हा चित्रपट चित्रित करण्यासाठी वापरात येणाऱ्या एका विशिष्ट चित्रफीतीचा (फिल्मचा) प्रकार आहे. चित्रपट चित्रफीतीवर (म्हणजेच फिल्म रिळावर) चित्रित केला जातो, त्या चित्रफीतीचा आयमॅक्स हा एक सुधारीत प्रकार म्हणता येईल. या प्रकारच्या चित्रफीतीत जास्तीत जास्त आकाराच्या प्रतिमा सामावून घेण्याची विशेष क्षमता असते. यामुळे प्रतिमेचे जास्तीत जास्त स्वभावविशेष मुद्रित केले जातात. एरवी वापरण्यात येणाऱ्या चित्रफीतीच्या मानाने आयमॅक्सची मुद्रण व ग्रहणक्षमता कैकपटीने जास्त असते. अर्थातच यासाठीचा कॅमेराही वेगळ्या क्षमतांचा व वैशिष्ट्यांचा असावा लागतो. आयमॅक्सवर चित्रित केलेला चित्रपट दाखवण्याकरता वेगळे चित्र-प्रक्षेपक (प्रोजेक्टर), विशिष्ट प्रकारचे अतिभव्य चित्रपट पडदे आणि या सगळ्यासाठी वेगळ्या प्रकारची क्षमता असणारी चित्रपटगृहे लागतात. थोडक्यात, आयमॅक्स (IMAX) ही अति-विभेदन (हाय रिझोल्यूशन) कॅमेरा-फिल्म फॉरमॅट आणि चित्र प्रक्षेपकाची आणि अतिभव्य पडद्याची संपूर्णपणे वेगळी अशी सबंध व्यवस्थाच असते.
आयमॅक्स चित्रफीत आणि कॅमेरे : सर्वसाधारणपणे चित्रपट चित्रित करण्याकरता ३५ मिलीमीटर चित्रफीत वापरली जाते. यामध्ये ज्यावर मुद्रण होते अशी प्रत्येक चित्रचौकट (फ्रेम) २१.९५ मिमी × १८.६ मिमी या मोजमापाची असते. तर, आयमॅक्स चित्रफीतीची प्रत्येक चित्रचौकट ७० मिमी × ४८.५ मिमी या मोजमापाची असते. आयमॅक्स चित्रफीतीवर दृश्य चित्रित करण्याकरता आयमॅक्स कॅमेऱ्यांची गरज भासते. आयमॅक्स कॅमेऱ्यामध्ये मिनिटाला १०३ मीटर या वेगाने चित्रफीत पुढे सरकते. हा वेग नेहमीच्या ३५ मिमी फिल्म कॅमेरापेक्षा जवळपास तिप्पट असतो. यामुळे ज्या प्रतिमेचे मुद्रण (रेकॉर्डिंग) चित्रफीतीवर होते, त्याचे विभेदन (रिझोल्यूशन) नेहमीच्या प्रतिमेपेक्षा खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे, आयमॅक्स कॅमेऱ्यामध्ये साधारण चित्रफीतीच्या तिप्पट प्रमाणात फिल्म स्टॉक अर्थात निगेटिव्हची गरज भासते. आयमॅक्स त्रिमिती (थ्रीडी) चित्रपटांची निर्मिती करण्याकरता विशिष्ट प्रकारचा थ्रीडी डिजिटल कॅमेरा आवश्यक असतो. ट्रान्सफॉर्मर्स : एज ऑफ एक्सटिंक्शन (२०१४) हा प्रसिद्ध ट्रान्सफॉर्मर्स चित्रपट मालिकेतला चौथा भाग फँटम ६५ आयमॅक्स त्रिमिती कॅमेऱ्यावर चित्रित करण्यात आलेला सर्वांत पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाचे काही भाग आयमॅक्स त्रिमिती कॅमेऱ्यावर चित्रित केले गेले. हा कॅमेरा वापरल्यास प्रतिमेचे विभेदन नेहमीच्या हाय डेफिनेशन विभेदनाच्या (एचडी रेझोल्यूशनच्या) चार हजार पट जास्त स्पष्ट स्वरूपात प्राप्त होते. परिणामी डोळ्यांना दिसणारी प्रतिमा जास्त उठावदार आणि वास्तवाच्या अधिक जवळची भासते. कॅप्टन अमेरिका – सिव्हिल वॉर (२०१६) हा चित्रपट चित्रित करण्याकरता आयमॅक्स द्विमिती कॅमेऱ्याचा सर्वांत पहिल्यांदा वापर करण्यात आला. आयमॅक्स चित्रफीत एका विशिष्ट प्रकारच्या तबकडीवर गुंडाळली जाते. नेहमीच्या चित्रफीतीसारखी रिळे आयमॅक्स चित्रफीतीकरता उपयोगास येत नाहीत. या तबकड्यांचा व्यास सुमारे चार ते सहा फूट इतका मोठा असतो. तीन तास लांबीच्या चित्रफीतीचे वजन जवळपास तीनशे किलोच्या आसपास असते.
