चित्रपटदिग्दर्शक एक व्यापक विषय मांडण्यासाठी तीन चित्रपटांची मालिका तयार करतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ चित्रपट-दिग्दर्शक ⇨ सत्यजित रेकृत पथेर पांचाली (१९५५), अपराजितो (१९५६) आणि अपूर संसार (१९५९) ही विशेष ख्याती पावलेली ‘अपूʼ चित्रपटत्रयी. या तीन चित्रपटांत विसाव्या शतकाच्या आरंभापासून भारतीय खेड्यांतील जीवन कसे ढासळत गेले आणि एकूण भारतीय व्यक्तिमत्त्वात सामाजिक आणि मानसिक बदल कसे होत गेले, यांचे चित्रण ‘अपूʼ या व्यक्तिरेखेच्या जीवनगतीतून केले आहे. अपूचा जन्म आणि बालपण, अपूचे किशोरवय आणि शिक्षण आणि अपूचे स्वतंत्र व्यक्ती म्हणून साधारण वयाची  तिशी उलटेपर्यंतचे जीवन यांची कथा या तीन भागांत येते. पारंपरिक समाजातील नाती आणि रिवाज, त्यांवर येणारे आर्थिक ताण आणि या वातावरणात वाढलेला अपू नैतिक आणि भावनिक दृष्ट्या कसा घडतो, बदलतो आणि नव्या जीवनाला सामोरा जातो, याची तीन दीर्घ आवर्तने या चित्रपटत्रयीमधून प्रेक्षकांमोर येतात.

अपुत्रयी

पथेर पांचालीत अपूचे गाव सुटते, अपराजितोमध्ये तो पारंपरिक व्यवसायाला रामराम ठोकतो आणि अपूर संसारमध्ये तो आपल्या दुरावलेल्या मुलासमवेत नव्या नात्याची निर्मिती करायला प्रवृत्त होतो, असा कथनाचा केंद्रवर्ती धागा आहे. निश्चिन्दिपूर हे लहान खेडे, तेथील हरिहर राय हा साधा भिक्षुक. तो वडिलोपार्जित घर न सोडता संसार चालवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो; पण शेवटी गाव सोडून तो अधिक चांगली कमाई गंगेच्या घाटावर होईल म्हणून काशीला जातो (पथेर पांचाली). अपूच्या शिक्षणाची काळजी त्याला आणि त्याच्या पत्नीला – सर्वजयालाही – आहे. बनारसमध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर सर्वजया तेथे टिकाव धरण्याचा प्रयत्न करते; पण शेवटी लहान अपूला घेऊन बंगालमधील दुसऱ्या खेड्यात जवळच्या वडीलधाऱ्या नातलगाकडे अपू भिक्षुकी शिकेल म्हणून परत येते. अपू तेथील  इंग्रजी शाळेत जाण्यासाठी थोडी लाडीगोडी, थोडा हट्ट करतो आणि ती त्याला परवानगी देते. शाळेत उत्तम प्रगती करून अपू शिष्यवृत्ती मिळवतो. कलकत्त्याला (आताचे कोलकाता) महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाण्याचा हट्ट धरतो आणि जातो. पुढे सर्वजयाच्या मृत्यूनंतर अपू खेड्यातल्या भिक्षुकीकडे पाठ फिरवून कलकत्त्याला निघून जातो (अपराजितो). कलकत्त्यात त्याला शिक्षण अर्धवट सोडून पोटासाठी नोकरी शोधावी लागते, त्यातच त्याचे लग्न होते आणि नवा सुखाचा संसार सुरू होतो. त्याची पत्नी अपर्णा बाळंतपणात मरण पावते, अपू उद्ध्वस्त होतो, निरुद्देश भटकतो. सहा वर्षांनंतर आपल्या मुलाला भेटायला जातो आणि त्याला बरोबर घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात करतो (अपूर संसार).

