अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्यातील सर्वांत लांब नदी. येथील ॲडिराँडॅक पर्वतश्रेणीत माऊंट मार्सी (उंची १,६२९ मीटर) हे न्यूयॉर्क राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. या शिखराच्या परिसरातील हिमनद-पश्च कल्पातील अनेक लहान-लहान सरोवरांमधून या नदीच्या वेगवेगळ्या लहान शीर्षप्रवाहांचा उगम होतो. त्या शीर्षप्रवाहांपैकी ओपेलसेंट या मुख्य शीर्षप्रवाहाचा उगम ‘लेक टियर्स ऑफ क्लाऊड’ या सरोवरातून होतो. या नदीची एकूण लांबी ५०७ किमी. असून जलवाहनक्षेत्र ३४,६२८ चौ.किमी. आहे. त्यांपैकी ९३ टक्के क्षेत्र न्यूयॉर्क राज्यातील असून उर्वरित ७ टक्के क्षेत्र व्हर्मॉंट, मॅसॅचूसेट्स, न्यू जर्सी व कनेक्टिकट या राज्यांतील आहे. या नदीचा संपूर्ण प्रवाहमार्ग न्यूयॉर्क राज्याच्या पूर्व भागातून वाहत असून अखेरचा फक्त ३४ किमी. लांबीचा प्रवाहमार्ग न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी राज्यांच्या सरहद्दीवरून वाहतो.

उगमापासून सॅराटोगा परगण्यातील कॉरिंथपर्यंतचा १७४ किमी. लांबीचा वळणावळणाचा नदीप्रवाह सामान्यपणे आग्नेयीस वाहतो. त्यानंतरचा हडसन फॉल्स या गावापर्यंत ती ईशान्येस वाहते. त्यानंतर मात्र ती सखल प्रदेशातून दक्षिणेस सुमारे ३२० किमी. वाहत जाऊन न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या शहरांच्या दरम्यान असलेल्या अपर न्यूयॉर्क बे (अपर बे) उपसागरास मिळते. हा उपसागर म्हणजे प्रत्यक्षातील हडसन नदीची नदीमुख खाडी असून तिला सामान्यपणे न्यूयॉर्कचे बंदर म्हणून ओळखले जाते. हा उपसागर अटलांटिक महासागराचा फाटा आहे. मुखापासून समुद्राकडील प्रवाह हा निम्नज्जीत कॅन्यनमधून वाहतो. मुखापासून आत उत्तरेस ट्राय येथील फेडरल धरणापर्यंत सागरी लाटांची सरासरी उंची १.४ मीटर असते. वेस्टचेस्टर ते रॉकलँड परगण्यांदरम्यानच्या हेवरस्ट्रॉ उपसागर भागात या नदीची सर्वाधिक रुंदी ५ किमी. आढळते. त्यानंतर मुखाकडे ती १.२ किमी. इतकी कमी झालेली आहे. दक्षिण न्यूयॉर्कपासून उत्तर न्यू जर्सीपर्यंतच्या नदीच्या काठावर पॅलिसादेश ही तीव्र उताराच्या कड्यांची मालिका पसरलेली आहे.

एकोणिसाव्या शतकात शँप्लेन (इ. स. १८२३), ईअरी (१८२५) आणि डेलावेअर – हडसन (१८२८) या तीन कालव्यांच्या निर्मितीमुळे हडसन नदी पंचमहासरोवरे व डेलावेअर नदीशी तसेच सेंट लॉरेन्स नदीच्या खालच्या खोऱ्याशी जोडली गेली. त्याचा विशेष फायदा मिडवेस्ट आणि न्यूयॉर्क शहरांच्या विकासास झाला. मोहॉक या प्रमुख उपनदीसह हडसन नदी ही देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या व्यापारी जलमार्गांपैकी एक बनली आहे. मोहॉक हडसन यांच्या संगमाजवळ फेडरल धरण आहे. ट्राय येथे नदीपात्राची सस.पासून उंची एक मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे भरती-ओहोटीच्या लाटांचा प्रभाव फेडरल धरणापर्यंत जाणवतो. ऑल्बानी बंदरापासून न्यूयॉर्कपर्यंत नदीची खोली १० ते ६१ मीटरपर्यंत वाढत जाते. त्यामुळे व्यापारी जलवाहतूक सुकर होते.

महिकन (मोहिकन) इंडियन लोक या नदीला अविरतपणे गतिमान राहणारे मोठे पाणी (Great Water Constantly in Motion) या अर्थाने ‘मुहेकुनुक’ असे संबोधत असत. जोव्हान्नी दा व्हेर्रास्तानो या इटालियन समन्वेषकाने १५२४ मध्ये या नदीमार्गातून वरच्या बाजूने काही अंतर प्रवास केला; परंतु त्यांना ही समुद्राची खाडी असल्याचा गैरसमज झाला. १६०९ मध्ये हेन्री हडसन या इंग्रज समन्वेषकाने या नदीचे समन्वेषण केले. त्याच्या नावावरून या नदीला हडसन हे नाव दिले गेले. सतराव्या शतकात फर व्यापाराच्या दृष्टीने या नदीला विशेष महत्त्व होते. १६२९ मध्ये या नदीच्या खोऱ्यात डच वसाहतींच्या स्थापनेस सुरुवात झाली. अमेरिकन क्रांतीच्या काळात सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने या नदीचा जलमार्ग विशेष महत्त्वाचा ठरला होता. त्या वेळी

या नदीच्या खोऱ्यात अनेक लढाया लढल्या गेल्या. ख्यातनाम अमेरिकन लेखक वॉशिंग्टन आयर्विंग यांच्या कथांमधून या खोऱ्यातील सृष्टीसौंदर्य आणि रहिवाशांचे वर्णन आढळते. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १८७२ मध्ये आपले ठाणे या नदीच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील न्यूबर्ग येथे स्थापिले होते. एकोणिसाव्या शतकात ‘हडसन रिव्हर स्कूल’ या निसर्गचित्रण करणाऱ्या गटाने आपले कार्य याच नदीच्या खोऱ्यात सुरू केले होते.

हडसन नदीच्या काठावर वसलेल्या शहरांपैकी ट्रॉय, हडसन, किंग्स्टन, पोघकिप्सी, न्यूबर्ग, पीकस्किल, याँकर्स ही न्यूयॉर्क राज्यातील; तर वीहवाकेन, होबोकेन व न्यू जर्सी ही न्यू जर्सी राज्यातील प्रमुख शहरे आहेत. हडसन नदीखोऱ्यातील सुमारे ६० टक्के पाणी व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. ही नदी अनेक शहरांची जीवनदायीनी असली, तरी अलीकडच्या काळात औद्योगिक अपशिष्टे, वाहितमल इत्यादींमुळे नदीचे सततचे होणारे प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. विविध पर्यावरण संरक्षण गटांनी या नदीच्या पर्यावरणीय मूल्यांचे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु ते प्रयत्न अपुरे पडत आहे.

समीक्षक : वसंत चौधरी