दशाश्रुतस्कंधसूत्रम् : जैन धर्मातील आचार विषद करणारा ग्रंथ. दशाश्रुतस्कंधसूत्रम्ला दसा,आयारदसा किंवा दसासुय असे म्हटले जाते. छेदसूत्रातील हे एक सूत्र आहे. या सूत्राचे कर्ता श्रुतकेवली भद्रबाहू मानले जातात. दशाश्रुतस्कंधसूत्रम्ची दहा प्रकरणे आहेत. त्यातील आठव्या व दहाव्या प्रकरणांना अध्ययन म्हणतात तर बाकीच्या प्रकरणांना दसा/दशा म्हणतात.दशाश्रुतस्कंधसूत्रम्चे १८३० श्लोक उपलब्ध आहेत. २१६ गद्यसूत्रे व ५२पद्यसूत्रे आहेत.
पहिल्या प्रकरणात असमाधीच्या वीस प्रकारांचे वर्णन आले आहे. उदा. अशांत मनाने घाईघाईने चालणे, रात्री प्रमार्जन न करता जाणे, प्रमार्जन केलेली जागा सोडून इतर जागेचा उपयोग करणे (यामुळे जीवांची हिंसा होते),आवश्यकतेपेक्षा जास्त अंथरुण, पांघरुण जवळ बाळगणे, वृद्धांचा,ज्येष्ठांचा अपमान करणे, रागावणे, मनाला लागेल असे कठोर बोलणे, पाठीमागे एखाद्याची निंदा करणे, भांडण करणे, जुने उकरून काढणे, अवेळी स्वाध्याय करणे, अति बोलणे, संघात भांडणे लावणे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सतत खाणे, वगैरे प्रकारांचे वर्णन आहे.
दुसऱ्या प्रकरणात अतिशय प्रबल,अतिशय घातकी अशा एकवीस दोषांचे वर्णन आहे. त्यांना सबल/सबळ स्थाने म्हटले आहे. या दोषांमुळे चारित्र्यहानी होते. ती सबल स्थाने अशी आहेत – हस्तमैथुन, स्त्री-स्पर्श, रात्री भिक्षा आणणे व भोजन करणे, आधाकर्म (अधःकर्म), औद्देशिक आहार घेणे, विकतचे अन्न घेणे, राजाच्या घरचे जेवण घेणे, उधार घेणे, दुर्बलाकडचे अन्न हिसकावून घेणे, पुन्हा पुन्हा प्रत्याख्यान करून आहार घेणे, सहा महिन्याच्या आत एका गणातून दुसऱ्या गणात जाणे, एका महिन्यात तीनपेक्षा जास्त वेळा नदी ओलांडून जाणे (जलस्पर्श),जाणून बुजून हिंसा करणे, जीवजंतूने भरलेल्या स्थानावर बसणे किंवा निजणे, सचित्त हिरव्या वनस्पती खाणे वगैरे दोषांचे वर्णन आहे.
तिसऱ्या प्रकरणात तेहतीस प्रकारच्या आशातनांचे म्हणजे अपमानास्पद वागणूकीचे वर्णन आहे. उदा. शैक्षाने (नुकतीच दीक्षा घेतलेला शिष्य) ज्येष्ठ साधू वगैरेंच्या पुढेपुढे चालणे किंवा त्यांच्या बरोबरीने चालणे, त्यांच्या अगदी जवळ किंवा पुढे उभे राहाणे किंवा बसणे, साधुंकडे कोणी आले तर ते बोलायच्या आधीच आपण बोलणे, साधुने विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे, त्यांना उत्तर न देणे, खाण्यापिण्याच्या वस्तू ज्येष्ठ साधुंना दाखवण्याच्या आधीच शिष्यांना दाखवणे, न विचारता इतरांना देणे, साधुंबरोबर आपल्याला हवे तसे स्वादिष्ट भोजन करणे, त्यांना अरेतुरे करणे, कथा सांगत असताना त्यात चुका काढणे, पाय वगैरे लागला तर क्षमा न मागता उद्धटासारखे निघून जाणे अशाप्रकारच्या अशातनांचे स्पष्टीकरण आहे.
चौथ्या प्रकरणात आठ प्रकारच्या गणिसंपदांचे सविस्तर वर्णन आहे. त्या अशा – आचारसंपदा, श्रुतसंपदा, शरीरसंपदा, वचनसंपदा, वाचनसंपदा, मतिसंपदा, प्रयोगमतिसंपदा, संग्रहपरिज्ञानसंपदा. या प्रत्येकाचे ४-४ प्रकार सांगितले आहेत. गुरूंनी शिष्यांशी कसे वागावे, शिष्याने गुरूंशी कसे वागावे या प्रकारांचे वर्णन आहे. अशाप्रकारे ३२ प्रकारची विनय प्रतिपत्ति सांगितली आहे.
