कुलकर्णी, वा. ल. :  (६ एप्रिल १९११ – २५ डिसेंबर १९९१). प्रसिद्ध मराठी समीक्षक.जन्म जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकला तर महाविद्यालयीन शिक्षण हं. प्रा. ठाकरसी महाविद्यालयात झाले. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रारंभी ते मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून अध्यापन व संशोधनाचे कार्य केले (१९५९ ते १९७३). त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातही त्यांनी विभागप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. १९७६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

त्यांनी १९३५ मध्ये पारिजात मासिकातून समीक्षा लेखनास प्रारंभ केला. नंतर ज्योत्स्ना,समीक्षक,अभिरूची,सत्यकथा, छंद, प्रतिष्ठान, समीक्षा इत्यादी नियतकालिकांतून लेखन केले. १९४० मध्ये समीक्षा मासिकात त्यांनी संपादक म्हणून कार्य करत ‘वाङ्मयातील वादस्थळे’ या नावाचे सदर लिहिले. सत्यकथा या नियतकालिकात नववाङ्मयाचे स्वरूप विशद करणारे लेखन केले. त्यांच्या नववाङ्मयविषयक भूमिकेमुळे त्यांची नवप्रवृत्तीचे मीमांसक म्हणून ओळख निर्माण झाली.१९५९ पासून प्रतिष्ठान या नियतकालिकाच्या संपादक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. वा.लं.नी मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार समितीमध्ये यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.त्यांचा भारतीय भाषा व साहित्यासोबतच इंग्रजी साहित्याचाही उत्तम व्यासंग होता. इंग्रजी भाषा व साहित्याच्या प्रभुत्वामुळे त्यांची ‘विलायती वालं’ म्हणून ओळख निर्माण झाली होती.

‘वाङ्मयीन सत्याच्या संशोधनाचे कार्य अखंड असते, त्याला शेवट नाही’ या तत्त्वाने वा. लं. नी समीक्षा लेखन केले. त्यांचे लेखन हे वाङ्मयातील प्रश्नांच्या उत्तरासाठी, शोधासाठी असल्याने त्याचे स्वरूप स्फूट आहे. त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये वामन मल्हार : वाङ्मयदर्शन (१९४४), वाङ्मयातील वादस्थळे (१९४६), वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९), वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी (१९५३), वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन, श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन (१९५९) साहित्य आणि समीक्षा (१९६३), मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार, नाटककार खाडिलकर : एक अभ्यास (१९६५) साहित्य : शोध आणि बोध (१९६७), न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन, हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३) साहित्य: स्वरूप आणि समीक्षा (१९७५), विविधज्ञानविस्तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६) व मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०) इत्यादी  समीक्षा ग्रंथांचा अंतर्भाव होतो. या शिवाय त्यांनी मराठी कविता- १९२०-१९५० (१९५०), हरिभाऊंच्या कादंबरीतील व्यक्ती (१९६२), मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३), मराठी समीक्षा (१९७२), काव्यातील दुर्बोधता (१९६६), एका पिढीचे आत्मकथन (१९७५) इत्यादी ग्रंथांचेही संपादन केलेले आहे. त्यांच्या समीक्षा लेखनाने मराठी समीक्षेला जसे विविध आयाम दिले,त्याबरोबरच मराठी समीक्षेला नवी दृष्टी प्रदान केली.

वा. ल. कुलकर्णी यांनी अर्वाचीन साहित्यबरोबरच प्राचीन साहित्यावरही समीक्षा लेखन केलेले आहे. त्यांचे समीक्षा लेखन ललित साहित्यावर असले तरी कोणत्याही साहित्यकृतीला कलाकृती म्हणून तिची स्वत:ची एक प्रकृती, तिचे स्वत:चे एक रूप असते. त्या रूपाचाही त्यांनी विचार केला. म्हणजेच आशयाबरोबरच आकृतिबंधाचाही त्यांनी विचार केला.त्यांच्या लेखनातून कलावादी दृष्टी प्रकटते. या सोबतच मराठी समीक्षेची स्वतंत्र भाषाही त्यांनी घडवली. आशय, अभिव्यक्ती, आकृतिबंध, सेंद्रियत्व, एकात्मता, अनन्यसाधारणत्व, चैतन्यपूर्णता, नाट्यात्मकता, काव्यात्मकता, भावानुभव, नाट्यानुभव, भावसत्यता, प्रतिमा, इंद्रियगोचरता या संज्ञांची वा.लं.मुळे काही प्रमाणात रुजुवात झाली. त्यांनी एका लेखकाचा अभ्यास करताना साहित्यकृतीच्या अंत:स्वरूपाचा शोध घेतला, त्याद्वारे लेखकाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व सुसंगतपणे मांडले. त्यांच्या या मांडणीमध्ये ऐतिहासिक दृष्टीचाही प्रत्यय येतो.

साहित्य समीक्षेतील आधुनिक दृष्टीबरोबर वा. लं.नी शैक्षणिक क्षेत्रात काही नवे प्रयोग राबविले. एम. ए. च्या वर्गाकरिता त्यांनी ट्युटोरिअल, निबंध लेखनाची पद्धती आणली. अध्यापनासाठी काढलेली टिपणे ते अध्यापनानंतर तात्काळ फाडून टाकत. यामुळे त्यांचा ज्ञानयज्ञ अखंडपणे चालत असे. समीक्षक सुधीर रसाळ, गो. मा. पवार, सरोजिनी वैद्य, विजया राज्याध्यक्ष इ. त्यांचे पीएच.डी. चे संशोधक विद्यार्थी होत. वा. लं.च्या कार्यकर्तृत्वामुळे अमेरिकन सरकारने तेथील वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते (१९६५). ते औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या ३९ व्या अ. भा. म. सा. संमेलनात समीक्षा विभागाचे अध्यक्ष (१९५७) होते, तर मालवण साहित्य संमेलनात कथा-विभागाचे अध्यक्ष होते (१९५८). तसेच त्यांनी सातारा येथे संपन्न झालेल्या ४६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले (१९६५).

संदर्भ :

• सूर्यवंशी, नानासाहेब, अक्षर वाङ्मय- वा. ल. कुलकर्णी विशेषांक, जानेवारी-फेब्रुवारी-मार्च, २०१२.