सत्यजित रे यांची चित्रपटभाषेची नव-वास्तववादी मांडणी भारतात नवी होती. रचनेचे कलात्मक सौंदर्य मुख्यत: सूक्ष्म दृक्श्राव्य तपशिलांनी घडवले  होते. नित्याचे जनजीवन, त्यात विणलेले भावनिक कल्लोळ आणि मानवी नातेसंबंध यांत परिसर, देहबोली आणि शब्द यांसमवेत पार्श्वसंगीत नेमकेपणाने योजल्याने अपूत्रयी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरली. तसेच या निमित्ताने ध्वनी आणि दृश्य यांचा मिलाफ करणारी चित्रपटाची भाषा पडद्यावर आली.

या तिन्ही चित्रपटांची एक विशिष्ट लय आहे. प्रत्येक चित्रपटात एक सहा वर्षांचे अंतर उलटून कथा पुढे सरकते. जीवनसरणी, तिच्यावर आलेले ताण आणि बंध तुटणे असा क्रम पुन:पुन्हा दिसतो. पथेर पांचालीत शालेय वय येईपर्यंत गेलेला काळ चित्रपटाच्या सुरुवातीला ओलांडला जातो. अपराजितोमध्ये इंग्रजी शाळेत शालान्त परीक्षेपर्यंतचा काळ चित्रपटाच्या मध्यावर ओलांडला जातो  आणि अपूर संसारमध्ये अपूच्या मुलाच्या – काजलच्या – जन्मानंतरचा सहा वर्षांचा काळ चित्रपटाच्या शेवटच्या भागात ओलांडला जातो. असे हे ओलांडलेले कालखंड आहेत. भिक्षुकीच्या तुटपुंज्या मिळकतीत कसेबसे चाललेले पण सदाचाराचे धडे देणारे बालवय, इंग्रजी शिक्षणाने उघडलेले नवे जग पाहून त्यात ओढला गेलेला किशोरवयीन अपू आणि अपू उद्ध्वस्त व एकाकी आयुष्य कंठत असताना आजोबांकडे करड्या शिस्तीत वाढलेला काजल हे ओलांडलेले खंड त्या काळातले व्यक्तींवर झालेले परिणाम पुढे दाखवत जातात. पथेर पांचाली धिम्या गतीने सुरू होतो आणि ताण असह्य झाल्यावर जलद गतीने हरिहरला गावापासून दूर नेतो. अपराजितो आशेच्या उभारीत सुरू होतो, हरिहर आणि सर्वजया यांच्या मृत्यूचे धक्के खाऊन अधिक गतीने कलकत्त्याकडे खेचला जातो आणि अपूर संसार पुन्हा एकवार आशेच्या उभारीत जातो, खोल निराशेच्या दरीत कोसळतो आणि काजलशी  नाते जोडून पुन्हा नव्या आशेच्या उदयाकडे जायला सुरुवात करतो.

एकेक आशयसूत्र वेगवेगळ्या तीव्रतेने प्रसंगात गुंफले जाते. कथेच्या पार्श्वभूमीत पसरलेले इंग्रजी राज्य झिरपलेले दिसते ते रेल्वे, टपाल, तारायंत्रांचे खांब, आधुनिक शालेय व्यवस्था आणि कलकत्ता शहराचे वाढलेले औद्योगिक रूप. कौटुंबिक नाती आणि पारंपरिक व्यवस्था, अपूची केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आणि भोवतीची माणसे, शेजारी, समाज, नव्या व्यवस्थेतील नवी नाती या सर्वांचे चित्रण संवादी आणि विरोधी रचनांचे चलन निर्माण करते. व्यक्तिजीवनातील पेच आणि दबाव, नव्या पिढीचे नवे आकलन आणि त्याची घुसमट हे सर्व या त्रयीत विस्ताराने मांडले आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी भारतीय समाज ‘खेड्यापासून शहराकडेʼ कसा लोटला गेला, याचे दर्शन घडते. एक व्यापक प्रयोजन राखून व्यक्त झालेला चित्रपटकलेचा हा नमुना आहे. या चित्रपटांची निर्मिती करण्यापूर्वी हे प्रयोजन मनात धरून काम झाले नव्हते; परंतु एकाच वैचारिक संगतीने रचना झाल्याने ही त्रयी एकसंध जुळते.

समीक्षक – अनिल झणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा