मेहता, उषा : (२५ मार्च १९२०–११ ऑगस्ट २०००). छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील सुरतजवळील सारस या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी साबरमती आश्रमात त्यांनी पहिल्यांदा गांधीजींचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या गावानजीक गांधीजींनी घेतलेल्या शिबिरात त्या सहभागी झाल्याने महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्याचा व खादीची वस्त्रे परिधान करण्याचा संकल्प केला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सायमन कमिशनच्या विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला (१९२८).
त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडा, भडोच येथे झाले. चांदरामजी हायस्कूल, मुंबई येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९३५ मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उषा मेहतांचे वडील सरकारी सेवेत न्यायाधीश असल्याने ते त्यांना स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्यास प्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊ शकत नव्हते. पुढे वडिलांच्या निवृत्तीनंतर (१९३०) त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले (१९३२) व त्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. स्वातंत्र्यचळवळीतील इतर मुलामुलींसोबत त्या गुप्तपत्रके वाटत व इतर कार्यांतही भाग घेत. १९३९ साली त्यांनी तत्त्वज्ञान विषयात प्रथमश्रेणीत पदवी प्राप्त केली. पुढे कायदेविषयक पदवीकरीता प्रवेश घेतला, तथापि १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांचे शिक्षण थांबले. गांधीवादी जीवनशैलीचे अनुकरण करून त्यांनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले.
दुसऱ्या महायुद्धापासून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरायने परस्पर भारताला युद्धात खेचल्याच्या निषेधार्थ सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध संताप व्यक्त होत होता. महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यातच १९४० मध्ये मुस्लीम लीगने लाहोर येथील आपल्या अधिवेशनात द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देशाच्या फाळणीची मागणी केली. यावेळी जागतिक युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली होती. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी हिंदी जनतेचे युद्धात सहकार्य मिळविण्यासाठी हिंदुस्थानला भरीव राजकीय सुधारणा देण्याबाबत आग्रह धरला होता. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. क्रिप्स योजनेमुळे देशातील कोणत्याही प्रांताला किंवा देशी संस्थानिकाला फुटून निघण्याचा अधिकार मिळणार असल्याने देशाचे विघटन होण्याचे संकट उभे राहिले. यामुळे भारताच्या अखंडतेला धोका निर्माण होणार असल्याने गांधीजींनी ही योजना फेटाळली व ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी केली. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ मध्ये मुंबईस भरलेल्या काँग्रेस समितीसमोर स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू झाले.
९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधी व इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ज्या स्वातंत्र्यसेनानींनी तिरंगा फडकाविला त्यांत उषा मेहता आघाडीवर होत्या. १४ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे उषा मेहतांनी बाबुभाई खक्कर, विठ्ठलदास जव्हेरी व शिकागो रेडिओचे संचालक नानक मोटवानी यांच्या सहयोगाने स्वतंत्र भारताचे गुप्त काँग्रेस नभोवाणी केंद्र (काँग्रेस रेडिओ स्टेशन) सुरू केले. यासाठी त्यांना अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकमदास, सुचेता कृपलानी, राम मनोहर लोहिया यांचे सहकार्य मिळाले. या नभोवाणी केंद्रावरून त्या स्वातंत्र्यचळवळीविषयक महत्त्वाच्या बातम्या व इतर माहितीचे निवेदन करत असत. गांधीजी व इतर नेत्यांचे संदेश या केंद्रावरून प्रसारित केले जात. अत्यंत धाडसाने त्यांनी या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून स्वातंत्र्यआंदोलनात योगदान दिले. ब्रिटिश पोलिसांना या केंद्राच्या इमारतीची माहिती मिळाली आणि १२ नोव्हेंबर १९४२ रोजी इमारतीला घेराव घालून उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी सहा महिने त्यांची कसून चौकशी केली. त्या एकमेव महिला कैदी होत्या. या काळात त्यांना एकांतवासाच्या कैदेत ठेवण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली (१९४२) व त्यांना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली (१९४६). सुटका करण्यात आलेल्या त्या पहिल्या राजकीय कैदी होत्या. मात्र तुरुंगवासात झालेल्या प्रकृतिअस्वास्थ्याचा त्रास त्यांना आयुष्यभर सोसावा लागला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांनी ‘महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक विचार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात नुकत्याच सुरू झालेल्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात त्या अधिव्याख्याता, प्राध्यापक, विभागप्रमुख या पदांवर काम करून सेवानिवृत्त झाल्या (१९८०). या दरम्यान आणीबाणीनंतर राजकारणात येण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहणे पसंत केले. अध्यापनाबरोबरच व्याख्याने, संशोधन, कार्यशाळा व परिषदा यांमधूनही त्या सक्रिय राहिल्या. नगरपालिका, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग येथील विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय लोकसेवा आयोग व गुजरात राज्याच्या कार्यालयीन सुधारणा आयोगाच्याही त्या सदस्य होत्या. विमेन अँड मेन व्होटर्स द 1977-80 इक्सपेरिमंट (१९८१), गांधीज कॉन्ट्रिब्यूशन टू द इमॅन्स्पिेशन ऑफ विमेन (१९९१), महात्मा गांधी अँड ह्यूमनिझम (२०००) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ.
गांधी स्मारक निधीसमितीवर अध्यक्ष, गांधीजींचे वास्तव्य राहिलेल्या मुंबईतील मणिभवन या वास्तूत गांधी जीवनदर्शन संग्रहालयाची उभारणी, नवी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशनच्या सदस्या आदी जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई; मुंबई विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवीने गौरविले. भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Rajput, Pam; Thakkar, Usha & Srinivasan, Rajan, Pushpanjali : Essays on Gandhian Themes, Delhi,1999.
- Tara, Chanda, History of the Freedom Movement in India, Vol.4, Calcutta, 1972.
समीक्षक : अरुण भोसले