चित्रपटाचे आणि चित्रपटमाध्यमाचे मनोरंजन, कलात्मक सौंदर्यशास्त्र, सामाजिक व सांस्कृतिक पैलू, चित्रपटतंत्रे व आशयविषयक घटक यांच्या कसोट्यांवर केलेले विश्लेषण व मूल्यमापन, तसेच चित्रपटातील विविध घटकांची – उदा., विविध पात्रे, त्यांचे अभिनय, संवादविशेष, प्रसंगरचना इत्यादींची – चिकित्सा करून त्यांचे गुणदोष स्पष्ट करणे या अर्थाने चित्रपटसमीक्षा ही संज्ञा वापरली जाते. चित्रपटसमीक्षेचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. १. वृत्तपत्रीय चित्रपटसमीक्षा (वृत्तपत्रे, नियतकालिके आणि लोकप्रिय समाजमाध्यमे यांत प्रामुख्याने प्रकाशित होणारी समीक्षा). २. अकादमिक समीक्षा – चित्रपटविषयाचे सैद्धान्तिक अभ्यासक, चित्रपटमाध्यमाचे विद्यार्थी व संशोधक यांनी केलेली सखोल समीक्षा. ३. आंतरजालावर (महाजाल) ब्लॉग्ज, संकेतस्थळे (वेबसाइट्स), ई-नियतकालिके यांतून प्रकाशित होणारी समीक्षा.
वृत्तपत्रीय चित्रपटसमीक्षा :
वृत्तपत्रे, नियतकालिके किंवा प्रसारमाध्यमे यांचे चित्रपटसमीक्षक मुख्यतः नव्या चित्रपटांबद्दलची परीक्षणे प्रसृत करीत असतात. त्यांतून मुख्यतः नवीन चित्रपटाचे थोडक्यात कथानक व तदानुषंगिक माहिती दिलेली असते, ज्यायोगे वाचक या नव्या चित्रपटांकडे आकर्षित होतील. काही समीक्षक जुन्या ‘अभिजातʼ चित्रपटांबद्दल व काही गाजलेल्या जुन्या चित्रपटांबद्दल समीक्षालेखनही करतात. दिलेल्या शब्दमर्यादेत (सु. ५०० ते १००० शब्द) चित्रपटाचा आशय आणि चित्रपटतंत्र यांबाबतची त्यांची व्यक्तिगत मते त्यात व्यक्त झालेली असतात. वृत्तपत्रीय समीक्षेत साधारणपणे चालू चित्रपटांवरील तात्काळ आणि थोडक्यात प्रतिक्रियात्मक मते असतात, तर काही वेळा ती विस्तारानेही मांडलेली असतात. यामुळे चित्रपटासंदर्भात वाचकाला नवी परिदृष्टी प्राप्त होते. चित्रपटातील विविध घटक, चित्रपटतंत्रे आणि कथनासाठीचा रूपबंध यांचा वापर चित्रपटात कसा केला आहे, याविषयीचे विश्लेषण त्यात केलेले असते. त्यातून वाचकांचे चित्रपटविषयक स्वतःचे मत तयार होते. स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रे तसेच नियतकालिके यांमधून चित्रपटविषयक असे स्तंभ नियमित प्रसिद्ध होत असतात. उदा., साइट अँड साउंड, सिनिस्ते, फिल्म इन रिव्ह्यू इत्यादी.
चित्रपटनिर्मितीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी तसेच चित्रपटविषयक संघटना चालविणाऱ्या धुरिणांनीही चित्रपटसमीक्षा केली आहे. चिदानंद दासगुप्ता, सत्यजित रे, के. हरिहरन ही भारतीय चित्रपटसृष्टीतील काही उदाहरणे होत. याचे समांतर उदाहरण म्हणजे फ्रान्समध्ये काहिए-द्यू सिनेमा या चित्रपटविषयक नियतकालिकात लेखन करणारे ज्यां ल्यूक गोदार्द, फ्रान्स्वा त्रुफोंत. यांनी पुढे प्रत्यक्ष चित्रपटनिर्मिती केली. याच नियतकालिकात लेखन केलेले आन्द्रे ब्रेझॉं हे महत्त्वाचे चित्रपटसमीक्षक मानले जातात. जागतिक पातळीवरील काही उल्लेखनीय वृत्तपत्रीय समीक्षकांमध्ये रॉजर एबर्ट (शिकागो सन-टाइम्स), जेम्स एगी (टाइम मॅगॅझिन, द नेशन), मार्क केर्मोड (बीबीसी, द ऑब्झर्व्हर), जेम्स बेरार्डिनेली, फिलिप फ्रेंच (द ऑब्झर्व्हर), पॉलिन केल (द न्यूयॉर्कर), जोनाथन रोझेनबॉम (शिकागो रीडर) यांचा अंतर्भाव होतो. ऑनलाइन फिल्म क्रिटिक्स सोसायटी ही आंतरजालावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर भाष्य करणाऱ्या समीक्षकांची आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटना आहे. जगभरातील समीक्षालेखक त्या संघटनेचे सदस्य आहेत. भारतीय पातळीवर अमिता मलिक, खालिद मोहमद, निखत काझमी, अशोक राणे, रेखा देशपांडे, बी. के. करंजिया, भावना सोमाया, दीपा गेहलोत यांनी वृत्तपत्रांतून मोलाचे चित्रपटविषयक लेखन केले आहे.