पाचव्या प्रकरणात दहाप्रकारच्या चित्तसमाधी सांगितल्या आहेत. धर्मभावना, स्वप्नदर्शन, जातिस्मरणज्ञान, देवदर्शन, अवधिज्ञान, अवधिदर्शन, मनःपर्ययज्ञान, केवलज्ञान, केवलमरण (निर्वाण) या दहा स्थानांचे वर्णन आहे. सहाव्या प्रकरणात अकरा प्रकारच्या श्रावक किंवा उपासक प्रतिमांचे वर्णन आहे. त्या अशा दर्शनप्रतिमा, व्रतप्रतिमा, सामायिकप्रतिमा, प्रोषधप्रतिमा, कायोत्सर्गप्रतिमा, ब्रह्मचर्यप्रतिमा, सचित्तपरित्यागप्रतिमा, आरंभत्यागप्रतिमा, प्रेष्टात्याग (अनुमतित्याग)प्रतिमा, उद्दिष्टभक्तत्यागप्रतिमा, श्रमणभूतप्रतिमा. सातव्या प्रकरणात बारा भिक्षू प्रतिमांचे स्पष्टीकरण आहे. त्या अशा – मासिकी, द्विमासिकी, त्रिमासिकी, चातुर्मासिकी, पंचमासिकी, षण्मासिकी, सप्तमासिकी, प्रथमासप्तरात्रिदिवा, अहोरात्रिकी, एकरात्रिकी भिक्षुप्रतिमा.
आठव्या प्रकरणाला पर्युषण-कल्पसूत्र असे म्हणतात. यात पर्युषण कल्पाचे वर्णन आहे. पर्युषण म्हणजे पावसाळ्याचे चार महिने एकाच ठिकाणी राहाणे. पर्युषणाला पज्जोसवणा, पज्जुसवणा, वासावास वगैरे पर्यायवाची शब्द आहेत. पर्युषणकालाच्या आधारे कालगणना करून दीक्षा-पर्यायाची ज्येष्ठता व कनिष्ठता मोजली जाते. ह्या सूत्राचे पर्युषण पर्वात वाचन केले जाते. याच्या प्रथम भागात महावीरांचे च्यवन (गर्भ कल्याणक दिवस), जन्म, संहरण, दीक्षा, केवलज्ञान व मोक्षप्राप्ती ह्या पंचकल्याणकांचे सविस्तर वर्णन आहे. यावर अनेक आचार्यांनी टीका लिहिली आहे. याच्या दुसऱ्या भागात स्थविरावलीमधील गण, गच्छा,शाखा व कुलांची माहिती आहे. ही स्थविरावली नंदीसूत्रातील स्थाविरावलीपेक्षा वेगळी आहे. याच्या तिसऱ्या भागात सामाचारीमधील साधूंच्या नियमांचे विवेचन आहे.
नवव्या प्रकरणात तीस महामोहनीय कर्मबंधांचे विवेचन आहे. उदा. त्रस जीवांना पाण्यात बुडवून मारणे, गुप्तपणे अनाचार करणे, खोटा आळ घेणे, बालब्रह्मचारी नसताना स्वतःला बालब्रह्मचारी म्हणणे, केवलज्ञानींची निंदा करणे, जादुटोणा करणे वगैरे. दहाव्या प्रकरणात नऊ वेगवेगळ्या निदानांचे विवरण आहे. याचे नाव आयतिस्थान असे आहे. निदान म्हणजे मोहाच्या प्रभावाखाली इच्छापूर्ति मूलक संकल्प करणे. उदा. साधुला वाटते की स्त्री जन्म किती चांगला, मला स्त्री जन्म मिळू दे. साध्वींना वाटते की पुरुष जन्म किती चांगला मला पुरुष जन्म मिळू दे. ज्यामुळे जन्म मरणाचा लाभ होतो त्याला आयती म्हणतात.
दशाश्रुतस्कंधसूत्रम्वर श्रुतकेवली भद्रबाहुंची निर्युक्ती आहे. छेदसूत्रकर्ता भद्रबाहू व निर्युक्तीकर्ता भद्रबाहू वेगवेगळे आहेत कारण त्यांचा काळ वेगवेगळा आहे. यावर चूर्णि व ब्रह्मर्षि पार्श्वचंद्री यांची वृत्ति आहे.
संदर्भ : चौधरी, गुलाबचन्द्र, जैन साहित्या का बृहद् इतिहास, भाग २, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९६६.
समीक्षक : कमलकुमार जैन