चौधरी, सरलादेवी : (९ सप्टेंबर १८७२ — १८ ऑगस्ट १९४५). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी नेत्या. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे झाला. वडील जानकीनाथ घोषाल हे बंगाल काँग्रेसचे माजी सरचिटणीस व ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. आई स्वर्णकुमारी देवी ह्या रवींद्रनाथ टागोर यांची थोरली बहीण तसेच पहिल्या बंगाली साहित्यिक व कादंबरीकार होत्या. सरलादेवींनी १८८६ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली.  १८९० मध्ये त्यांनी बेथून महाविद्यालयात प्रवेश घेतला व कलकत्ता विद्यापीठाची इंग्रजी विषयातून बी.एड्. ची पदवी पद्मावती सुवर्णपदकासह प्राप्त केली. त्यांना फार्सी, फ्रेंच, इंग्रजी, उर्दू व संस्कृत इत्यादी भाषा अवगत होत्या.

सरलादेवी यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हैसूरच्या महाराणी गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी स्वीकारली, मात्र या ठिकाणी  त्या फार काळ राहिल्या नाहीत. त्या कोलकात्याला परत आल्या व रवींद्रनाथ टागोर यांच्या विनंतीनुसार भारती या मासिकाचे संपादक म्हणून काम करू लागल्या (१८९५). या काळात त्यांनी विविध लघुकथा, कादंबर्‍या, कविता, लेख आणि निबंधांचे लेखन केले. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी बंगाली तरुणांना प्रेरणा दिली तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रोत्साहित केले.

सरलादेवी आपले काका सत्येंद्रनाथ टागोर यांच्यासमवेत काही काळ मुंबई व पश्चिम महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास होत्या. तेव्हा त्या गणपती उत्सव व छ. शिवाजी महाराज जयंती उत्सवाने प्रेरित झाल्या. तरुणांना शारीरिक, मानसिक, नैतिक व आध्यात्मिक स्तरावर सक्षम बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. बंगालमध्ये त्यांनी प्रतापदित्य, उदयदित्य व बिरास्टमी इत्यादी उपक्रम सुरू केले (१९०३). तरुणांसाठी अनेक आखाडे (व्यायामशाळा) किंवा क्लब तयार केले. स्वसंरक्षण व बचावात्मक कृती शिकवण्यासाठी उस्ताद मुर्तजा यांची नेमणूक केली. त्यांच्या या उपक्रमाला संपूर्ण बंगालमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली. दुर्गापूजनाच्या दुसर्‍या दिवशी बिरास्टमी उत्सव (हिरोंचा उत्सव) सुरू केला. यामध्ये वीर पुरुषांच्या कवितांचा जयजयकार करण्यात येत असे. १९०४ मध्ये त्यांनी स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी ‘लक्ष्मी भंडार’ ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी उत्तम सुती वस्त्रांचे प्रदर्शन सुरू केले.

सरलादेवी यांना संगीतामध्ये विशेष रुची होती. संगीताच्या माध्यमातून आपण राष्ट्रजागृती करू अशी त्यांची भावना होती. रवींद्रनाथ टागोर यांनी बंकिमचंद्र चतर्जी यांचे ‘वंदे मातरम’ हे गीत कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात (१८९६) प्रथम गायिले होते. पुढे सरलादेवी यांनी काँग्रेसच्या बनारस येथील अधिवेशनात (१९०५) ब्रिटिश सरकारने बंदी घातलेली असतानाही आपल्या मंजूळ आवाजात हे गीत गायिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रीय गीत म्हणून ते फारच लोकप्रिय झाले.