आयमॅक्स चित्रफीत प्रक्षेपक (प्रोजेक्टर्स) : नेहमीच्या चित्रफीतीप्रमाणे आयमॅक्स चित्रफीतीमध्ये चित्राबरोबर आवाज समाविष्ट नसतो. आवाज चित्राबरोबर येण्याकरता चित्राच्या बरोबरीने वेगळ्या उपकरणाच्या मदतीने ध्वनीची फाईल चालवली जाते. आयमॅक्स चित्रफीत चालवण्याकरता विशिष्ट प्रकारचे दृश्य-प्रक्षेपक (प्रोजेक्टर) वापरले जातात. ‘आयमॅक्स कॉर्पोरेशन’ या कॅनडास्थित कंपनीतर्फे आयमॅक्स चित्रफीत कॅमेरे आणि प्रक्षेपक यांची निर्मिती केली जाते. जगभरच्या आयमॅक्स चित्रपटगृहांना या कंपनीतर्फे निर्मिती, वितरणासंदर्भात मदतही केली जाते. ‘आयमॅक्स कॉर्पोरेशन’ने आयमॅक्स चित्रफीत चालवण्याकरता GT, GT 3D, SR आणि MPX अशा चार प्रकारच्या प्रक्षेपकांची निर्मिती केली आहे. यातला GT प्रक्षेपक वगळता, बाकीचे प्रक्षेपक त्रिमिती चित्राचेही प्रक्षेपण करू शकतात. या प्रक्षेपकांमध्ये झेनॉन आर्क नावाचे विशेष प्रकारचे दिवे वापरले जातात. या दिव्यांमध्ये झेनॉन नावाचा वायू वापरला जातो. हे दिवे विशिष्ट प्रकारच्या काचेपासून बनवले जातात. या काचेला फ्यूज्ड सिलिका किंवा फ्यूज्ड क्वार्टझ असेही म्हटले जाते. या विशिष्ट प्रकारच्या दिव्यांमध्ये वापरला जाणारा झेनॉन वायू जवळपास साडेतीनशे पीएसआय एवढ्या जास्त दाबाचा असतो. इतक्या जास्त दाबामुळे झेनॉन दिवा बदलताना किंवा हाताळताना कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सुरक्षेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
आयमॅक्स चित्रपट प्रक्षेपण पद्धती : आयमॅक्स चित्रफीत प्रक्षेपित करताना डिजिटल आणि लेसर अशा दोन पद्धती वापरल्या जातात. डिजिटल पद्धती मुख्यत्वेकरून १.८९ : १ असे कमी प्रसर गुणोत्तर (आस्पेक्ट रेशो) असणाऱ्या पडद्यांवर प्रक्षेपण करण्यासाठी वापरली जाते. दोन वेगवेगळे 2K प्रक्षेपक वापरून त्यामधून बाहेर पडणाऱ्या प्रतिमा अर्ध्या पिक्सलचा ऑफसेट ठेवून एकत्र केल्या जातात (सुपर इम्पोजिंग). त्रिमिती प्रतिमा प्रक्षेपित करण्याकरता एक प्रक्षेपक डाव्या डोळ्याला दिसतील अशा प्रतिमा प्रक्षेपित करतो तर दुसरा उजव्या डोळ्याला दिसतील अशा प्रतिमा प्रक्षेपित करतो. २०१२ साली काही ठिकाणच्या चित्रपटगृहांमध्ये आयमॅक्स तर्फे रेल पद्धती कार्यान्वित केली गेली. यामुळे प्रक्षेपकांची गरजेप्रमाणे आत-बाहेर हालचाल करणे शक्य होते. २०१२ साली आयमॅक्सने 