दिग्दर्शक हाच ‘चित्रपटʼ या कलेतील ‘ओतरʼ (Auteur) म्हणजे खरा कलावंत आहे, असे  प्रतिपादन करणारा हा सिद्धांत. फ्रेंच Auteur हा शब्द इंग्रजी Author या शब्दाचा समानार्थी  शब्द आहे. सुरुवातीला नवखेपणाच्या काळात चित्रपटाला अभिजनवर्गात साहित्याची प्रतिष्ठा  प्राप्त करून देण्याच्या गरजेतून चित्रपटकलावंतांची तुलना लेखकाशी सुरू झाली. १९०८ साली  फ्रान्समध्ये ‘Film d’ Art’ ही कलात्मक चित्रपटाची चळवळ सुरू झाली. काही अंशी या चळवळीपासून प्रेरित होऊन जर्मनीत Autorenfilm (Author’s Film) असा शब्दप्रयोग केला जाऊ लागला.

फ्रेंच कादंबरीकार आणि पुढे चित्रपटकर्मी बनलेल्या अलेक्सांद्र अस्त्रुक (१९२३-२०१६) यांनी लेखकपणाच्या संकल्पनेला आणखी पुढे नेले. त्यांनी ‘कॅमेरा स्टाइलो’ (कॅमेरा पेन) या १९४८ साली प्रकाशित झालेल्या आपल्या लेखातून चित्रपट ही अभिव्यक्तीची भाषा आहे, असे प्रतिपादन केले. लेखक जसा निबंध अथवा कादंबरीतून अत्यंत गुंतागुंतीचा विचार अथवा कल्पना मांडू शकतो, त्याला एक संरचित रूप देऊ शकतो, तसेच चित्रपट या माध्यमातूनदेखील करता येणे शक्य आहे. दिग्दर्शक म्हणजे कोणीतरी लिहून ठेवलेल्या कादंबरी, नाटक अथवा संहितेचा गुलाम नव्हे, की त्याने फक्त आहे ते (जसेच्या तसे म्हणजे कोणालातरी अपेक्षित आहे तसे) पडद्यावर दृश्यरूपात मांडावे. लेखकासारखीच कल्पकता, सर्जनशीलता पणाला लावून दिग्दर्शक आपल्या माध्यमात कलात्मक उंची गाठू शकतो. त्यासाठी कॅमेरा हे लेखकाच्या पेनसारखेच त्याचे साधन आहे, असे अलेक्सांद्र अस्त्रुक यांचे विवेचन आहे.

फ्रेंच चित्रपटदिग्दर्शक आंद्रे बाझँ यांच्या Cahier du Cinema (१९५१) या नियतकालिकाने ही चर्चा पुढे नेली. चित्रपटातील दृश्यरचना (Mise-en-scene) हे दिग्दर्शकाचे कलाक्षेत्र आहे, तेथेच दिग्दर्शकाच्या स्वतंत्र प्रतिभेचा, कलात्मकतेचा प्रत्यय येतो, असे विचार बाझँ यांनी मांडले. बाझँ यांचे सर्वार्थाने वारसदार असलेल्या फ्रेंच चित्रपटदिग्दर्शक फ्रान्स्वां त्रुफो (१९३२-८४) यांनी ‘ए सर्टन टेन्डन्सी इन फ्रेंच सिनेमाʼ (१९५४) या आपल्या लेखातून आधीच्या अभिजात गणल्या गेलेल्या फ्रेंच चित्रपटांवर कडाडून टीका केली.