अकादमिक समीक्षा :
सखोल चित्रपटअभ्यास, संशोधन-सिद्धांतन यांच्या पायावर आधारित समीक्षा. ही समीक्षा वृत्तपत्रीय चित्रपटसमीक्षेपलीकडे जाऊन अधिक गांभीर्याने आणि सखोलपणे केलेली असते. चित्रपटविषयक मासिके, नियतकालिके, शोधनिबंध आणि पुस्तके यांतील समीक्षालेखन या प्रकारात मोडते. चित्रपटाचे सामाजिक, राजकीय परिणाम आणि त्याचे अर्थ, चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने चित्रपटाची संहिता, दिग्दर्शन, छायाचित्रण, ध्वनिनियोजन, संपादन, कथानकातील पात्रांच्या विकासाचे टप्पे आदी तांत्रिक घटकांबद्दलचे आणि इतरही पैलूंबाबतचे विश्लेषण आणि मूल्यमापन या समीक्षेत केलेले आढळते. या प्रकारची समीक्षा लोकप्रिय माध्यमांतून प्रकाशित होत नाही, तर अकादमिक नियतकालिकांमधून आणि विद्यापीठीय प्रकाशनांमधून प्रसिद्ध होत असते. तसेच चित्रपटविषयक नियतकालिकांशिवाय इतिहास, स्त्री-अभ्यास, साहित्य, समाजशास्त्र अशा अनेक विद्याशाखांच्या नियतकालिकांमध्येही चित्रपटांविषयी चिकित्सक समीक्षा त्यात्या विद्याशाखेच्या संदर्भातही प्रकाशित केली जाते. चित्रपट म्हणजे काळ आणि अवकाशाच्या संदर्भातील ऐतिहासिक दस्तऐवज होय. चित्रपट आणि कलात्मक अभिव्यक्ती, आशय आणि माध्यमाचा कलात्मक वापर अशा अनेक संदर्भांत या प्रकारच्या समीक्षेत विचार केलेला आढळतो.
आंतरजालावर प्रकाशित होणारी समीक्षा :
नव्या सहस्रकात मात्र छापील परीक्षणांच्या परिणामांबद्दल साशंकता निर्माण झाल्याचे चित्र दिसते. कारण एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात पारंपरिक जाहिरातींऐवजी भरपूर भांडवली साहाय्य लाभलेल्या सामाजिक माध्यमांतून चित्रपटांचे विपणन आणि प्रचार होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गंभीरपणे मूल्यमापन करणाऱ्या समीक्षकांची मते प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रमाण क्षीण झाले आहे. छापील माध्यमातील प्रकाशनांची वाचकसंख्या कमी झालेली असणे, हेही एक कारण मानले जाते. चित्रपटाच्या विविध घटकांबाबत चिकित्सा करून त्याचे गुणदोष स्पष्ट करणे हे चित्रपटसमीक्षेचे मुख्य कार्य असते; तथापि एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील चित्रपटविषयक चर्चांमध्ये बहुतेक वेळा चित्रपटाच्या कलात्मक मूल्यमापनाऐवजी चित्रपटास आलेला भांडवली खर्च आणि त्याने मिळवलेले विक्रमी अथवा कमी उत्पन्न यांचीच चर्चा केलेली आढळते. आंतरजालावरील ब्लॉगलेखनाच्या सोयीमुळे अनेक हौशी चित्रपटसमीक्षक विशिष्ट रूपबंधातले चित्रपट, दिग्दर्शक किंवा अभिनेते यांच्यावर लेखनही करतात. आंतरजालावरील काही संकेतस्थळांवर चित्रपटप्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया नोंदवितात. उदा., बॉक्स ऑफिस प्रॉफेट्स, रॉट्न टोमॅटोज, बॉक्स ऑफिस गुरू इत्यादी. प्रतिसादींच्या एकूण दर-निर्धारणावरून चित्रपटाचे तारांकित मूल्यांकन केले जाते. आंतरजालावर प्रकाशित होणाऱ्या लेखनात सखोल, गंभीर व अभ्यासपूर्ण लेखनही प्रकाशित होत असते. छापील माध्यमांतून लेखन करणारे ज्येष्ठ व अभ्यासू समीक्षक काही वैशिष्ट्यपूर्ण ई-नियतकालिकांमधून नियमितपणे स्तंभलेखन करीत असतात. आंतरजालाशी सरावलेल्या पिढीसाठी असे लेखन चित्रपटमाध्यमाविषयी आंतरदृष्टी देणारे असते.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागांतर्गत असलेल्या चित्रपट-उत्सव संचालनालयाद्वारे १९८४ पासून दरवर्षी उत्कृष्ट समीक्षकाला राष्ट्रीय चित्रपट-समीक्षक पुरस्कार देण्यात येतो. यात पुरस्कारासोबत सुवर्णकमळ दिले जाते.
समीक्षक – अभिजित देशपांडे
Khup Chan Mahiti… Thank you