4K लेसर प्रक्षेपण पद्धती कार्यान्वित केली. या पद्धतीत देखील दोन प्रक्षेपक वापरावे लागतात. पण या पद्धतीमुळे नेहमीचे आयमॅक्स प्रसर गुणोत्तर (आस्पेक्ट रेशो) कायम ठेवून छत्तीस मीटर किंवा त्याहून अधिक लांबीच्या पडद्यावर प्रक्षेपण करणे शक्य होते. २०१४ मध्ये कार्यान्वित झालेल्या ड्यूएल 4K लेसर पद्धतीत तर याहून अधिक चांगला प्रक्षेपण परिणाम साधला जातो. या प्रकारच्या पद्धतीत झेनॉन दिव्याऐवजी लेसर प्रकारचा प्रकाशाचा स्रोत वापरला जातो. यामुळे झेनॉन प्रक्षेपकाच्या पन्नास पट अधिक प्रखर प्रतिमा मिळते. १२ चॅनल असणारी सराउंड ध्वनीरचनाही या पद्धतीत वापरली जाते.
आयमॅक्स चित्रपटगृहे : क्लासिक, मल्टीप्लेक्स, डोम, ओम्नीमॅक्स अशा वेगवेगळ्या रचना पद्धतीची चित्रपटगृहे आयमॅक्स चित्रपट दाखवण्याकरता वापरली जातात. २००८ साली शोधलेल्या डिजिटल प्रक्षेपण पद्धतीमुळे चित्रपटगृहाच्या रचनेत फारसा बदल न करता फक्त आयमॅक्स डिजिटल प्रक्षेपक घेऊन साध्या चित्रपटगृहातही आयमॅक्स चित्रपट कमी प्रसर गुणोत्तरात दाखवणे शक्य झाले; मात्र अशा प्रकारच्या प्रक्षेपणामुळे मूळ आयमॅक्स पद्धतीपेक्षा कमी परिणाम साधला जातो.
आयमॅक्समुळे होणारे फायदे : आयमॅक्स चित्रफीत, प्रक्षेपक आणि प्रक्षेपण पद्धतीमुळे प्रेक्षकाला चित्रपट पाहताना तो वास्तवासमान भासतो. उत्कृष्ट चित्र व ध्वनिपरिणाम अनुभवता येतो. चित्राची स्पष्टता, ध्वनीची परिणामकारकता यांमुळे चित्रपट पाहणे अधिकच रंजक बनते. चित्रपटगृहाच्या विशिष्ट रचनेमुळे पडद्याच्या बऱ्याच जवळ बसून चित्रपट अनुभवता येतो.
हॉलिवुड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी आयमॅक्स तंत्रज्ञानाची मदत घेऊन बरेचसे चित्रपट बनवले आहेत. द डार्क नाइट (२००८), अवतार (२००९), इन्सेप्शन (२०१०), मिशन इम्पॉसिबल (२०११), द डार्क नाइट राइझेस (२०१२), ग्रॅव्हिटी (२०१३), स्टार वॉर्स :द फोर्स अवेकन्स (२०१५), डंकर्क (२०१७), ओपनहायमर (२०२३) हे काही महत्त्वाचे हॉलिवुड आयमॅक्सपट आहेत. भारतामध्ये धूम 3 (२०१३), बँग बँग (२०१४), बाहुबली २ (२०१७), ठग्ज ऑफ हिंदोस्तान , पद्मावत, टू पॉईंट झिरो (२०१८), साहो (२०१९),आरआरआर, के.जी.एफ. चॅप्टर 2, पोन्नियिन सेलवन, सम्राट पृथ्वीराज (२०२२), जवान, भोला, लिओ (२०२३) इत्यादी आयमॅक्सपट आले आहेत.
संदर्भ : www.imax.com
समीक्षण : अभिजीत देशपांडे