पूर्वी चित्रपटसंहिता हाच चित्रपटाचा मूलाधार मानला जाई. म्हणजेच पर्यायाने, संहितालेखक हाच चित्रपटाचा लेखक अथवा रचयिता असतो, असा दृढ समज होता. फ्रान्स्वा त्रुफो, ज्यॉं-लुक् गोदार्द, पीटर बोगदानोवीच, क्लॉद शाब्रोल, एरिक रोहमर या Cahier du Cinema या नियतकालिकाच्या तरुण समीक्षक फळीने या मतांचा ठाम प्रतिवाद केला. त्यांच्या मते, चित्रपटसंहिता हा चित्रपटाचा केवळ एक कच्चा आराखडा असतो. दृश्यभाषेतून त्याला अर्थपूर्णता लाभते. असलेल्या संहितेला जसेच्या तसे दृश्यरूप देण्यात निव्वळ कारागिरी असते. प्रतिभावान दिग्दर्शक आपल्या प्रतिभेने सर्वसाधारण संहितेलादेखील दृश्यार्थपूर्ण रचना बहाल करू शकतो. चित्रपट ही समूहकला आहे, हे कोणीही नाकारलेले नाही. परंतु पडद्यावरील दृश्यरूपासाठी दिग्दर्शकच जबाबदार असतो. कलादिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय, संकलन (अगदी पटकथा व संहितालेखनातदेखील) दिग्दर्शकाचा कलात्मक हस्तक्षेप असतो. त्याच्या या कलात्मक दृष्टीतूनच पडद्यावरील दृश्यविश्व साकारते. चित्रपट ही मूलतः कला आहे आणि दिग्दर्शक हाच त्याचा सर्वेसर्वा कलावंत म्हणजे ओतर असतो, असा जोरदार युक्तिवाद या मंडळींनी आपल्या विविध लेखनांतून केला. ही संकल्पना अधिक सुस्पष्ट व्हावी यासाठी त्यांनी चित्रपटाच्या दृश्यरूपावर कलात्मक अधिसत्ता असणारा दिग्दर्शक (Auteur-en-Scene) आणि  निर्मात्याने नेमलेला, व्यवसायशरण दिग्दर्शक (Metteur-en-Scene) यांतला नेमका फरक स्पष्ट केला. त्यावरूनच Auteur Film  आणि Metteur Film असे विलक्षण अर्थवाही शब्दप्रयोग रूढ झाले. इतकेच नव्हे, तर आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी ओतर चित्रपटदेखील बनविले. त्रुफो यांचा द फोर हंड्रेड ब्लोज (१९५९) हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण होय. या लेखनातून व अशा चित्रपटांतून जी चळवळ उभी राहिली, ती फ्रेंच नव लाट (फ्रेंच न्यू वेव्ह ) या नावाने ओळखली जाते. ही चळवळ १९५८ ते १९६४ या काळात फोफावली. ओतर संकल्पनेतूनच या चळवळीची सैद्धांतिक पायाभरणी झाली, असे म्हणता येईल.

चित्रपटविषयक चर्चेत दिग्दर्शकाला केंद्रस्थानी आणून ठेवणाऱ्या या विवेचनाला ओतर सिद्धांत असे म्हटले जाते. त्रुफो यांनी स्वतः याला सिद्धांत म्हणण्याऐवजी La Politique des Auteur  म्हणजे Author policy (रचयिता धोरण) असेच म्हटलेले आहे.

चित्रपटाची चर्चा सर्वसाधारणपणे कथानक, अभिनय अशा ढोबळ निकषांवर केली जात असे; परंतु ओतर संकल्पनेच्या निमित्ताने चित्रपटातील दृश्यरचनेच्या संदर्भात चर्चा होऊन चित्रपटविषयक समीक्षेला अधिक नेमकेपणा आला. चित्रपटाच्या भाषेकडे – या  कलामाध्यमाच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांकडे – लक्ष वेधले गेले. कलात्मक आणि व्यावसायिक (कारागिरीयुक्त) चित्रपट यांतील फरक या निमित्ताने ठळक झाला. चित्रपट म्हणजे जनसामान्यांचे मनोरंजनाचे थिल्लर माध्यम आहे (पर्यायाने ती अभिजात व अभिरुचिसंपन्न गोष्ट नाही, ती कलाच नव्हे) असा समज मोडून काढून चित्रपटाला कलेचा दर्जा देतानाच वाङ्मयप्रेमी, बुद्धिवादी व कलासक्त मध्यमवर्गात तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कामही या संकल्पनेने केले. हे ओतर संकल्पनेचे योगदान मोठेच आहे.