सरलादेवी रामभूज दत्त चौधरी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या (१९०५). रामभूज हे वकील, पत्रकार, आर्य समाजाचे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते होते. विवाहानंतर त्या पंजाबमध्ये स्थलांतरित झाल्या (१९१०) आणि त्या राजकारणात सक्रिय झाल्या. या काळात त्यांनी लाहोर व बंगालमधील क्रांतिकारकांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य केले. त्यांचे पती प्रसिद्ध राष्ट्रवादी उर्दू साप्ताहिक वृत्तपत्र हिंदुस्थानचे संपादक होते. सरलादेवींनी या वृत्तपत्राची पुढे इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली. ब्रिटिश सरकारने जेव्हा रौलट अधिनियम पास केला (१९१९), तेव्हा देशभरात ब्रिटिश सरकारविरुद्ध तणाव निर्माण झाला. सरलादेवी आणि रामभूज या दोघांनीही त्यांच्या वर्तमानपत्रातून सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. पुढे पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडले (१३ एप्रिल १९१९), तेव्हा रामभूज यांना अटक करण्यात आली व वर्तमानपत्राची मालमत्ता जप्त करण्यात आली. ब्रिटिशांनी सरलादेवींच्या अटकेची योजना आखली होती; मात्र एका महिलेच्या अटकेमुळे राजकीय गुंतागुंत होऊ शकते म्हणून त्यांनी अटक टाळली.

प्रारंभीच्या काळात त्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झालेल्या होत्या. मेमनसिह जिल्ह्यात स्थापन झालेल्या सुहृद समिती या गुप्त क्रांतिकारी संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध होता. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बंगाली तरुणांना क्रांतिकारी विचारांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसप्रणीत मवाळवादी धोरण व राजकारणावर त्यांचा आक्षेप होता व त्याबद्दल त्यांनी आपल्या लिखाणातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती; तथापि म. गांधीजींच्या सत्य व हिंसेच्या तत्त्वज्ञानाने त्या प्रभावित झाल्या. म. गांधीजींच्या असहकार चळवळीला सरलादेवींनी पाठिंबा दिला. स्वदेशी चळवळीच्या प्रसारासाठी सक्रियपणे कार्य करू लागल्या.

आर्य समाजाच्या माध्यमातून सरलादेवींनी भारतातील विविध भागांत प्रचार दौरे केले. आर्य समाजाच्या महिला शाखांची स्थापना केली. महिलांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी सन १९१० मध्ये लाहोर येथे ‘भारत स्त्री महामंडळा’ची स्थापना केली (१९१०). भारतातील ही पहिली महिला संघटना होती. देशातील स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे, विविध वंश, वर्ग व पंथांतील महिलांना एकत्र करून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते. कोलकाता येथे त्यांनी मुलींच्यासाठी ‘भारत स्त्री शिक्षण सदन’ची स्थापना केली. पुढे लाहोर, अलाहाबाद, दिल्ली, कराची, अमृतसर, हैदराबाद, कानपूर, बांकुरा, हजारीबाग व मिदनापूर इत्यादी ठिकाणी याच्या शाखा उघडल्या. विवाहित स्त्रियांसाठी गृह-शिक्षणाची एक प्रणाली विकसित करणे व त्याच्या माध्यमातून त्यांना उत्तम वैद्यकीय ज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळविण्यास मदत करणे यासाठी त्या कार्यरत होत्या. महिलांना मताधिकार मिळण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

सरलादेवीनी बंगाली साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. भारतीसह विविध नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. तसेच असंख्य गाणी आणि लेख लिहिले. त्यांच्या काही महत्त्वाच्या प्रकाशनांमध्ये नबाबरशेर स्वप्न (न्यू यिअर ड्रिम्स), शिवरात्री पूजा, बनलीर पित्रधान आणि जिबणेर झार पत  (स्कॅटर्ड लीव्ह्स ऑफ माय लाइफ) यांचा समावेश आहे. शतगान (ए हंड्रेड साँग्स) हे त्यांचे गाण्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. पती रामभूज यांच्या निधनानंतर (१९२३) त्या बंगालमध्ये परतल्या व भारतीच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. पुढे काही काळ त्या आध्यात्मिक मार्गाकडे आकर्षित झाल्या.

कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Ray, Bharati, Early feminists of colonial India, New Delhi, 2002.
  • Ray, Sukhednu & Karlekar, Malvika, The Many Worlds of Sarala Devi, New Delhi, 2010.
  • माथुर, एल. पी. भारत की महिला स्वतंत्र सेनानी, जयपूर, २००३.

                                                                                                                                                                          समीक्षक : अरुण भोसले