत आढळलेला हायड्रोजनचा जड अणू म्हणजेच ड्यूटेरीयम.
मूलद्रव्यांच्या समस्थनिकांच्या रासायनिक गुणधर्मात फरक असतो. या फरकावरून यूरी यांनी १८ कोटी वर्षांपूवी पृथ्वीवर किती तापमान होते ते शोधून काढले. पृथ्वीवरील मूलद्रव्यांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करताना, भूरसायनशास्त्राच्या अभ्यासावर भर दिला. पृथ्वीवरील जीवोत्पत्तीच्या वेळेस कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडून आल्या असतील याचा अभ्यास त्यांनी केला. विश्वाची उत्पत्ती कशी झाली असेल या विषयातही त्यांना रस होता. ऑक्सिजनचे समस्थानक (O-१८ /O-१६ ) ह्या गुणोत्तराचा उपयोग भूशास्त्रात कालमापन करण्याचे कामही त्यांनी केले. प्राणिशास्त्र, भूरसायनशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशात्र, खगोलशास्त्र या विज्ञानातील महत्त्वाच्या शाखांमध्ये संशोधन करण्यात यूरी आघाडीवर होते. दुसर्या महायुद्धाच्या काळापर्यंत यूरी ही समस्थानकांच्या वेगळे करण्याच्या प्रयत्नाकरिता प्रसिद्ध झाले होते, म्हणूनच त्यांना मॅनहॅटन अणूसंशोधन प्रकल्पात बोलावले गेले. नैसर्गिक युरेनियम पासून U-2350 समृद्ध करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाचे योगदान केले. तसेच जड पाणी (D2O) बनविण्याच्या प्रक्रियेत पण त्यांच्या संशोधनाचा उपयोग महत्त्वाचा ठरला.
यूरी यांनी ॲटम्स, मॉलिक्यूल्स अँड क्वांटा (Atoms, Molecules and Quanta; १९३०) व द प्लॅनेट्स (The Planets; १९५२) ही पुस्तके लिहिली असून, त्यांना अनेक विद्यापीठांनी मान-सन्मान केला होता.
यूरी यांचे हॉइया, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
संदर्भ :
समीक्षक – श्रीराम मनोहर