व्यावसायिकतेच्या बाहेर राहून काम करणारे बर्गमन, ब्रेसॉं, ओझू, मुरनॉ आदी यूरोपियन व जपानी दिग्दर्शकांना कलावंत म्हणून काही प्रतिष्ठा होती. परंतु न्यू वेव्ह चळवळीतल्या समीक्षकांनी व्यावसायिक हॉलिवुड स्टुडिओ व्यवस्थेअंतर्गत काम करणारे अॅल्फ्रेड हिचकॉक, हॉवर्ड हॉक्स, जॉन फोर्ड, ऑरसन वेल्स यांच्या कामातही त्यांच्यातील ओतरचे दर्शन कसे घडते, हे सविस्तरपणे सिद्ध केले. त्यांच्या सर्व कामांतून त्यांची विशिष्ट विषयक्षेत्रे, मानसिक गंड आणि शैलीवैशिष्ट्ये दिसून येतात, हे त्यांनी दाखवून दिले. व्यावसायिकतेच्या परिघातही ओतर चित्रपट असू शकतो, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. त्याचबरोबर यूरोपातील कलात्मकतेच्या नावाने व्यवसायविरोधी दृष्टिकोनाला आणि यूरोपियन अहंगंड बाळगताना असणाऱ्या अमेरिकनविरोधी दृष्टीला यातून आव्हान दिले.

पुढील काळात अमेरिकन चित्रपट-समीक्षक अँड्र्यू सारीस यांनी यूरोपातून ही ओतर संकल्पना आयात केली आणि नोट्स ऑन द ओतर थिअरी (१९६२) या लेखाद्वारे त्याला व्यापक सैद्धांतिक परिमाण दिले. त्यासाठी त्यांनी तीन निकषांवर भर दिला. त्यांनी एकात एक अशा तीन वर्तुळांची कल्पना केली. त्यांतले बाहेरचे वर्तुळ म्हणजे दिग्दर्शकाची तंत्रज्ञानात्मक क्षमता. यानुसार ओतर दिग्दर्शक प्रथमतः उत्तम तंत्रसंपन्न असतो वा असायला हवा. दुसरे मधले वर्तुळ म्हणजे स्वतंत्र व्यक्तिगत शैली. म्हणजेच दिग्दर्शकाची स्वतंत्र, इतरांपेक्षा वेगळी शैली असते. तिसरे, सर्वांत आतले गाभ्याचे वर्तुळ म्हणजे अंतर्गत अर्थ. स्वतंत्र अशा अर्थाचा प्रत्यय त्याच्या सर्व कलाकृतींतून यायला हवा. येथेच दिग्दर्शकाचे खरे लेखकत्व – ओतरपण – दडलेले असते, असे सारीस यांचे मत आहे.

प्रख्यात अमेरिकन समीक्षक पॉलिन केल यांनी Circles and Squares (१९६३) या लेखातून सारीस यांच्या मुद्द्यांवर कडाडून हल्ला चढवला. पुढील काळात डेव्हिड बोर्डवेल, क्रिस्तीन थॉम्पसन, स्टेगर, तिमोथी कॉरीगन आदी सिद्धांतनकारांनी तसेच मार्क्सवादी आणि स्त्रीवादी समीक्षकांनीदेखील ओतर संकल्पनेवर अनेक व्यावहारिक, तार्किक व तात्त्विक आक्षेप घेतले. तरीही ऐतिहासिक संदर्भात ओतर सिद्धांताचे महत्त्व व योगदान अमान्य करता येणार नाही.

समीक्षक – निखिलेश चित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा